पाच मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान
: अशोक सराफ :
मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनयाचे सम्राट, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनयातील सहजता, टायमिंग आणि विविध भावछटांचे सशक्त सादरीकरण या बाबींसाठी त्यांना हा सन्मान मिळाला. अशोक सराफ यांचे 'अशी ही बनवाबनवी', 'धुमधडाका', 'बाळाचे बाप ब्रम्हचारी' आणि 'पंढरीची वारी' यासारखे अनेक चित्रपट रसिकांच्या हृदयात कायमचे घर करून आहेत.अशोक सराफ यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांनी देखील केले होते. एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान दिलीप कुमार यांनी सराफ यांना त्यांच्या अभिनयाच्या टायमिंगसाठी शाबासकी दिली होती. श्री. सराफ यांचा अभिनय जीवनभर अविस्मरणीय ठरला आहे. ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपार यश मिळवले असून, तो आजही मराठी रसिकांचा आवडता चित्रपट आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्येदेखील अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
: अच्युत पालव :
देवनागरी लिपीच्या कलेला नवसंजीवनी देणारे प्रसिद्ध कॅलिग्राफर अच्युत पालव यांना कला क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सर्जनशीलतेतून देवनागरी लिपीचे सौंदर्य आणि शिस्तबद्धता प्रभावीपणे समोर येते.अच्युत पालव यांची कला शैली ही पारंपरिकतेचा गाभा राखत आधुनिकतेशी सुसंगत अशी असून, ते अक्षरांना विशिष्ट आकार, संतुलन आणि कलात्मक स्पर्श देतात. त्यांच्या लेखनातून केवळ पठनीयता जपली जात नाही, तर सौंदर्यदृष्ट्याही ते अक्षरांना एक नवे आयाम मिळवून देतात. ते फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही देवनागरी लिपीचा प्रचार व प्रसार करतात. त्यांनी विविध देशांमध्ये कार्यशाळा, प्रदर्शने आणि सेमिनार्सद्वारे देवनागरी लिपीची कला आणि तिची वैशिष्ट्ये प्रभावीपणे मांडली आहेत. यासोबत, त्यांच्या प्रकाशित पुस्तकांमुळे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यांमुळे नागरी लिपीला एक स्वतंत्र कला म्हणून प्रतिष्ठा लाभली आहे.
: अश्विनी भिडे-देशपांडे :
जयपुर-अतत्रौली घराण्याच्या ख्याल गायकी परंपरेतील आघाडीच्या गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांना शास्त्रीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बालपणापासून संगीताची गोडी असलेल्या अश्विनी यांनी "गांधर्व महाविद्यालयातून "संगीत विशारद" पदवी प्राप्त केली. पं. नारायणराव दातार आणि आई माणिक भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जयपूर घराण्याची सखोल साधना केली.त्यांच्या गायकीत रागांची सौंदर्यपूर्ण मांडणी, भावाभिव्यक्ती आणि लयकारी यांचे अद्वितीय समन्वय आढळतो. त्यांनी शास्त्रीय गायनाबरोबर ठुमरी, भजन, अभंग यातही निपुणता साधली आहे. एचएमवीसह अनेक नामवंत संगीत कंपन्यांमार्फत त्यांचे अल्बम प्रकाशित झाले आहेत. "राष्ट्रीय कालिदास सन्मान"(2016), "संगीत नाटक अकादमी पुरस्कार"(2015), "राष्ट्रीय कुमार गंधर्व सन्मान" (2005) यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. आजही त्या आपल्या गायन, अध्यापन व कार्यशाळांद्वारे ख्याल गायकीची परंपरा समृद्ध करत आहेत.
: सुभाष शर्मा :
यवतमाळ जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी सुभाष शर्मा यांना कृषी क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. नैसर्गिक शेतीच्या विविध पद्धतींचा अवलंब करून त्यांनी हजारो शेतकऱ्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन देत आहेत. सुभाष शर्मा यांचे वडील खेतूलाल यांच्या 16 एकर शेतीची जबाबदारी त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर आली. मात्र, 2011 मध्ये त्यांनी वडिलोपार्जित शेती विकून तिवसा शिवारात त्यांनी 16 एकर जमीन खरेदी केली. नव्या जमिनीवर त्यांनी नैसर्गिक शेतीचे प्रयोग सुरू केले. मातीची सुपीकता राखण्याचे तंत्र, पिकांचे नियोजन आणि पर्यावरणपूरक पद्धती यामुळे त्यांची शेती देशभरातील शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरली. सततच्या प्रयोगशीलतेने आणि जिद्दीने त्यांनी शेतीत नवदृष्टी निर्माण केली. त्यांचा संघर्ष, नवनिर्मितीचा दृष्टिकोन आणि कृषी क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना पद्मश्री या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले आहे.
: डॉ. विलास डांगरे :
70 वर्षीय डॉ. विलास डांगरे यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. होमिओपॅथीच्या माध्यमातून त्यांनी गरजूंच्या आरोग्यसेवेत अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांच्या नाडी परीक्षण कौशल्यामुळे ते एक सुप्रसिद्ध होमिओपॅथी चिकित्सक म्हणून ओळखले जातात. खास करून 2014 मध्ये नागपूरच्या कस्तूरचंद पार्कमध्ये झालेल्या रॅलीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घश्याला त्रास झाला होता, तेव्हा डॉ. डांगरे यांनी केलेल्या उपचारामुळे त्यांना आराम पडला होता. नागपूरमधील त्यांचे क्लिनिक गरजू रुग्णांसाठी आश्रयस्थान ठरले असून त्यांनी आतापर्यंत एक लाखाहून अधिक रुग्णांना उपचार दिले आहेत. 10 वर्षा पासून ते दिव्यांग-दृष्टीहीन झाले आहेत. तथापि, त्यावरही मात करत ते आपली अमूल्य सेवा रुग्णांना देत आहेत.
यंदाच्या पद्म पुरस्कार वितरणाची प्रक्रिया दोन टप्प्यात झाली. पहिल्या टप्पयात 71 जणांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले, यामध्ये मध्ये 4 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 57 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. आज उर्वरित 68 पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये 3 पद्मविभूषण, 09 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे यंदाच्या पुरस्कार यादीत एकूण 139 मान्यवरांची निवड करण्यात आली होती. त्यात 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
000000
No comments:
Post a Comment