धुळे शहर आणि परिसरातील विविध विकासकामे गतीने पूर्ण करा
- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई, दि. १७ : धुळे शहर आणि परिसरात पाऊस झाल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी देवपूर, वलवाडी व इतर भागात सुयोग्य सांडपाणी गटारीची व्यवस्था करण्यात यावी. सखल भागात साठणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यात यावा. तसेच महानगरपालिका परिसरात होत असलेली विविध विकासकामे गतीने पूर्ण करावीत, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
धुळे महानगरपालिकेच्या विविध समस्यांबाबत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ बोलत होत्या. यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, धुळे महानगरपालिका तापी पाणीपुरवठा योजना सुकवद ते बाभळे, बाभळे - धुळे - मालेगाव रोड, दगडी टाकी या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम तातडीने करावे. तसेच महानगरपालिकेच्या मालकीच्या अवधान येथील ७५ एकर क्षेत्र जमिनीवर १५-२५ मेगावॅट क्षमतेचा स्वमालकीचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावा. पाणीपुरवठा योजना व पथदिवे उभारणी करण्यात यावी, हा प्रकल्प समाजहिताचा असल्याने यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment