शिरोळ मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांना गती द्यावी
- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि. 13 : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील विविध पाणीपुरवठा योजनांची कामे नियोजनपूर्वक व कार्यमर्यादेत पूर्ण करावे, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
मंत्रालयातील दालनात शिरोळ विधानसभा मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांच्या कामाविषयी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, अभियान संचालक प्रतिनिधी सुषमा सातपुते, मुख्य अभियंता प्रशांत भामरे यांच्यासह मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांसंबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामांमध्ये काही कंत्राटदारांकडून होत असलेली दिरंगाई लक्षात घेता, अशा कंत्राटदारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. तसेच सध्या प्रगतीपथावर असलेल्या कामांना अधिक गती देण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना लवकरात लवकर लाभ मिळू शकेल. मतदारसंघातील पाणीपुरवठ्याच्या सर्व योजनांमध्ये सौरऊर्जेचा वापर करण्याचे विचाराधीन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment