Tuesday, 13 June 2023

मानसिक आजारमुक्त व्यक्तिंकरिता चार जिल्ह्यांत 16 पुनर्वसनगृह होणार

 मानसिक आजारमुक्त व्यक्तिंकरिता चार जिल्ह्यांत 16 पुनर्वसनगृह होणार


 


            मानसिक आजारमुक्त व्यक्तिंकरिता चार जिल्ह्यांत स्वयंसेवी संस्थामार्फत 16 पुनर्वसनगृह स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर, पुणे, ठाणे व रत्नागिरी येथे ही पुनवर्सनगृह स्थापन करण्यात येतील. या पुनर्वसनगृहांमध्ये 18 ते 55 वयोगटातील तसेच 55 वर्षांवरील वयोगटातील ज्येष्ठ अशा दोन्ही वयोगटातील पुरुष व महिलांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 16 पुनर्वसनगृहे सुरु करण्यात येतील. या पुनर्वसनगृहांच्या खर्चापोटी पाच कोटी 76 लाख रुपयांच्या तरतुदीसदेखील बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच पुढील टप्यामध्ये प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या शिफारशीनुसार मानसिक आजारमुक्त व्यक्तिंची संख्या वाढल्यास, ती विचारात घेऊन आवश्यकतेनुसार पुनर्वसनगृहांच्या संख्येत वेळोवेळी वाढ करण्याच्या तरतुदीसही मान्यता देण्यात आली.


            मानसिक आजारमुक्त व्यक्तिंना पुढील उपचाराची गरज नसते किंवा ज्या मानसिकमुक्त व्यक्ती बेघर आहेत किंवा त्यांचे कुटुंबीय स्वीकारत नाहीत अशांसाठी ही पुनर्वसनगृहे असतील. पुनर्वसनगृहाने प्रवेश देण्यात आलेल्या व्यक्तीस विविध प्रकारचे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण द्यावयाचे आहे. त्याचप्रमाणे त्यांचे पुनर्वसन करणे, समुपदेशन करणे, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करणे, त्यांचा निवास, भोजन, क्रीडा व मनोरंजन, स्वच्छता, संरक्षण आदी बाबींची जबाबदारी घ्यावयाची आहे. पुनर्वसनगृह चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस 12 हजार रुपये प्रती व्यक्ती प्रती महिना सहायक अनुदान देण्यात येईल. अशा संस्थांची निवड करण्यासाठी राज्य स्तरावर निवड समिती असेल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi