Saturday, 18 March 2023

शिर्डी येथे २४ ते २६ मार्च दरम्यान 'महापशुधन एक्सपो' चे आयोजन

 शिर्डी येथे २४ ते २६ मार्च दरम्यान 'महापशुधन एक्सपो' चे आयोजन.

राष्ट्रीय स्तरावरील सर्वात मोठे प्रदर्शन.

            नाशिक, दि.१७ मार्च, २०२३ (विमाका) – शिर्डी (जि. अहमदनगर) येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देशातील सर्वात मोठे, राष्ट्रीय स्तरावरील 'महापशुधन एक्सपो २०२३' चे आयोजन २४ ते २६ मार्च, २०२३ दरम्यान करण्यात आले आहे, अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी येथे दिली.


            या प्रदर्शनाच्या संदर्भात माहिती देताना पशुसंवर्धन मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, देशातील १३ राज्यातील पशुपक्षी सहभागी व्हावेत असा प्रयत्न आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून देशी गोवंश संवर्धनाचे महत्त्व पटवून देत देशी गोवंशामध्ये अनुवांशिक सुधारणा घडवून आणणे, सुशिक्षित बेरोजगारांना पशुपालनाद्वारे स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणे, दूध, मांस, अंडी उत्पादनास चालना देणे, जनावरांची उत्पादन क्षमता वाढवून उत्पादन खर्च कमी करणे, लिंग विनिश्चित केलेल्या वीर्य मात्राचा कृत्रिम रेतन कार्यक्रमात वापर, वैरण उत्पादनास चालना देणे, मूरघास हायड्रोपोनिक ॲझोला तंत्रज्ञान यासारख्या विषयांबाबत पशुपालकांना प्रात्यक्षिकांसह या प्रदर्शनात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे पशुपालकांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल, असा विश्वासही पशुसंवर्धन मंत्री श्री.विखे पाटील यांनी व्यक्त केला.


            शास्त्रोक्त पध्दतीने पशुपालनासाठी आवश्यक यंत्रे उपकरणे तसेच पशुसंवर्धनाशी निगडित बाबीसाठीच्या उत्पादनाचे स्टॉल सुमारे ४६ एकर क्षेत्रामध्ये उभारण्यात येणार असून,६५ प्रकारच्या विविध पशुपक्ष्यांच्या जाती या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.नागपूर येथील महाराष्ट्र पशु विज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठासह राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचा यामध्ये सक्रिय सहभाग राहणार आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने पाच लाख शेतकऱ्यांचा सहभाग या प्रदर्शनात राहील, असे मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.


            'महापशुधन एक्स्पो 'हा पशुसंवर्धन विषयातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि शास्त्रोक्त पद्धतीने पशु-पक्षी पालनासाठी या व्यवसायात नव्याने येत असलेल्या युवकांना पर्वणी ठरेल, असेही त्यांनी सांगितले.


00000



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi