Saturday, 7 May 2022

 जादूटोणाविरोधी कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी होण्यासाठीव्यापक प्रयत्न आवश्यक

- धनंजय मुंडे

· कायद्याचा प्रभावीपणे प्रचार व प्रसार करण्यासाठी लवकरच कृती आरखडा

· जादूटोणाविरोधी कायदा प्रचार व प्रसार समितीच्या कार्यशाळेत धनंजय मुंडे यांचे प्रतिपादन.

            मुंबई, दि. 6 : जादूटोणाविरोधात कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून, अंधश्रद्धाळू अफवा व त्यामधून घडणाऱ्या कुप्रथा यांना आळा घालण्यासाठी या कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली या कायद्याची प्रचार व प्रसार समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून व्यापक प्रयत्नांची गरज असून त्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

            जादूटोणाविरोधी कायदा प्रचार व प्रसार समितीच्या वतीने पुणे येथे सामाजिक न्याय विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यशाळेचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते (ऑनलाईन) उद्घाटन करण्यात आले; त्याप्रसंगी ते बोलत होते.

            देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत, मात्र आजही काही भागात नरबळी, अंधश्रद्धांच्या माध्यमातून लैंगिक शोषण, अत्याचार असे अनेक प्रकार घडल्याचे कानावर येतात, त्यात कायदा आपले काम करतोच परंतु या कायद्याची कडक अंमलबजावणी होऊन हे प्रकार कायमचे थांबले पाहिजेत, यासाठी या कायद्याचा अधिकाधिक प्रसार जनसामान्य वर्गात व्हायला हवा, या दृष्टीने एक कृती आरखडा तयार करण्याचे निर्देशही श्री. मुंडे यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

            समाजाला अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढून वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासण्यासाठी हा कायदा पोषक असून, विभागाच्या वतीने धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व्यापक प्रसार मोहीम हाती घेण्यात येत असल्याचे विभागाचे सचिव सुमंत भांगे यावेळी म्हणाले.

            कार्यशाळेस जादूटोणाविरोधी कायदा प्रसार समितीचे सहअध्यक्ष श्री. शाम मानव तसेच समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत. औपचारिक उद्धाटन प्रसंगी सचिव सुमंत भांगे, समितीचे सहअध्यक्ष शाम मानव, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, अतिरिक्त समाज कल्याण आयुक्त दिनेश डोके, भारत केंद्रे, प्रशांत चव्हाण, रवींद्र कदम, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी तसेच समाज कल्याण विभागाचे सर्व जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी आदी उपस्थित होते.

००००



 



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi