Monday, 24 August 2026

पार्थिव शिवलिंग निर्मिती सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मानकापूर येथील उपक्रमात हजारोंचा सहभाग

 पार्थिव शिवलिंग निर्मिती सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मानकापूर येथील उपक्रमात हजारोंचा सहभाग

 

नागपूर दि. 23:  मानकापूर येथील लोटस कल्चरल अँड स्पोर्टिंग असोसिएशनतर्फे शिवमंदिर परिसरात आयोजित पार्थिव शिवलिंग निर्मिती सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली. मुख्यमंत्र्यांनीही या उपक्रमात सहभागी होऊन तीन शिवलिंगांची निर्मिती केली.                

मंत्रोच्चाराच्या जयघोषात मुख्यमंत्र्यांनी प्रथम शिवलिंगाचे दर्शन घेतले. या सोहळ्याचे संयोजक दयाशंकर तिवारी, अनिल बावनगडे, अमोल कोल्हे, आशिष पाली, नवीन जैन, प्रभाकर ठाकरे व समितीचे सदस्य उपस्थित होते.

       भारतीय संस्कृतीतील शिवआराधनेचे महत्त्व अधोरेखित करत मुख्यमंत्री म्हणाले, श्रावण महिन्यात आयोजित या सोहळ्यामुळे परिसरातील वातावरण पवित्र झाले असून येथे महिला पुरुषांसह दिव्यांगजन आणि बालकेदेखील पार्थिव शिवलिंगाची निर्मिती करीत असल्याचे दृश्य प्रसन्नता निर्माण करणारे आहे. भारतीय संस्कृतीत  शिवआराधना महत्त्वाची मानली जाते. आदी-अनंताचे प्रतीक म्हणजे शिव. या शिवपूजेतून आत्मिक शांतता व मानसिक स्थैर्य प्राप्त होत आहे. यावर्षीच्या उपक्रमात ९१ लक्ष पार्थिव शिवलिंग निर्मिती करण्यात येणार असून  महिनाभर चालणाऱ्या या सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

 

दि 13 ऑगस्ट ते 12 सप्टेंबरदरम्यान  आयोजित करण्यात आलेल्या या  सोहळ्याचे हे तिसरे वर्ष असून यंदा ९१ लाख पार्थिव शिवलिंग निर्मितीचा संकल्प सोडण्यात आला आहे. शिवलिंगांसाठी गंगा तीरावरून माती येथे आणण्यात आली असून दररोज सूर्यास्तानंतर ह्या पार्थिव शिवलिंगांचे विसर्जन करण्यात येते. दि १२ सप्टेंबर रोजी यज्ञ व महाप्रसादाने ह्या सोहळ्याची सांगता होणार असल्याचे दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या.

 

 

Sunday, 23 August 2026

जल व मृदसंधारणासाठी लोकसहभाग वाढविणे आवश्यक

 जल व मृदसंधारणासाठी लोकसहभाग वाढविणे आवश्यक

- मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक

जलसंधारण दिनानिमित्त आयोजित महा वॉकेथॉनसारख्या उपक्रम कौतुकास्पद आहे. पावसाचे पाणी वाहून जाताना सुपीक मातीही वाहून जाते आणि पाणी जमिनीत मुरत नाही. त्यामुळे जल व मृदसंधारणासाठी लोकसहभाग वाढविणे गरजेचे आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी सुपीक जमीन आणि पाण्याची शाश्वत व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने जलसंधारणाच्या कामात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केले. स्व. सुधाकरराव नाईक यांनी दूरदृष्टीने मृद व जलसंधारण विभागाची निर्मिती केली असून, त्यांनी दिलेला पाणी अडवा, पाणी जिरवाचा संदेश प्रत्यक्षात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

 

राज्यस्तरीय महा वॉकेथॉनचा शुभारंभ आरे दुग्ध वसाहत जवळ सागरी किनारा रस्त्यालगत प्रोमोनेट येथून करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर तुळशी रोपाला जल अर्पित करुन जलपूजन करण्यात आले. यावेळी माती व जलसंधारणाच्या संवर्धनासाठी उपस्थितांना शपथ देण्यात आली. यानंतर महा वॉकेथॉनची झेंडी दाखवून मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. अभिनेते पुष्कर श्रोत्री, क्रिकेटर इरफान पठाण, जॅकी भगनानी, रजनीश दुग्गल, संजीव-श्रवण, अनिल सिंग, झहीर शेख जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ग्रामविकास विभागाचे सचिव श्रीकांत पुलकुंडवार, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक, सांस्कतिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्याने यावेळी उपस्थित होते.

 

महा वॉकेथॉन’ हा अभिनव उपक्रम

 ‘महा वॉकेथॉन’ हा अभिनव उपक्रम


- उपसभापती सचिन अहिर


माती वाचवा, पाणी जिरवा आणि पाणी वाचवण्याची संकल्पना तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित ‘महा वॉकेथॉन’ हा अभिनव उपक्रम कौतुकास्पद आहे. पाणी ही प्रत्येकाची गरज असून जात-धर्माच्या पलीकडे जाऊन जलसंधारणाचा विचार जनमानसात रुजविणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद ही भविष्यातील पिढ्यांसाठी जलसंधारणाची लोकचळवळ उभी राहण्याची आशादायी सुरुवात आहे, असे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर 

महाराष्ट्र गट-ब संयुक्त मुख्य परीक्षा-२०२५ : एकापेक्षा अधिक गुणवत्ता यादीत नाव आले तरी नियुक्ती एका संवर्गातच

 महाराष्ट्र गट-ब संयुक्त मुख्य परीक्षा-२०२५ :

एकापेक्षा अधिक गुणवत्ता यादीत नाव आले तरी नियुक्ती एका संवर्गातच

 

            मुंबई, दि. २१ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा-२०२५ च्या निकालासंदर्भात उमेदवारांमध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एकाच उमेदवाराचे नाव एकापेक्षा अधिक संवर्गांच्या गुणवत्ता यादीत आले असले, तरी प्रत्यक्ष नियुक्ती केवळ एका संवर्गातील पदावरच होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

            आयोगाने १४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा-२०२५ चा निकाल प्रसिद्ध केला. दिनांक १७ मे २०२६ रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेच्या निकालामध्ये सहायक कक्ष अधिकारी संवर्गातील ३ पदे, राज्य कर निरीक्षक संवर्गातील २७९ पदे आणि दुय्यम निबंधक (श्रेणी-१)/मुद्रांक निरीक्षक संवर्गातील ८४ पदे अशा एकूण ३६६ पदांचा समावेश आहे.

            या परीक्षेसाठी अर्ज करताना उमेदवारांनी मुख्य परीक्षेतील या तीनही संवर्गांकरिता विकल्प दिले होते. निकाल जाहीर करीत असतांना आयोगाने प्रचलित कार्यपद्धतीनुसार संवर्गनिहाय उपलब्ध पदे, उमेदवारांची गुणवत्ता, सामाजिक व समांतर आरक्षण व उमेदवाराने दिलेले विकल्प इ. बाबी निकाल तयार करीत असतांना विचारात घेण्यात आल्यात. त्यानुसार वरील तिन्ही संवर्गाची यादी आयोगाच्या संकतेस्थळावर दिनांक १४ ऑगस्ट, २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे गुणवत्ता यादीतील या तीनही संवर्गाचे उमेदवार हे एकापेक्षा अधिक संवर्गातील गुणवत्ता यादीत आलेले दिसून येतात.

             उमेदवारांनी अर्ज दाखल करीत असतांना वरील तीनही संवर्गाकरिता विकल्प दिलेला आहे. तो विकल्प विचारात घेऊनच संवर्गनिहाय निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. एक उमेदवार एकापेक्षा अधिक संवर्गाच्या गुणवत्तायादीमध्ये दिसत असला तरी प्रत्यक्षात त्याने दिलेल्या विकल्पानुसार सदर उमेदवाराची या तीनही संवर्गापैकी फक्त एकाच संवर्गातील पदावर नियुक्ती होणार आहे. उर्वरित संवर्गातील पदे रिक्त राहणार आहेत. शासनाने नियुक्ती आदेश दिल्यानंतर विहित कालावधीमध्ये संबंधित उमेदवार त्याच्या पदावर रुजू न झाल्यास ते पद रिक्त राहणार असून त्या पदाकरिता प्रतिक्षा यादीमधून आयोगाकडून शासनास शिफारस करण्यात येणार आहे.

            निकालासंदर्भात विविध समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या संदेशांमुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी आयोगाने ही वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. उमेदवारांनी अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही आयोगाने केले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' विषयावर प्रधान सचिव प्रवीण दराडे यांची विशेष मुलाखत 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात विशेष मुलाखतीचा दुसरा भाग २५ ऑगस्ट रोजी

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' विषयावर प्रधान सचिव प्रवीण दराडे यांची विशेष मुलाखत

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात विशेष मुलाखतीचा दुसरा भाग २५ ऑगस्ट रोजी

 

            मुंबई, दि. २१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्रया लोकप्रिय कार्यक्रमातून राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६या योजनेविषयी सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्या विशेष मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित करण्यात येणार आहे.

 

            'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात विशेष मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचे प्रसारण मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर होणार आहे. त्यानंतर ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम चांदोरकर यांनी केले आहे.

 

            पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणे, कृषी क्षेत्र अधिक सक्षम व शाश्वत करणे तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या राज्य शासनाच्या प्रयत्नांची माहिती या मुलाखतीतून देण्यात येत आहे.

 

            मुलाखतीच्या दुसऱ्या भागात योजनेची अंमलबजावणी, लाभार्थी निवडीची प्रक्रिया, पात्र शेतकऱ्यांना मिळणारा लाभ, डिजिटल प्रणालीचा वापर, कर्जखात्यांची पडताळणी, पारदर्शक व कार्यक्षम अंमलबजावणी तसेच योजनेच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणाऱ्या आर्थिक बळकटीविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तसेच सहकार विभागाची भूमिका आणि विकसित महाराष्ट्र २०४७या राज्याच्या विकासदृष्टीच्या पूर्ततेमध्ये या योजनेचे महत्त्व याबाबतही माहिती दिली जाणार आहे.

 

अधिकृत समाजमाध्यमे :

X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

वांद्रे येथील डिजिटल जाहिरात फलकांची चौकशी करावी

 वांद्रे येथील डिजिटल जाहिरात फलकांची चौकशी करावी

-विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

 

मुंबई, दि. २१ : वांद्रे (पूर्व) येथील टीचर्स कॉलनी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील एमएसआरडीसीच्या फूट ओव्हर ब्रिजवरील डिजिटल एलईडी जाहिरात फलकांची परवानगी, वैधता आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने सखोल चौकशी करावी, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

विधानभवन येथे अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मुंबई महानगरपालिका, एमएसआरडीसी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या फलकांवरील सतत बदलणाऱ्या जाहिराती व व्हिडिओंमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता बैठकीत व्यक्त करण्यात आली.

जाहिरात फलकांच्या परवानगी प्रक्रियेतील कागदपत्रे, निविदा प्रक्रिया तसेच माहिती अधिकारांतर्गत मागविलेली संपूर्ण माहिती उपलब्ध नसल्याची बाबही बैठकीत मांडण्यात आली. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेची तपासणी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

एमएसआरडीसीने सात दिवसांत संबंधित विभागांची बैठक घ्यावी. या बैठकीस वाहतूक पोलिसांच्या अधिकाऱ्यांना उपस्थित करून फलकांची वैधता, परवानगी प्रक्रिया आणि वाहतूक सुरक्षेचा आढावा घ्यावा तसेच सविस्तर अहवाल सादर करावा, असे अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले. अनियमितता किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

0000

UPI क्रांतीचे हॅसेनच्या मंत्री-अध्यक्षांकडून कौतुक

 UPI क्रांतीचे हॅसेनच्या मंत्री-अध्यक्षांकडून कौतुक

हॅसेनचे मंत्री-अध्यक्ष बोरीस ऱ्हेइन यांनी भारतातील यपीआय व्यवहारांच्या क्रांतीचे कौतुक केले. हॅसेनमध्ये सुमारे ४० हजार भारतीय नागरिकांचा समुदाय असून, हा समुदाय हॅसेनच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

पारटेक्स एआयचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सहसंस्थापक गौरव त्रिपाठी यांनी हॅसेनमध्ये काम करण्याच्या आपल्या अनुभवांची माहिती दिली.

 

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमानंतर राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि हॅसेनचे मंत्री-अध्यक्ष बोरीस ऱ्हेइन यांनी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजला भेट देऊन तेथील कार्यपद्धतीची माहिती घेतली.

Featured post

Lakshvedhi