संघर्ष, समन्वय आणि आंबेडकरी विचारांचे प्रभावी नेतृत्व म्हणजे रामदास आठवले
–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार
· केंद्रीय राज्यमंत्रीपदी १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांचा नागरी सत्कार
मुंबई, दि. १४ - सामाजिक चळवळ, संघटनबांधणी आणि लोकाभिमुख राजकारणाच्या माध्यमातून रामदास आठवले यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली असून रामदास आठवले म्हणजे संघर्ष, समन्वय आणि आंबेडकरी विचारांचे प्रभावी नेतृत्व आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवले यांचा गौरव केला.
केंद्रीय राज्यमंत्रीपदी १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा यशवंतराव चव्हाण केंद्र येथे झालेल्या कार्यक्रमात नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार प्रवीण दरेकर, रामदास आठवले यांचे कुटुंबीय आणि चाहते यावेळी उपस्थित होते.
संघर्षातून घडलेले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी अखंड निष्ठा राखणारे रामदास आठवले हे देशातील सर्वसमावेशक नेतृत्वाचे प्रभावी प्रतीक आहेत. दलित पँथर चळवळीपासून राष्ट्रीय राजकारणापर्यंतचा त्यांचा प्रवास हा जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणाऱ्या कार्यकर्त्याचा प्रवास असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सामाजिक चळवळ, संघटनबांधणी आणि लोकाभिमुख राजकारणाच्या माध्यमातून आठवले यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. संघर्षातून नेतृत्व घडले असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कधीही कटुता आली नाही. सर्व समाजघटकांशी संवाद, सर्व पक्षांतील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि लोकांना आपलेसे करण्याची त्यांची शैली ही त्यांच्या यशामागील मोठी ताकद आहे.