Wednesday, 30 September 2026

अधिकारी कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार दुष्काळ निधीसाठी

 अधिकारी कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार दुष्काळ निधीसाठी


राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार दुष्काळ निधीसाठी देणार असल्याचे जाहीर केले आहे. या पुढाकाराबद्दल भोसले यांनी संघटनेचे अध्यक्ष अभियंता प्रमोद माने आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. मंत्री भोसले म्हणाले की, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपावी. बैठका व कार्यक्रम साधेपणाने आयोजित करावेत आणि प्रत्येक बाबतीत जबाबदारीने वागावे.

पाणी आरक्षणासाठी स्पष्ट धोरण

 पाणी आरक्षणासाठी स्पष्ट धोरण


पाणी आरक्षण व वितरणासाठी स्पष्ट निकष असलेला शासन निर्णय जारी करावा. या निर्णयाच्या अंमलबजावणीवर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील संनियंत्रण समितीमार्फत नियमित देखरेख ठेवावी, अशी सूचना बैठकीत करण्यात आली. दुष्काळी व पाणीटंचाईच्या भागात मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांचाही जिल्हानिहाय आढावा घ्यावा. ज्या भागात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे, तेथे स्थानिक परिस्थितीचा विचार करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले.

        दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, ग्रामीण नागरिक, पशुधन आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजांना केंद्रस्थानी ठेवून सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने, तत्परतेने आणि युद्धपातळीवर काम करावे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.


०००००

गाव तलाव, पाझर तलाव, लघु सिंचन प्रकल्प तसेच पिण्याच्या पाण्याचे स्रोत आवश्यकतेनुसार भरून ठेवण्यावर

 पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य

पाण्याचे नियोजन करताना सर्वप्रथम पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी. गाव तलाव, पाझर तलाव, लघु सिंचन प्रकल्प तसेच पिण्याच्या पाण्याचे स्रोत आवश्यकतेनुसार भरून ठेवण्यावर विशेष भर द्यावा. पिण्याच्या पाण्याचे नियोजन पूर्ण करुन शेतीसाठी पाण्याचे नियोजन व वाटप करण्याबाबत जिल्हास्तरावर आढावा घेण्यात यावा. उपलब्ध पाण्याचे जिल्हानिहाय नियोजन करताना काही प्रमाणात पाणी आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्याबाबतही चर्चा झाली. सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देताना चारा पिके, तृणधान्ये आणि नंतर रब्बी पिकांना प्राधान्य देण्यात यावे. ज्या भागात पाण्याची उपलब्धता मर्यादित आहे, त्या भागातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाबाबत कृषी सल्ला आगाऊ देण्यात यावा.

 

दुष्काळी परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन

 दुष्काळी परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पर्जन्यमान, भूजल पातळी, पिकांची स्थिती यासह उपलब्ध विविध आकडेवारीचा सखोल अभ्यास करून दुष्काळी परिस्थितीचे मूल्यमापन करावे. उपलब्ध आकडेवारीच्या आधारे दुष्काळी परिस्थिती असलेल्या तालुक्यांचा सातत्याने आढावा घेऊन आवश्यक ती माहिती व वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर करावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

 

दुष्काळग्रस्त भागातील प्रत्यक्ष परिस्थिती केंद्रस्थानी ठेवून १०० टक्के पिक पंचनामे करण्यात यावेत. प्रत्यक्ष पाहणी, छायाचित्रे तसेच ड्रोनद्वारे उपलब्ध होणाऱ्या माहितीचा वापर करून तथ्याधारित अहवाल तयार करावा. पंचनाम्यांमध्ये पारदर्शकता राहावी आणि संबंधित शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात याव्यात, याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले. नव्याने उपलब्ध होणाऱ्या आकडेवारीच्या आधारे दुष्काळी परिस्थितीचा नियमित आढावा घेण्यात यावा. असेही सांगण्यात आले.

 

दुष्काळाच्या काळात प्रशासनाची जिल्हा व तालुका पातळीवरील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती आणि प्रभावी प्रशासकीय नियंत्रण अत्यंत महत्वाचे असल्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक तसेच तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुख्यालयी उपलब्ध राहून नागरिकांच्या समस्या आणि दुष्काळी परिस्थितीशी संबंधित माहिती वेळेत प्रशासनापर्यंत पोहोचवावी.

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे प्रभावी निरीक्षण करण्यासाठी फेस-आधारित उपस्थिती आणि डिजिटल मॉनिटरिंग यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये;

  


दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील इयत्ता १० वी व १२ वीच्या

विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये;


-राज्य मंडळाच्या सूचना

मुंबई, दि. २९ : राज्यातील दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा शुल्क न घेता ऑनलाईन आवेदनपत्रे भरून घेण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत.

मदत व पुनर्वसन विभागाच्या २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने विशेष बाब म्हणून विविध सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीचाही समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी व इयत्ता १२ वीच्या परीक्षांसाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता आवेदनपत्रे भरून घेण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

याबाबतच्या पुढील सविस्तर सूचना राज्य मंडळाकडून स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार असून सर्व विभागीय मंडळांनी आपल्या कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना तात्काळ सूचना देण्यास सांगितले आहे. तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाकडे तातडीने सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.


00000

निर्णयामुळे पशुपालन आणि दुग्धव्यवसाय या शेतीपूरक व्यवसायांना भक्कम बळ मिळणार असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा

 महाराष्ट्र वैरण विकास धोरणामुळे पशुधनाला अधिक सक्षमपणे चारा उपलब्ध होईल

- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंड

मुंबई दि. २९ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र वैरण विकास धोरण जाहीर करण्यात आले असून या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता अधिक सक्षमपणे उपलब्ध होईल असा विश्वास राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीच्या हेतूने नियोजनात्मक विकासाचे महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. बैठकीत ‘महाराष्ट्र वैरण विकास धोरण’ जाहीर करण्यात आले आहे.यात राज्यातील पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता निश्चित होणार आहे. जिल्हानिहाय चारा उत्पादन, लागवडीयोग्य गवतांची यादी, वैरण उपयुक्त वृक्षांची यादी, सुधारित चारा पिके, पारंपरिक व अपारंपरिक चारा स्त्रोत यांचा विचार आणि विविध शासकीय वैरण विकास योजनांचे नियोजन यात करण्यात आले आहे.

            या निर्णयामुळे पशुपालन आणि दुग्धव्यवसाय या शेतीपूरक व्यवसायांना भक्कम बळ मिळणार असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा मिळेल असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.


 


दुष्काळ आढावा बैठकीस उपस्थिती


महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवर उपाययोजना सुचविण्याबाबत उप समितीच्या आढावा बैठकीस मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. अपुऱ्या पावसामुळे राज्यातील विविध भागांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाई, पीक नुकसान, चारा उपलब्धता तसेच दुष्काळग्रस्त भागातील नागरिक व शेतकरी बांधवांना आवश्यक मदत याबाबत यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच उपाययोजनांबाबत चर्चा झाली.

Tuesday, 29 September 2026

महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत दहा टक्के समांतर आरक्षण शासकीय, निमशासकीय गट क गणवेशधारी सेवांमध्ये भरतीचे धोरण निश्चित

 महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत दहा टक्के समांतर आरक्षण

  • शासकीय, निमशासकीय गट क गणवेशधारी सेवांमध्ये भरतीचे धोरण निश्चित

            महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांना शासनाच्या गट-क गणवेशधारी सेवांच्या भरतीत दहा टक्के समांतर आरक्षण देण्याचा, तसेच माजी अग्निविरांना शासकीय, निमशासकीय सेवेत दाखल करून घेण्यासाठी धोरण निश्चित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

            केंद्र शासनाने भारतीय सशस्त्र सेनेच्या - भूदल, नौदल आणि वायुदल यांच्याकरिता २०२२ मध्ये अग्निपथ सैन्यभरतीची योजना सुरु केली. या योजनेत १७.५ ते २१ वर्षे वयोगटातून चार वर्षाच्या कालावधीकरिता सैन्य दलांमध्ये भरती केली जाते. या अग्निवीरांना शिस्त, नेतृत्व, तांत्रिक कौशल्य, आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षा आणि संघटनात्मक कार्यपद्धतीचे कठोर प्रशिक्षण दिले जाते. चार वर्षाच्या सेवेनंतर कामगिरी, शिस्त आणि कौशल्य या निकषांच्या आधारे २५ टक्के अग्निवीरांना कायमस्वरुपी सैन्यदलात सामावून घेतले जाते.

            अशा माजी अग्निवीरांना गृह विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, वन विभाग, नगर विकास विभाग आदी प्रशासकीय विभागांतर्गत विविध आस्थापनांवरील गणवेशधारी गट-क सेवांमध्ये नियुक्ती देण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समिती स्थापन केली होती. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार धोरण निश्चित करण्यात आले असून, त्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यानुसार महाराष्ट्राचा रहिवाशी असलेल्या माजी अग्निवीरांकरिता १० टक्के समांतर आरक्षण देण्यात येणार आहे. हे आरक्षण १० % समांतर आरक्षण कप्पीकृत समांतर आरक्षण राहील. काही पदांच्याबाबतीत दहा टक्क्यांहून अधिक समांतर आरक्षणाची आवश्यकता वाटल्यास, सामाजिक आरक्षण अबाधित राहील या अटीच्या अधीन राहून ही मर्यादा वाढविण्याचे अधिकार उच्चस्तरीय सचिव समितीस देण्यात आले.

            या आरक्षणानुसार भरती करण्यात येणारी गणवेशधारी गट – क पदे संबंधित विभाग व आस्थापनानिहाय पुढील प्रमाणे : पोलीस महासंचालक व अधिनस्त आस्थापना - पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, राज्य पोलीस दल / राज्य राखीव पोलीस दल. महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा - कारागृह शिपाई. नागरी संरक्षण संचालनालय – अग्निशामक, बचावकर्ता, विमोचक, सहायक उपनियंत्रक.  महासंचालक, गृहरक्षक दल  - हवालदार निदेशक, कनिष्ठ निदेशक, यांत्रिक निदेशक, निदेशक, प्रर्वतक.  राज्य गुप्तवार्ता विभाग - पोलीस शिपाई खलाशी (इंजिन साईड) पोलीस शिपाई खलाशी (डेस्क साईड). राज्य उत्पादन शुल्क विभाग - जवान, जवान-नि-वाहनचालक. वन विभाग – वनरक्षक, नगर विकास विभाग (महानगरपालिका) - अग्निशामक विमोचक, अग्निशामक. 

            या पदाकरिंता घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेतून माजी अग्निवीरांना पूर्णपणे सूट मिळणार आहे. वयोमर्यादेत सूट, शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीईटी) व शारीरिक मानक चाचणी (पीएसटी) सूट, ज्येष्ठता व पदोन्नती तसेच प्रशिक्षण तसेच अन्य अनुभव, कौशल्ये याबाबत सविस्तर शासन निर्णय काढण्यास मान्यता देण्यात आली.

००००

Featured post

Lakshvedhi