Tuesday, 22 September 2026

मुंबई उपनगर जिल्ह्यातील गणेश मंडपात रंगला ‘लोकसंवाद’

 मुंबई उपनगर जिल्ह्यातील गणेश मंडपात रंगला ‘लोकसंवाद’

·         मुंबई उपनगरातील सांताक्रूझ, वाकोला व कलिना परिसरातील गणेश मंडळांमध्ये शासकीय योजना, सेवा आणि रोजगाराच्या संधींची जनजागृती

मुंबई, दि. 22 : गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणाला लोकजागृतीची जोड देत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकसंवाद 2026’ या उपक्रमातून मुंबई उपनगरातील गणेश मंडळांच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. सांताक्रूझ पूर्व आणि कलिना परिसरातील गणेश मंडळांमध्ये गणेशभक्त, रहिवासी, विद्यार्थी, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधून विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.

सांताक्रूझ (पूर्व) येथील सेंट मेरी स्कूलजवळील ‘सहयोग मित्र मंडळा’मध्ये अध्यक्ष अमर कुचिकुर्वी, खजिनदार संतोष अन्नारेड्डी आणि सचिव आदित्य अण्णारेड्डी यांच्या उपस्थितीत नागरिकांशी संवाद साधण्यात आला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांनी कसा घ्यावा, संबंधित विभागांकडून उपलब्ध सेवा कोणत्या आहेत आणि त्यासाठी आवश्यक प्रक्रिया याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

सांताक्रूझ (पूर्व) येथील संतोष हॉटेलजवळील ‘वाकोल्याचा मोरया’ – साई दृष्टी मित्र मंडळात अध्यक्ष विशाल पवार, खजिनदार प्रेम काटकर आणि सचिव वडीवेल पंढराम यांच्या उपस्थितीत लोकसंवादाचा उपक्रम राबविण्यात आला. गणेशोत्सवासाठी एकत्र आलेल्या नागरिकांपर्यंत शासनाच्या योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी या संवादाचा उपयोग करण्यात आला.

कालिना विद्यापीठासमोरील माणिपाडा परिसरातही ‘लोकसंवाद 2026’ला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘कालिना, माणिपाडाचा महाराजा’ – माणिपाडा रहिवासी सेवा संघ येथे अध्यक्ष विजय तांद्रा, खजिनदार समित कोटियन आणि सचिव केव्हिन कुराय्या यांच्या उपस्थितीत नागरिकांशी संवाद साधण्यात आला.

त्याच परिसरातील ‘माणिपाडाचा राजा’ – माणिपाडा सार्वजनिक मित्र मंडळात अध्यक्ष अनिल जाधव, खजिनदार संजय पवार आणि सचिव निशांत सालियन यांच्या उपस्थितीत शासकीय सेवा व योजनांची माहिती देण्यात आली.

‘विद्यानगरीचा विघ्नहर्ता’ – विद्यानगरी युथ ग्रुप, माणिपाडा येथे अध्यक्ष रोहित साहू, खजिनदार विकास साहू आणि सचिव राजू साहू यांच्या उपस्थितीत युवक व नागरिकांशी संवाद साधण्यात आला. विशेषतः युवकांना कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी आणि शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.

गणेश मंडप बनले माहितीचे व्यासपीठ

            गणेशोत्सवात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने गणेश मंडळांना भेट देत असल्याने गणेश मंडपांचे रूपांतर लोककल्याणकारी योजनांच्या माहितीच्या व्यासपीठात करण्याचा अभिनव प्रयत्न ‘लोकसंवाद 2026’च्या माध्यमातून करण्यात येत आहे. नागरिकांना केवळ योजनांची माहिती देण्याबरोबरच पात्रता, अर्जाची प्रक्रिया, संबंधित शासकीय कार्यालय आणि उपलब्ध सुविधांबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले.

युवक, विद्यार्थी, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय सेवा-सुविधांची माहितीही देण्यात आली. रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकतेशी संबंधित संधींची माहिती देत उपलब्ध संधींचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सहकार्य

‘लोकसंवाद 2026’ उपक्रमासाठी माहिती व जनसंपर्क विभागासोबत समाजकल्याण, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने सहभाग घेतला. विभागीय संपर्क अधिकारी ब्रिजकिशोर झंवर आणि संजय ओरके यांनी विविध गणेश मंडळांना भेटी देत लोकसंवाद उपक्रमाचे समन्वयन केले. यावेळी ग्राम महसूल अधिकारी घोषिता गोसावी, समाजकल्याण कार्यालयाच्या अतिरिक्त प्रकल्प अधिकारी नंदना गजभिये, तालुका समन्वयक आनंदा कांबळे, समतादूत सिद्धार्थ शिरसाट तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे जिल्हा समन्वयक परेश अपंडकर यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे यांच्या सहकार्यामुळे ही लोकसंवाद मोहीम मुंबई उपनगरात यशस्वीपणे राबविण्यात आली.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून उत्सव, जनजागृती आणि शासकीय योजनांची माहिती यांचा संगम साधत ‘लोकसंवाद 2026’ उपक्रम मुंबई उपनगरातील विविध भागात नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या सहकार्यामुळे शासनाच्या योजना आणि सेवा अधिक व्यापकपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यास मदत होत आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

 महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

 

            मुंबई, दि. 22 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार औरंगाबाद विभाग पदवीधर, पुणे विभाग पदवीधर, नागपूर विभाग पदवीधर, अमरावती विभाग शिक्षक आणि पुणे विभाग शिक्षक या पाच मतदारसंघांसाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ 6 डिसेंबर 2026 रोजी संपुष्टात येणार आहे.

या निवडणुकीसाठी 29 सप्टेंबर 2026 रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर, अर्जांची छाननी 7 ऑक्टोबर, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर 2026 आहे. मतदान 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत होईल. मतमोजणी 27 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात येणार असून, निवडणूक प्रक्रिया 31 ऑक्टोबर 2026 पूर्वी पूर्ण केली जाणार आहे.

महाराष्ट्रातील या पाच जागांमध्ये औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून अभिजीत वंजारी, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून किरण सरनाईक आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर या विद्यमान सदस्यांचा समावेश आहे.

भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकांची घोषणा केल्यापासून संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसह विधान परिषद निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहितेच्या तरतुदी लागू करण्याबाबत आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांमध्येही स्पष्टता देण्यात आली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

००००

सांस्कृतिक पर्यटनाला जागतिक स्तरावर चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील

 सांस्कृतिक पर्यटनाला जागतिक स्तरावर चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील

- राज्यपाल, जिष्णु देव वर्मा

 

            राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, गणेशोत्सवाला ‘महाराष्ट्राचा उत्सव’ म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली असून हा उत्सव साजरा करतांना पुणे फेस्टिव्हल विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करीत आहे. पर्यटन हे आर्थिक विकासाचे महत्त्वाचे साधन असून महाराष्ट्रातील सांस्कृतिक पर्यटनाला जागतिक स्तरावर चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पुणे फेस्टिव्हलला भविष्यात आणखी विस्तार देऊन जागतिक सांस्कृतिक महोत्सव म्हणून विकसित करण्याची मोठी क्षमता असल्याचेही राज्यपालांनी सांगितले.

 

            पुणे हे महाराष्ट्रासह देशाच्या इतिहासात आणि सांस्कृतिक जीवनात विशेष स्थान असलेले शहर आहे. महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची ही कर्मभूमी असून सामाजिक समता आणि महिला शिक्षणाची चळवळ येथे बळकट झाली. पुणे हे ज्ञान, माहिती-तंत्रज्ञान, उद्योग आणि सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित झाले असून ‘सांस्कृतिक राजधानी’ आणि ‘उत्सवांचे शहर’ म्हणूनही त्याची ओळख निर्माण झाली आहे, असे राज्यपाल वर्मा म्हणाले.

 

            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या ‘सेवा समर्पण अभियानांतर्गत’ महोत्सवाच्या काळात विविध सेवाभावी उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

अत्याधुनिक vovo बसेस २५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या किमान पाच ते सहा तासांच्या प्रवासासाठी आरामदायी ४५ आसनी

 दिवसा आरामदायी प्रवास, रात्री शयनयानाची सुविधा

            २५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या किमान पाच ते सहा तासांच्या प्रवासासाठी आरामदायी ४५ आसनी बसेस, तर रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ३० किंवा ४५ शयनयान क्षमतेच्या बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवसा तसेच रात्रीच्या प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

मोबाईलवरून तिकीट बुकिंग; खासगी ॲपवरही आरक्षणाची सुविधा

            नव्या आराम बससेवेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांना डिजिटल पद्धतीने सहज आरक्षण करता येणार आहे. एसटीच्या अधिकृत ऑनलाईन आरक्षण व्यवस्थेबरोबरच खासगी डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरूनही या बसेसचे तिकीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महामंडळाचा मानस आहे. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकावर येऊन तिकीट काढण्याची आवश्यकता राहणार नाही. मोबाईलवरून बसची वेळ, मार्ग आणि उपलब्ध आसनांची माहिती घेऊन घरबसल्या आरक्षण करता येणार आहे. डिजिटल तिकीट प्रणालीमुळे एसटीची आराम बससेवा आधुनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेशी अधिक प्रभावीपणे जोडली जाणार आहे.

खासगी संस्थेकडून आतिथ्य व्यवस्थापन

            प्रवाशांना केवळ आरामदायी बसच नव्हे, तर हाय-एंड प्रवासी सेवांचा अनुभव मिळावा, यासाठी नव्या व्होल्वो बसेसमधील आतिथ्य व्यवस्थापनासाठी खासगी संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. प्रवाशांचे स्वागत, बसमधील मूलभूत सुविधा, स्वच्छता, प्रवाशांना आवश्यक माहिती आणि सेवा-सुविधांचे व्यवस्थापन यामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाचा वापर केला जाणार आहे. यामुळे एसटीच्या पारंपरिक प्रवासी सेवेबरोबरच हॉस्पिटॅलिटी आणि ग्राहकसेवेच्या आधुनिक संकल्पनेचा समावेश होणार असून, प्रवाशांना अधिक सुखकर आणि दर्जेदार प्रवासाचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

 

 

मागणी असलेल्या मार्गांचा सर्वंकष अभ्यास

            महाराष्ट्रातील तसेच आंतरराज्य मार्गांवर खासगी आराम बससेवेला मोठी मागणी असलेल्या मार्गांचा सर्वंकष अभ्यास करण्यात येणार आहे. प्रवाशांची संख्या, प्रवासाची मागणी, उपलब्ध सेवा, मार्गाचे अंतर, प्रवासाचा कालावधी आणि आर्थिक व्यवहार्यता यांचा विचार करून स्पर्धात्मक मार्गांचे सर्वेक्षण केले जाईल. त्यानंतर नव्या व्होल्वो आणि शयनयान बसेससाठी मार्ग निश्चित करण्यात येतील.

‘लालपरी’चा आरामदायी प्रवासाचा नवा अध्याय

            ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे घोषवाक्य अधिक व्यापक आणि आधुनिक स्वरूपात प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. एसटी महामंडळाची ताकद म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्यातील विस्तृत जाळे आणि प्रवाशांचा असलेला विश्वास. या विश्वासाला आधुनिक सुविधा, डिजिटल आरक्षण व्यवस्था आणि दर्जेदार आतिथ्यसेवेची जोड देऊन लांब पल्ल्याच्या प्रवासी सेवेत नवे मानदंड निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

२०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात ऑनलाईन बुकिंगपासून दर्जेदार आतिथ्य व्यवस्थेपर्यंत प्रवाशांना आधुनिक सुविधा

  २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात

ऑनलाईन बुकिंगपासून दर्जेदार आतिथ्य व्यवस्थेपर्यंत प्रवाशांना आधुनिक सुविधा

-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

            मुंबई, दि. २० : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सर्वसामान्यांची विश्वासार्ह लोकवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाने आता लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासाच्या क्षेत्रातही नवी झेप घेण्याची तयारी केली आहे. खासगी आराम बससेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी लवकरच महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या २०० अत्याधुनिक, वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल करण्यात येणार आहेत. यामध्ये सुरक्षितता, आरामदायीपणा, आधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार प्रवासी सेवेचा संगम या नव्या सेवेत पाहायला मिळणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच एसटी महामंडळाच्या टप्प्यामध्ये व्होल्वो बसेस समाविष्ट होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

            मंत्री सरनाईक म्हणाले की, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सध्या अनेक प्रवासी अधिक भाडे देऊन खासगी आराम बससेवेला पसंती देतात. वातानुकूलित सुविधा, आरामदायी आसनव्यवस्था, कमी प्रवास वेळ आणि रात्रीच्या प्रवासातील सुविधा यामुळे खासगी आराम बससेवेचा स्वतंत्र प्रवासी वर्ग निर्माण झाला आहे. या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी केवळ पर्याय उपलब्ध करून न देता खासगी आराम बससेवेच्या तोडीची आधुनिक, विश्वासार्ह आणि प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करणारी सेवा देण्याचे उद्दिष्ट एसटीने निश्चित केले आहे.

विकसित भारतासाठी राज्यांची आर्थिक क्षमता बळकट करणे आवश्यक

 विकसित भारतासाठी राज्यांची आर्थिक क्षमता बळकट करणे आवश्यक

– वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल

 

            नवी दिल्ली, दि. १९ : ‘विकसित भारत २०४७’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यांची आर्थिक क्षमता बळकट करणे, वित्तीय शिस्त कायम ठेवणे आणि राज्यांच्या उत्पादन, पर्यटन, व्यापार व कृषी क्षेत्राला राष्ट्रीय तसेच जागतिक बाजारपेठेशी जोडणे आवश्यक आहे, अशी भूमिका राज्यमंत्री (वित्त) ॲड. आशिष जयस्वाल यांनी नवी दिल्ली येथे मांडली.

 

            केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वतीने भारत मंडपम येथे १८ व १९ सप्टेंबर रोजी ‘Financing India’s Journey towards Viksit Bharat’ या विषयावर राज्यांचे वित्तमंत्री व वित्त सचिवांची दोन दिवसीय परिषद झाली. महाराष्ट्राच्या वतीने राज्यमंत्री ॲड. जयस्वाल, अपर मुख्य सचिव (वित्त) विकासचंद्र रस्तोगी आणि सचिव (वित्तीय सुधारणा) विजय वाघमारे यामध्ये सहभागी झाले.

 

            परिषदेत वित्त राज्यमंत्री जयस्वाल यांनी राज्यांमध्ये व्यापार-वाणिज्यासाठी सक्षम संस्थात्मक व्यवस्था, विदेशी पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी केंद्र-राज्य समन्वय आणि निर्याताभिमुख शेतीसाठी ‘Asset Crop–Liability Crop’ संकल्पना मांडली. जिल्हानिहाय निर्यातक्षम पिकांची निवड करून बाजारपेठेच्या मागणीनुसार उत्पादनाचे नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. कृषी निर्यातीसाठी स्वतंत्र डिजिटल पोर्टल तसेच Crop-wise SOP/Export Pathway विकसित करण्याची सूचनाही त्यांनी केली.

 

            केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी झालेल्या चर्चेत ‘विकसित महाराष्ट्र २०४७’, SASCI, ॲग्रीस्टॅक, शेतकरी केंद्रीत कृषी योजना, शेत-पाणंद रस्ते आणि शेतमजुरांसाठी सामाजिक सुरक्षा यांसह विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यमंत्री जयस्वाल यांनी दिली. त्यांच्या सूचनांचे सीतारामन यांनी अभिनंदन करून केंद्र स्तरावर धोरणात्मक विचार करण्याची ग्वाही दिली.

 

            विकसित भारतासाठी केंद्र-राज्य समन्वय, वित्तीय शिस्त, नावीन्यपूर्ण वित्तपुरवठा आणि राज्यांच्या स्थानिक सामर्थ्याला राष्ट्रीय व जागतिक बाजारपेठेशी जोडण्यावर महाराष्ट्राने या परिषदेत भर दिला.

महिला व बालकांच्या संरक्षण, पोषण, शिक्षण व सक्षमीकरणासाठीच्या विविध योजना आणि सेवांची माहिती

 महिला व बालकांच्या संरक्षण, पोषण, शिक्षण व सक्षमीकरणासाठीच्या विविध योजना आणि सेवांची माहिती


            महिला व बालकांच्या संरक्षण, पोषण, शिक्षण, सक्षमीकरण आणि पुनर्वसनासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत विविध योजना व सेवा राबविण्यात येतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वन स्टॉप सेंटर, शक्ती सदन, आदर्श अंगणवाडी, बेबी केअर किट, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आणि पोषण अभियान या योजनांच्या माध्यमातून महिला व बालकांना विविध स्वरूपाचे सहाय्य दिले जाते.

            अंगणवाडी सेवांद्वारे पूरक पोषण, आरोग्य तपासणी, लसीकरण, पूर्व-प्राथमिक शिक्षण तसेच पोषणविषयक मार्गदर्शन दिले जाते. महिलांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत समुपदेशन व कायदेशीर मार्गदर्शन, तर बालकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी तक्रारींवर कार्यवाही केली जाते. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गट, कौशल्यविकास आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यात येते. महिला हेल्पलाईन १५५२०९ आणि बाल हेल्पलाईन १०९८ या सुविधांबाबतही यावेळी माहिती देण्यात आली.


 

Featured post

Lakshvedhi