देशातील सर्वात मोठी सोलर इकोसिस्टीम नागपूरात
उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांचा उद्योजकांसोबत संवाद
नागपूर दि. २0 : देशातील सर्वात मोठी सोलर मॉडेल इकोसिस्टीम नागपूर येथे आकार घेत आहे. येत्या दहा वर्षात नागपूर हे सोलर इकोसिस्टीम’चे हब होणार आहे, त्यामुळे उद्योजकांनी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील अवादा समूहाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली तसेच सोलर मॉडेल निर्मितीची पहाणी केली, त्यानंतर उद्योजकांशी संवाद साधला.
अवादा उद्योग समूहाचे संस्थापक व अध्यक्ष विनीत मित्तल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेतली, यावेळी राज्यातील पायाभूत सुविधा औद्योगिक विकास आणि मुंबईच्या भविष्यातील बदलांवर उद्योजकांसोबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संवाद साधला.
नवीन नागपूरच्या प्रकल्पाविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, येथे स्मार्ट इंडस्ट्रीसाठी इकोसिस्टीम तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी पन्नास टक्के पेक्षा जागा अधिकृत झाली असून गुंतवणुकीलाही प्रोत्साहन मिळत आहे. देशातील पहिले सोलर मॉडेल अतिरिक्त बुटीबोरी क्षेत्रात तयार होत असून अवादा समूहाला त्यांच्या प्रकल्पाच्या विस्तारासाठी २५० एकर जागेची आवश्यकता असून ती देण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केली. अतिरिक्त बुटीबोरी क्षेत्रात उद्योगांसाठी अधिगृहीत केलेल जमीन संपली असून तिसरी अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक वसाहत तयार करावयाची आहे, तसेच वर्धा जिल्ह्यातील नवीन औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादन सुरू असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
अवादा हा सोलर मॉडेल बनवणारा सर्वात मोठा सुपर उद्योग असून, ॲडव्हान्स इंटिग्रेशनमुळे स्मार्ट मॉड्युलची निर्मिती होत आहे. भूमिपूजनानंतर वेगाने प्रकल्प पूर्ण झाला असून आज पाच हजार कामगार येथे काम करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.