महाराष्ट्रातील बायोचार, कृषिवनीकरण आणि मृदा कार्बन वाढविणे यांसारख्या निसर्गाधारित उपाययोजनांशी संबंधित संभाव्य प्रकल्पांवरील श्वेतपत्रिका मे 2026 मध्ये युनायटेड किंग्डम येथे आयोजित कार्बन रिमूव्हल्स इन्व्हेस्टर कॉन्क्लेव्हमध्ये सादर करण्यात आली. यानंतर न्यूयॉर्क क्लायमेट वीक 2026 च्या पार्श्वभूमीवर 22 सप्टेंबर रोजी संभाव्य गुंतवणूकदारांच्या समूहासोबत चर्चा आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्राला शाश्वत विमान इंधन (एसएएफ) उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. या अनुषंगाने सीकिनेटिक्स आणि स्मार्ट फ्रेट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने एक श्वेतपत्रिका तयार करण्यात आली असून, महाराष्ट्र एसएएफ आघाडी स्थापन करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत या आघाडीला मूर्त स्वरूप मिळण्याची अपेक्षा आहे.
या परिषदेत जाहीर झालेल्या गुंतवणूक उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील स्वच्छ ऊर्जा, हरित उद्योग, कार्बन व्यवस्थापन, कृषी मूल्यसाखळी आणि शाश्वत वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक आकर्षित होण्याबरोबरच राज्याच्या हरित अर्थव्यवस्थेला नवी गती मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.