Saturday, 5 September 2026

कन्हान नगरपरिषद क्षेत्रातील नागरी सुविधांसाठी प्रस्ताव सादर करावे

 कन्हान नगरपरिषद क्षेत्रातील नागरी सुविधांसाठी प्रस्ताव सादर करावे

 -राज्यमंत्री माधुरी मिसाळ

            मुंबई, दि. ४ : कन्हान नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करावी. आठवडी बाजार, स्मशानभूमी, भाजीपाला बाजार आणि उद्यान उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक आहे त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावा, असे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

            कन्हान नगरपरिषदेतील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या.

            राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, आठवडी बाजार आणि स्मशानभूमीसाठी शासकीय जमीन उपलब्ध नसल्यास खासगी जमीन अधिग्रहित करण्याकरिता निधीची तरतूद करण्यात यावी. स्मशानभूमीच्या विकासासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा. नगरोत्थान योजनेंतर्गत टप्प्याटप्प्याने अथवा कामांचे वर्गीकरण करून निधी वितरणाबाबत तपासणी करून नियमानुसार निधी उपलब्ध करून द्यावा.

            बसस्थानकासाठी आरक्षित ठिकाणी बसस्थानक उभारण्याचा प्रस्ताव सादर करावा. मौजा कन्हान येथे ॲमेनिटी स्पेससाठी आरक्षित असलेल्या जागेवर उद्यान उभारण्यासंदर्भात तपासणी करावी. तसेच दुकान गाळे आणि व्यावसायिक गाळे उभारण्यासाठी जागा उपलब्ध असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.

            आरक्षित जागांवर अतिक्रमण असल्यास ते नियमानुसार हटविण्याची कार्यवाही करावी, असे निर्देशही राज्यमंत्री मिसाळ यांनी दिले.

चैत्यभूमी ते इंदूमिलपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करा

 चैत्यभूमी ते इंदूमिलपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करा

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबई, दि. ४ : दादर येथील चैत्यभूमीपासून इंदूमिलपर्यंत जाणाऱ्या विद्यमान रस्त्याच्या रुंदीकरणाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करावे. रस्त्याच्या जागेच्या हस्तांतरण प्रक्रियेसाठी महसूल विभाग तसेच एमएमआरडीएचे अभिप्राय तत्काळ मिळविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पाठपुरावा करावा, अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिल्या.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी अशोकस्तंभ ते चैत्यभूमी मुख्य स्तूप या विद्यमान रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या ६ डिसेंबर रोजी या रस्ता रुंदीकरणाच्या कामाचे उद्घाटन करण्याचे नियोजन असून, त्या अनुषंगाने संबंधित सर्व विभागांनी समन्वय साधून याबाबत पाठपुरावा करावा. रुंदीकरणासाठी आवश्यक जागेचे प्रस्ताव ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने पाठवून संबंधितांनी प्रत्यक्ष जाऊन यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

सध्याच्या रस्त्याच्या समुद्राकडील बाजूची जमीन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करणे आणि चैत्यभूमीपासून जी/उत्तर विभागातील इंदूमिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित भव्य स्मारकाला जोडल्यामुळे लाखो अनुयायांना याचा फायदा होईल. इंदूमिलपर्यंत रस्ता तयार करण्यासह रस्त्यालगतच्या परिसराचे सुशोभीकरण करणे, याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

महसूल विभाग, पर्यावरण विभाग, मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि एमएमआरडीएने या रस्त्याच्या उभारणीसाठी सकारात्मक कार्यवाही करावी. या कामाच्या प्रगतीचा आढावा पुढील महिन्यात संबंधित विभागांकडून घेण्यात येईल, असेही उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए, महसूल विभागाचे प्रशासकीय अधिकारी व चैत्यभूमी व्यवस्थापक समिती पदाधिकारी उपस्थित होते.

अवयवदानात महाराष्ट्राची उल्लेखनीय घोडदौड हजारो रुग्णांना मिळाले नवजीवन अवयवदानाबाबत राज्यभर व्यापक प्रबोधन मोहीम राबविण्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

 अवयवदानात महाराष्ट्राची उल्लेखनीय घोडदौड

हजारो रुग्णांना मिळाले नवजीवन

अवयवदानाबाबत राज्यभर व्यापक प्रबोधन मोहीम राबविण्याचे

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

मुंबई,दि.४- महाराष्ट्रात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंमलात आल्यापासून आणि २०११ व २०१४ मधील सुधारित कायद्यांनुसार राज्यात अवयवदानाचा आलेख सातत्याने उंचावत असून हजारो रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. राज्य शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, प्रादेशिक अवयव व उती प्रत्यारोपण समन्वय संस्था तसेच मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्रांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे राज्यभरात अवयवदानाबाबत मोठी सकारात्मकता दिसून येत आहे. यामुळे राज्यभर व्यापक अवयवदान प्रबोधन मोहीम राबविण्याचे आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.

राज्यात १९९५ पासून ऑक्टोबर २०२६ पर्यंत झालेल्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांची आकडेवारी पाहिल्यास या क्षेत्रात मोठे यश मिळाल्याचे दिसून येते. या कालावधीत एकूण १७,३२५ जिवंत व्यक्तींमधील अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडल्या असून त्यामध्ये १४,९४९ मूत्रपिंड (किडनी) आणि २,३७६ यकृत (लिव्हर) प्रत्यारोपणांचा समावेश आहे. तसेच मरणोत्तर अवयवदानातून एकूण ३,३७३ गरजू रुग्णांना नवीन आयुष्य मिळाले आहे. यामध्ये १८५३ मूत्रपिंड, ९८७ यकृत, २२० हृदय, ६३ फुफ्फुस आणि नेत्र व उतींसह २५० इतर अवयवांच्या यशस्वी रोपणाचा समावेश आहे. सध्या राज्यात विविध अवयवांसाठी प्रतीक्षारत असलेल्या रुग्णांमध्ये मूत्रपिंडासाठी ४०७५, यकृतासाठी ८८८, हृदयासाठी ६३, फुफ्फुसासाठी २४, स्वादुपिंडासाठी १५, हातासाठी ११ आणि लहान आतड्यासाठी ८ रुग्ण प्रतीक्षेत आहेत, ज्यांच्यासाठी अवयवदानाचे आवाहन सातत्याने केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

चैत्यभूमी ते इंदूमिलपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करा

 चैत्यभूमी ते इंदूमिलपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करा

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबई, दि. ४ : दादर येथील चैत्यभूमीपासून इंदूमिलपर्यंत जाणाऱ्या विद्यमान रस्त्याच्या रुंदीकरणाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करावे. रस्त्याच्या जागेच्या हस्तांतरण प्रक्रियेसाठी महसूल विभाग तसेच एमएमआरडीएचे अभिप्राय तत्काळ मिळविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पाठपुरावा करावा, अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिल्या.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी अशोकस्तंभ ते चैत्यभूमी मुख्य स्तूप या विद्यमान रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या ६ डिसेंबर रोजी या रस्ता रुंदीकरणाच्या कामाचे उद्घाटन करण्याचे नियोजन असून, त्या अनुषंगाने संबंधित सर्व विभागांनी समन्वय साधून याबाबत पाठपुरावा करावा. रुंदीकरणासाठी आवश्यक जागेचे प्रस्ताव ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने पाठवून संबंधितांनी प्रत्यक्ष जाऊन यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

सध्याच्या रस्त्याच्या समुद्राकडील बाजूची जमीन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करणे आणि चैत्यभूमीपासून जी/उत्तर विभागातील इंदूमिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित भव्य स्मारकाला जोडल्यामुळे लाखो अनुयायांना याचा फायदा होईल. इंदूमिलपर्यंत रस्ता तयार करण्यासह रस्त्यालगतच्या परिसराचे सुशोभीकरण करणे, याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

महसूल विभाग, पर्यावरण विभाग, मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि एमएमआरडीएने या रस्त्याच्या उभारणीसाठी सकारात्मक कार्यवाही करावी. या कामाच्या प्रगतीचा आढावा पुढील महिन्यात संबंधित विभागांकडून घेण्यात येईल, असेही उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए, महसूल विभागाचे प्रशासकीय अधिकारी व चैत्यभूमी व्यवस्थापक समिती पदाधिकारी उपस्थित होते.

ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स क्षेत्रात पुणे देशात अग्रेसर असणार

 ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स क्षेत्रात पुणे देशात अग्रेसर असणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·        मॅग्नमच्या ग्लोबल बिझनेस सोल्युशन्स सेंटरचे वाकडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

·         मॅग्नमच्या केंद्रातून एक हजारांहून अधिक रोजगार

·          कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलित तंत्रज्ञान व लॉजिस्टिक्सचा वापर

            पुणे, दि. 4 : ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सचे (जीसीसी) प्रमुख केंद्र म्हणून पुणे वेगाने विकसित होत असून, पुण्यात आतापर्यंत 130 पेक्षा अधिक जीसीसी कार्यरत झाले आहेत. आगामी एका वर्षात ही संख्या 800 पेक्षा अधिक होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जीसीसी क्षेत्रात पुण्याने देशात प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवावे, हे राज्य शासनाचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

            वाकड येथील ईओएन वेस्ट आयटी पार्कमध्ये मॅग्नम आईस्क्रीम कंपनीच्या ग्लोबल बिझनेस सोल्युशन्स सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार अमित गोरखे, शंकर जगताप, उद्योग, गुंतवणूक व सेवा विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबळगन, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक व धोरण सल्लागार कौस्तुभ धवसे, मॅग्नम आईस्क्रीम कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी अभिजीत भट्टाचार्य, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह उद्योजक आणि कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

            महाराष्ट्र हे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्ससाठी देशातील प्रमुख आणि पसंतीचे गुंतवणूक केंद्र बनले असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले,  पुण्यात जागतिक कंपन्यांकडून ग्लोबल व्यवसाय सेवा केंद्रे सुरू करण्याला मिळणारा प्रतिसाद हा शहरातील उद्योगपूरक वातावरण आणि उपलब्ध कुशल मनुष्यबळाची पावती आहे. मॅग्नमचे पुण्यातील केंद्र एक हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणार आहे.

एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना ‘बार्टी’कडून १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य

 एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना

बार्टीकडून १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य

मुंबई, दि. ४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची प्रभावी तयारी करता यावी, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यामार्फत एकरकमी १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी १० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा. तसेच, अर्जाची स्व-साक्षांकित प्रत आवश्यक कागदपत्रांसह ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत बार्टी’, पुणे कार्यालयाकडे पोस्ट अथवा कुरियरद्वारे पाठविणे बंधनकारक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी व अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक असून, २५ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी उमेदवाराची वयोमर्यादा कमाल ३५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

अर्जासोबत जात प्रमाणपत्र अथवा जात वैधता प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र, ओळख पुरावा तसेच उमेदवाराच्या स्वतःच्या नावे असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकाची प्रत जोडणे आवश्यक आहे. केवळ ऑनलाईन अथवा केवळ ऑफलाईन पद्धतीने सादर करण्यात आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अर्जाची स्व-साक्षांकित प्रत आवश्यक कागदपत्रांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), २८/२८, क्वीन्स गार्डन, कॅम्प, पुणे ४११००१ या पत्त्यावर पाठवावी.

या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी ०२०-२६३३३३३० अथवा ०२०-२६३३३३३९ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सदनातील भव्य गणेशोत्सवाचे राज्यपालांना निमंत्रण

 महाराष्ट्र सदनातील भव्य गणेशोत्सवाचे राज्यपालांना निमंत्रण

            नवी दिल्ली, दि. ४ : राजधानी दिल्लीतील कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आलेल्या भव्य सार्वजनिक गणेशोत्सवाचे  निमंत्रण महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांनी दिले. यावेळी गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची माहितीही त्यांना देण्यात आली.

            सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्यावतीने महाराष्ट्र सदनात १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत हा भव्य उत्सव आयोजित करण्यात आला आहे. डॉ. श्वेता सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली साकारत असलेल्या या गणेशोत्सवातून राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या समृद्ध कला, संस्कृती आणि परंपरेचे दिमाखदार दर्शन घडणार आहे.

            गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी, १४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता श्रींची मिरवणूक, त्यानंतर सकाळी ११ वाजता विधिवत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. सायंकाळी जुन्या महाराष्ट्र सदनात भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाच्या कालावधीत दररोज सकाळी ९ वाजता आणि सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची महाआरती होणार आहे.

            उत्सवात मराठी नाट्य, चित्रपटगीते, गझल, लोककला, लावणी, नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी दिल्लीकरांना अनुभवता येणार आहे. १५ सप्टेंबर रोजी आकाशवाणी रंगभवन येथे भरत जाधव व अन्य कलाकारांचा गाजलेला मराठी नाट्यप्रयोग सही रे सहीसादर होणार आहे. १७ सप्टेंबर रोजी वैभव जोशी आणि संदीप खरे यांचा विशेष कार्यक्रम, तर १८ सप्टेंबर रोजी संतोष भांगरे प्रस्तुत महाराष्ट्राची लोककलाहा कार्यक्रम रंगणार आहे.

            १९ सप्टेंबर रोजी श्री सत्यनारायण पूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी गझल नवाज भीमराव पांचाळे यांचा मराठी गझल कार्यक्रम होईल. २० सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर येथे वैशाली सामंत, ऋषिकेश रानडे, शरद दाते व अन्य गायकांचा मराठी चित्रपट गीते हा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

            याशिवाय पाककला स्पर्धा, भरतनाट्यम, खेळ पैठणीचा, लावणी तसेच हिंदी-मराठी गायन आणि नृत्याचे विविध कार्यक्रमही उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. गणेशोत्सवाची सांगता २५ सप्टेंबर रोजी झांज पथकासह श्रींच्या भव्य विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. जुन्या महाराष्ट्र सदनातून निघणाऱ्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने गणेशभक्त सहभागी होणार आहेत.

            उत्सवातील सर्व कार्यक्रम विनामूल्य असून, १५, १७, १८, २० आणि २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे. दिल्लीतील नागरिक आणि गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भक्ती, परंपरा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचा हा अनोखा संगम अनुभवावा, असे आवाहन निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांनी केले आहे.

Featured post

Lakshvedhi