Friday, 28 August 2026

आदिवासी मुला-मुलींसाठी वसतिगृह उभारण्याची ग्वाही

 विद्यार्थ्यांच्या सुविधांना प्राधान्य

            आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके म्हणाले, पुणे येथे विद्यार्थ्यांसोबत झालेल्या प्रदीर्घ चर्चेत विविध प्रश्न मांडण्यात आले. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंशी चर्चा करून विद्यापीठ परिसरात आदिवासी मुला-मुलींसाठी वसतिगृह उभारण्याची ग्वाही देण्यात आली आहे. येत्या काळात पुणे विद्यापीठ परिसरात हे वसतिगृह उभारण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. जात वैधता प्रमाणपत्राबाबतही संबंधित सर्व विभागांना लेखी सूचना देण्यात आल्या असून, वैधता प्रमाणपत्राशिवाय पदवी न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

            विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही गांभीर्याने घेण्यात आला आहे. साप किंवा विंचू चावण्याच्या घटनांसंदर्भात संबंधित परिसरातील वैद्यकीय महाविद्यालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक दक्षता व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि चांगले शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य

 आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

विविध मागण्यांवर शासनाची सकारात्मक कार्यवाही

            मुंबई दि. २७ : आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी आता नियमित शिक्षण, अध्ययन-अध्यापन आणि आपल्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी माध्यमांशी संवाद साधताना केले.

            आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके म्हणाले, शासकीय वसतिगृहांच्या प्रवेशाच्या वयोमर्यादेपासून ते वसतिगृहांची जागा, जात वैधता प्रमाणपत्र, आरोग्य सुविधा, पेसा अंतर्गत नोकरभरती आणि भोजन व्यवस्थेपर्यंत विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर शासनाने तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. आदिवासी विकास विभागामार्फत राज्यात ४९० शासकीय वसतिगृहे सुरू आहेत. वसतिगृह प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित करण्याच्या उद्देशाने ५ ऑगस्टला शासन निर्णय काढून ती २६ वर्षे करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या भावना आणि सूचनांचा विचार करून १४ ऑगस्टला वयोमर्यादा ३० वर्षे करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांशी सविस्तर संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर ५ आणि १४ ऑगस्टचा शासन निर्णय २५ ऑगस्टला रद्द करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याचे मंत्री डॉ. वुईके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित · नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी नियोजन · नागरिक नेपाळ-भारत सीमेच्या दिशेने रवाना

 नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित

·         नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी नियोजन

·         नागरिक नेपाळ-भारत सीमेच्या दिशेने रवाना

 

मुंबई, दि. २७ :- नागपूर जिल्ह्यातील श्री स्वामी महाराज यांच्या समूहासोबत नेपाळमध्ये गेलेले ११० नागरिक सुरक्षित असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. २२ ऑगस्ट २०२६ रोजी नेपाळमधील काठमांडू येथे पर्यटन/धार्मिक भेटीच्या अनुषंगाने गेलेल्या नागरिकांमध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

 

नेपाळमध्ये २६ ऑगस्ट २०२६ रोजीच्या महापूराच्या घटनेचा या समूहातील नागरिकांवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिले आहे.

 

 नागरिकांशी सातत्याने संपर्क असून त्यांच्या सद्यस्थितीबाबत नियमितपणे माहिती घेतली जात आहे.नागपूर जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत हे सर्व नागरिक काठमांडू येथील माहेश्वरी समाज येथे सुरक्षितपणे वास्तव्यास असून, नेपाळ प्रशासनाकडून देखील त्यांना आवश्यक ती मदत व सहकार्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.

 

या नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी नियोजित बसऐवजी नेपाळ प्रशासनाच्या सहकार्याने पर्यायी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार हे नागरिक २७ ऑगस्ट २०२६ रोजी काठमांडू येथून जनकपूर, नेपाळ-भारत सीमेच्या दिशेने रवाना झाले असून, २८ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटेपर्यंत जनकपूर येथे पोहोचण्याचे नियोजन आहे. त्यानंतर जनकपूर येथून भारतात प्रवेश करून पुढे पटना येथे पोहोचण्याचे नियोजन आहे.

 

पटना येथून दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी दानापूर रेल्वे स्थानकावरून नागपूरकडे येण्यासाठी त्यांची रेल्वेगाडी नियोजित आहे. त्यानुसार या सर्व नागरिकांना सुरक्षितपणे नागपूर येथे परत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

 

नागरिकांच्या नागपूर येथील नातेवाईकांशीही जिल्हा प्रशासनाचा संपर्क असून, त्यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार समूहातील सर्व नागरिक सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी संपर्क क्र. 7775938591 व अंकुश लुडेकर, रा. प्रेमनगर, इतवारी, नागपूर व आशितोष चौधरी, रा. मानेवाडा, नागपूर हे दोन नातेवाईक जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत.

 

नेपाळमधील सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सध्या पूर्णपणे सुरक्षित असून जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात आहे. त्यांच्या परतीच्या प्रवासाबाबतही जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ते समन्वय व देखरेख ठेवण्यात येत आहे.


नेपाळमध्ये अडकलेल्या १०६ प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरूकाठमांडू–जनकपूर प्रवासासाठी चार मिनी बसची व्यवस्था

 नेपाळमध्ये अडकलेल्या १०६ प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरू

·        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने काठमांडूजनकपूर प्रवासासाठी

चार मिनी बसची व्यवस्था


             मुंबई, दि. २७ : नेपाळमधील काठमांडू येथे अडकलेल्या नागपूरसह महाराष्ट्रातील १०६ प्रवाशांचा सुरक्षित परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे काठमांडूहून जनकपूरपर्यंत प्रवासासाठी चार मिनी बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

            या प्रवाशांना २८ ऑगस्ट रोजी बिहारमधील दानापूर येथून संमित्रा एक्सप्रेसने महाराष्ट्रात परतायचे नियोजित होते. मात्र, नेपाळमधील सद्यस्थितीमुळे काठमांडूहून मोठ्या बसने पुढील प्रवास करणे शक्य नसल्याने दानापूरपर्यंत वेळेत पोहोचण्याची अडचण निर्माण झाली होती.

 

            प्रवाशांची ही अडचण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास येताच त्यांनी प्रवासी योगेश गावंडे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय, नेपाळमधील स्थानिक प्रशासन आणि नेपाळचे खासदार संदीप राणा यांच्याशी समन्वय साधला. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानंतर खासदार संदीप राणा यांनी काठमांडूहून जनकपूरपर्यंत चार मिनी बसची व्यवस्था केली. त्यानुसार सर्व १०६ प्रवासी काठमांडूहून जनकपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. प्रवासी उद्या सकाळी जनकपूरमार्गे भारत-नेपाळ सीमेवर पोहोचणार असून, तेथून त्यांना बिहारमधील दानापूरपर्यंत नेण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. दानापूर येथून रेल्वेने महाराष्ट्रात परतण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, सर्व प्रवासी सुरक्षितपणे महाराष्ट्रात परत येईपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या संपर्कात राहून आवश्यक समन्वय साधत आहेत.

 

            मुख्यमंत्र्यांनी केलेल्या तातडीच्या मदतीबद्दल योगेश गावंडे आणि सहप्रवाशांनी कृतज्ञता व्यक्त केली असून मुख्यमंत्र्यांनी स्वतः संपर्क साधून अडचण जाणून घेतली आणि तातडीने प्रवासाची व्यवस्था केल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

०००००


 

वृत्त क्र. 3302


Thursday, 27 August 2026

कल्याणेश्वर मंदिर परिसरात पार्किंगची व्यवस्था वाढवावी

 कल्याणेश्वर मंदिर परिसरात पार्किंगची व्यवस्था वाढवावी

            नागपूर येथील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या कल्याणेश्वर मंदिर महाल परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याचा आढावा घेताना आवश्यकता विचारात घेऊन पार्किंगची व्यवस्था वाढविण्यात यावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तथापि, अशा परिसरात यांत्रिक पार्किंगचा वापर व्यवहार्य ठरत नसल्याने साध्या पार्किंगची व्यवस्था असावी, असे ते म्हणाले.

            नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यावेळी यापूर्वी शिखर समितीच्या बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांनुसार मंदिर विकास आराखड्यात करण्यात आलेल्या बदलांची माहिती दिली. त्यानुसार बेसमेंटमधील यांत्रिक वाहनतळ वगळून त्याठिकाणी दोन तळघरांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच निवासी व्यवस्था वगळण्यात आली असून मंदिराच्या शिखराचे बांधकाम प्रस्तावात समाविष्ट करण्यात आले आहे. या सुधारणांनंतर प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च ७२.४९ कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या खर्चास शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

औढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास आराखडा

 औढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास आराखडा

            औंढा नागनाथ मंदिराच्या संवर्धन आणि जीर्णोद्धाराचे काम पुरातत्व आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाणार असून यामध्ये मंदिराच्या आवारातील नंदी मंडप, ओवरी आणि दर्शन बारी या मंदिराच्या आवारातील वास्तूंचे संवर्धन केले जाणार आहे. यासह हरीहर तलाव आणि परिसरातील मंदिरांचे संवर्धन आणि जीर्णोद्धार केला जाणार आहे. मंदिर परिसरासाठी बाह्य विद्युतीकरण, सीसीटीव्ही, रोषणाई आणि उद्यान विकास देखील केला जाणार आहे. भक्त निवासाची नव्याने उभारणी केली जाणार असून २५०० क्षमतेचा प्रतीक्षा कक्ष असणार आहे. भाविकांना कमी वेळेत दर्शन मिळावे, यादृष्टीने याचे नियोजन केले जाणार असून दर्शन रांगेत भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. याचबरोबर मंदिराचे वैभव कायम राखून मोठी झाडे लावणे, परिसराला दगडी बांधकामासारखा साज देणे, परिसरात सापडलेल्या जुन्या मूर्त्या भाविकांना पाहता याव्यात यासाठी म्युझियम तयार करणे, भाविकांना माहिती देण्यासाठी माहिती केंद्र उभारणे आदी कामे केली जाणार असल्याची माहिती हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहूल गुप्ता यांनी सादरीकरणाद्वारे दिली. 

औंढा नागनाथ मंदिरावरील शिल्पकला नैसर्गिक रंगसंगतीत साकारावी५० कोटी मंजूर

 औंढा नागनाथ मंदिरावरील शिल्पकला नैसर्गिक रंगसंगतीत साकारावी

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•           औंढा नागनाथसह नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिर विकास आराखड्याला शिखर समितीची मंजूरी

•       आंबेगाव येथील शिवसृष्टीसाठी ५० कोटी मंजूर

 

            मुंबई, दि. २७ : औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्‌वाचे क्षेत्र आहे. या मंदिरावरील पुरातन शिल्पकलेचे जतन करत नैसर्गिक रंगांचा वापर करुन त्याचे संवर्धन करण्यात यावे. तलाव आणि मंदिर परिसरात वापरले जाणारे दगड आणि इतर साहित्य त्याचप्रमाणे एकूणच सर्व कामे दर्जेदार असावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

              मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत श्री क्षेत्र औंढा नागनाथ तसेच नागपूर येथील कल्याणेश्वर मंदिराच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली. तसेच पुण्याजवळ आंबेगाव येथील शिवसृष्टी थीम पार्कच्या चौथ्या टप्प्याच्या कामासाठी ५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार संतोष बांगर, प्रवीण दटके, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            बैठकीत औंढा नागनाथ मंदिराच्या १९३ कोटी ५५ लाख २० हजार ४७४ कोटींच्या तर, कल्याणेश्वर मंदिराच्या ७२.४९ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली. आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्पाच्या प्रगतीचा यावेळी आढावा घेण्यात आला. यातील चौथ्या टप्प्यासाठीच्या कामासाठी ५० कोटींच्या निधीलाही मंजूरी देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास करताना मंदिराचे वैभव जपण्याचे निर्देश दिले. तर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जतन आणि संवर्धनाबरोबरच भाविकांसाठी चांगल्या सोयी-सुविधा निर्माण करण्याची सूचना केली.

Featured post

Lakshvedhi