गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी
सर्व शासकीय यंत्रणांचा सहभाग महत्त्वाचा
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गणेशोत्सव उत्साह, शिस्त आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी शासन, प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने होण्यासाठी पोलीस, महापालिका आणि संबंधित विभागांनी नियोजन केले असून मंडळांच्या सूचनांचाही त्यात समावेश करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मुंबईतील सुमारे 1 हजार 850 किलोमीटर लांबीचे रस्ते काँक्रीटचे झाले आहेत. गणेशाच्या आगमन आणि विसर्जन मार्गांवर खड्डे राहणार नाहीत, याची महापालिका प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी. स्थानिक पातळीवरील त्रुटी तातडीने दूर कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. गणेश मंडळांना पाच वर्षांची परवानगी देण्याबाबतही कार्यवाही करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.