Saturday, 15 August 2026

महिलांसाठी प्रशिक्षण आणि शाश्वत रोजगार

 महिलांसाठी प्रशिक्षण आणि शाश्वत रोजगार

आयपीई ग्लोबलचे मुख्य संचालन अधिकारी एम. के. पद्म कुमार

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण केवळ कौशल्य विकासाने साध्य होऊ शकत नाही, तर त्यासाठी प्रशिक्षण आणि शाश्वत रोजगार यांच्यात जाणीवपूर्वक, सुसूत्रपणे जोडलेला दुवा असणे आवश्यक आहे असं आम्ही आयपीई ग्लोबलच्या पातळीवर नेहमीच मानत आले आहोत. आयपीई ग्लोबल आणि महाराष्ट्र शासन यांच्यातील ही भागीदारी त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. भारतभरातील राज्य सरकारांसोबत जवळून काम करण्याच्या आमच्या अनुभवातून आम्हाला हे दिसून आले आहे की, जेव्हा विविध विभाग एका समान उद्दिष्टाभोवती एकत्र येतात, आणि योग्य तांत्रिक सहाय्य व उत्तरदायित्वाआर्थिक स्थैर्याबरोबरच   त्यांना सुरक्षित, सन्मानजनक आणि दीर्घकाळ टिकणारा रोजगार मिळावा, यासाठी राज्यासोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत.

0000

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे शासनाचे उद्दिष्ट:

 महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे शासनाचे उद्दिष्ट:

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा

अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा म्हणाल्या की,महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि त्यांना शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे राज्य शासनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. आयपीई ग्लोबल लिमिटेडसोबतची ही भागीदारी महाराष्ट्रातील तरुणींना कौशल्य प्रशिक्षणापासून रोजगारापर्यंतचा प्रभावी मार्ग उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल. राज्यातील विविध विभागांमध्ये समन्वय साधून महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जाईल. खासगी क्षेत्रातील उद्योगांनी महिलांना रोजगार देण्याबरोबरच सुरक्षित, सर्व समावेशक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्रशिक्षण, वसतिगृहे सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी  शासन प्रयत्नशील आहे. २०३० पर्यंत तीन लाख तरुणींना  रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित घटकांचे सहकार्य घेतले जाईल. या अभियानामुळे महिलांचा रोजगारात सहभाग वाढून त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला आणि राज्याच्या सर्वसमावेशक विकासाला चालना मिळेल.

मराठवाड्याला दुष्काळमुक्त करु

 मराठवाड्याला दुष्काळमुक्त करु

                                                        -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली
  • युवाशक्तीच्या योगदानातून घडेल विकसित भारत;

 

छत्रपती संभाजीनगर, दि.१४- युवाशक्तीचे नवसंशोधनात मोठे योगदान आहे. त्या सामर्थ्यावर उद्याचा विकसित भारत, विकसित महाराष्ट्र घडेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला देश बलशाली व संपन्न देश म्हणून जगात लौकीक प्राप्त करीत आहे. मराठवाडासुद्धा सुजलाम सुफलाम करुन दुष्काळमुक्त करु, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

            हर घर तिरंगा अभियानअंतर्गत महात्मा जोतिबा फुले पुतळा संभाजीपेठ ते क्रांती चौक दरम्यान आयोजित भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्यात मुख्यमंत्री फडणवीस सहभागी झाले होते.  या रॅलीत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, इमाव कल्याण मंत्री अतुल सावे, रोहयो व पणन मंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खा. अशोक चव्हाण, खा.स्मिता वाघ, आमदार रवींद्र चव्हाण, आ. प्रशांत बंब,आ. अनुराधा चव्हाण, आ.मंगेश चव्हाण, आ. राम भदाणे तसेच महापौर समीर राजुरकर आदी मान्यवर तसेच उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिवादन केले. त्यानंतर रॅलीस सुरुवात झाली. रॅलीचा समारोप क्रांती चौकात झाला. तेथे उपस्थित जनसमुदायास संबोधित करतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, तिरंगा आमची आन बान आणि शान आहे. ह्या तिरंग्यासाठी हजारो लोकांनी बलिदान दिले. हा तिरंगा हिच आमची खरी ओळख आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी संदेश दिला, ९ ते १५ ऑगस्ट पर्यंत तिरंगा यात्रा काढून देशप्रेमाने ओत प्रोत मातृभूमीचे दर्शन घडवू. त्यानुसार आज हा जनसमुदाय तिरंग्याच्या प्रेमासाठी एकत्र आला आहे.आज छत्रपती संभाजीनगर मध्ये तिरंगा रॅली गर्दीचे रेकॉर्ड तोडले, तिरंग्याचे वादळ मला दिसते आहे,अशा शब्दात त्यांनी छत्रपती संभाजीनगरवासियांचे कौतुक केले.

 

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात गेल्या दशकात देशाला प्रगतीपथावर नेले. जगात बलशाली देश म्हणून ओळख निर्माण झाली, जगात ४ थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून स्थान निर्माण केलं. आपल्या राज्याची अर्थ व्यवस्था ५० लाख कोटीपर्यंत नेली. देश बदलतोय, राज्य बदलतंय, मराठवाडाही बदलतोय. आमचा संकल्प आहे मराठवाड्याच्या पुढच्या पुढीला दुष्काळ पाहू देणार नाही. कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी उजनी मार्गे मराठवाड्यात आणून इथला भाग सुजलाम सुफलाम करू. आपण तिसरी स्टार्ट अप इको सिस्टीम तयार केली. त्यात तरुणाईचे योगदान मोठे आहे. नव संशोधनात तरुणाई अग्रेसर आहे. त्याबळावरच आपला भारत विकसित भारत म्हणून वाटचाल करीत आहे, असा संदेश त्यांनी दिला.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्वोत्तम संविधान दिलं. आपल्या हक्कासोबत कर्तव्य लक्षात ठेवावी आणि उत्तम नागरिक बनावे, असे उत्तम नागरिक बनून समाजाची ताकद बना. आपल्या मराठवाड्याला देशापेक्षा १३ महिने उशिरा स्वातंत्र्य मिळालं. निजामच्या राजवटीतून मोकळा श्वास घेण्यासाठी हजारो देशभक्तांनी बलिदान दिलं. त्यांचे स्मरण आपण करू. आज आपण एकप्रतिज्ञा करू. आपल्या देशासाठी, राज्यासाठी समाजासाठी जगू.

 

सभास्थानी प्रारंभी वंदेमातरम, राज्यगीत झाले व राष्ट्रगीताने सभेचा समारोप झाला. या रॅलीत मोठ्या संख्येने स्वातंत्र्य सैनिक, राजकीय सामाजिक कार्यकर्ते, युवक, युवती सहभागी झाले होते. रॅलीत सहभागी विविध कलापथक, ढोल लेझीम पथकांनी, संबळ वाद्य पथकांनी लक्ष वेधून घेतले. देशभक्तीपर घोषणांनी रॅली मार्गाचा परिसर दुमदुमून गेला होता.

0000

 


 

संघर्ष, समन्वय आणि आंबेडकरी विचारांचे प्रभावी नेतृत्व म्हणजे रामदास आठवले

 संघर्ष, समन्वय आणि आंबेडकरी विचारांचे प्रभावी नेतृत्व म्हणजे रामदास आठवले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

·         केंद्रीय राज्यमंत्रीपदी १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांचा नागरी सत्कार

 

मुंबई, दि. १४ - सामाजिक चळवळ, संघटनबांधणी आणि लोकाभिमुख राजकारणाच्या माध्यमातून रामदास आठवले यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली असून रामदास आठवले म्हणजे संघर्ष, समन्वय आणि आंबेडकरी विचारांचे प्रभावी नेतृत्व आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवले यांचा गौरव केला.

 

केंद्रीय राज्यमंत्रीपदी १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा यशवंतराव चव्हाण केंद्र येथे झालेल्या कार्यक्रमात नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार प्रवीण दरेकर, रामदास आठवले यांचे कुटुंबीय आणि चाहते यावेळी उपस्थित होते.

 

संघर्षातून घडलेले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी अखंड निष्ठा राखणारे रामदास आठवले हे देशातील सर्वसमावेशक नेतृत्वाचे प्रभावी प्रतीक आहेत. दलित पँथर चळवळीपासून राष्ट्रीय राजकारणापर्यंतचा त्यांचा प्रवास हा जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणाऱ्या कार्यकर्त्याचा प्रवास असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सामाजिक चळवळ, संघटनबांधणी आणि लोकाभिमुख राजकारणाच्या माध्यमातून आठवले यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. संघर्षातून नेतृत्व घडले असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कधीही कटुता आली नाही. सर्व समाजघटकांशी संवाद, सर्व पक्षांतील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि लोकांना आपलेसे करण्याची त्यांची शैली ही त्यांच्या यशामागील मोठी ताकद आहे.

Friday, 14 August 2026

१५ ते २९ वर्षे वयोगटातील आणखी ३ लाख तरुणींना खासगी क्षेत्रातील वेतनाधारित रोजगार उपलब्ध

 महाराष्ट्रातील ३ लाख तरुणींना रोजगार संधींसाठी

राज्यस्तरीय अभियान राबविण्यात येणार

·         सामंजस्य कराराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वागत

 

मुंबई, दि. १४ : महाराष्ट्रातील महिलांचा श्रमशक्ती सहभाग वाढविण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि  आयपीई  ग्लोबल लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. आयपीई ग्लोबल लिमिटेड या संस्थेने महाराष्ट्र शासनासोबत भागीदारी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या भागीदारीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले असून संबंधित विभागांकडून यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता  मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात हा उपक्रम महाराष्ट्रात यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील महिला श्रमशक्तीमध्य‍े  सातत्याने वाढ झाली असून तो, १८ ते २९ या वयोगटासाठी, २०१८-१९ मधील २०.२ टक्क्यांवरून २०२३-२४ मध्ये २६.६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. महिलांचे कौशल्यविकास, उद्योजकतेला प्रोत्साहन आणि उपजीविकेच्या संधींचा विस्तार करण्यासाठी राज्य शासनाच्या विविध उपक्रमांचा यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे.

 

या पार्श्वभूमीवर १५ ते २९ वर्षे वयोगटातील आणखी ३ लाख तरुणींना खासगी क्षेत्रातील वेतनाधारित रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. विविध संबंधित विभागांच्या प्रयत्नांमध्ये समन्वय साधून हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी राज्य व विभागीय स्तरावर तांत्रिक सहाय्य देणे, उद्दिष्टे निश्चित करणे, आवश्यक साधने व मदत उपलब्ध करून देणे तसेच खासगी क्षेत्राला त्यांच्या मनुष्यबळात महिलांचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रोत्साहित करणे प्रस्तावित आहे.

ड्रोन उद्योगासाठी मंत्रीस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार

 ड्रोन उद्योगासाठी मंत्रीस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

 

मुंबई, दि. १३ : राज्यातील ड्रोन उद्योगाच्या विकासासाठी धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, उद्योजकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे आणि त्यांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

 

            ड्रोन क्षेत्रातील उद्योजकांच्या सूचना व अपेक्षा जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. 

            राज्यातील विविध धोरणांमध्ये संशोधन व विकास, स्वदेशी घटक निर्मिती, चाचणी, पेटंट तसेच अनुदानाबाबत असलेल्या तरतुदी एकत्रित करून ड्रोन उद्योगासाठी पॉलिसी ऑफ पॉलिसीजतयार करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राज्याचे ड्रोन धोरण इतर राज्यांच्या तुलनेत सक्षम असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग दरम्यान अखंड पूर्व-पश्चिम वाहतूक मार्ग प्रस्थापित

 थोडक्यात सांताक्रुज - चेंबूर जोड मार्ग टप्पा २

 पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग दरम्यान अखंड पूर्व-पश्चिम वाहतूक मार्ग प्रस्थापित करण्यासाठी सांताक्रूझ-चेम्बूर जोडरस्ता व त्याच्या विस्तार प्रकल्पांचा विकास करण्यात आला आहे. सांताक्रूझ-चेम्बूर लिंक रोड टप्पा २ अंतर्गत भारत नगर रोड (मुंबई विद्यापीठ परिसर) ते वाकोला जंक्शन दरम्यानचा १.४० किमी लांबीचा उन्नत मार्ग हा या जोड मार्गामधील शेवटचा व अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे.

 

या मार्गामुळे बीकेसी आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग यांच्यात थेट व अखंड संपर्क निर्माण होईल. यात १७.२ मीटर आणि ८.५ मीटर रुंदीच्या मार्गिका आहेत.

 

कलिना, वाकोला आणि कलानगर येथील वाहतूक कोंडी टळेल व प्रवासाचा वेळ सुमारे ३५ मिनिटांनी कमी होईल. सांताक्रूझ - चेंबूर जोडणी पूर्ण झाल्यामुळे या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर सिग्नलमुक्त पूर्व-पश्चिम जोडणी उपलब्ध होणार आहे.


Featured post

Lakshvedhi