Friday, 14 August 2026

१५ ते २९ वर्षे वयोगटातील आणखी ३ लाख तरुणींना खासगी क्षेत्रातील वेतनाधारित रोजगार उपलब्ध

 महाराष्ट्रातील ३ लाख तरुणींना रोजगार संधींसाठी

राज्यस्तरीय अभियान राबविण्यात येणार

·         सामंजस्य कराराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वागत

 

मुंबई, दि. १४ : महाराष्ट्रातील महिलांचा श्रमशक्ती सहभाग वाढविण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि  आयपीई  ग्लोबल लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. आयपीई ग्लोबल लिमिटेड या संस्थेने महाराष्ट्र शासनासोबत भागीदारी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या भागीदारीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले असून संबंधित विभागांकडून यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता  मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात हा उपक्रम महाराष्ट्रात यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील महिला श्रमशक्तीमध्य‍े  सातत्याने वाढ झाली असून तो, १८ ते २९ या वयोगटासाठी, २०१८-१९ मधील २०.२ टक्क्यांवरून २०२३-२४ मध्ये २६.६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. महिलांचे कौशल्यविकास, उद्योजकतेला प्रोत्साहन आणि उपजीविकेच्या संधींचा विस्तार करण्यासाठी राज्य शासनाच्या विविध उपक्रमांचा यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे.

 

या पार्श्वभूमीवर १५ ते २९ वर्षे वयोगटातील आणखी ३ लाख तरुणींना खासगी क्षेत्रातील वेतनाधारित रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. विविध संबंधित विभागांच्या प्रयत्नांमध्ये समन्वय साधून हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी राज्य व विभागीय स्तरावर तांत्रिक सहाय्य देणे, उद्दिष्टे निश्चित करणे, आवश्यक साधने व मदत उपलब्ध करून देणे तसेच खासगी क्षेत्राला त्यांच्या मनुष्यबळात महिलांचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रोत्साहित करणे प्रस्तावित आहे.

ड्रोन उद्योगासाठी मंत्रीस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार

 ड्रोन उद्योगासाठी मंत्रीस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

 

मुंबई, दि. १३ : राज्यातील ड्रोन उद्योगाच्या विकासासाठी धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, उद्योजकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे आणि त्यांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

 

            ड्रोन क्षेत्रातील उद्योजकांच्या सूचना व अपेक्षा जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. 

            राज्यातील विविध धोरणांमध्ये संशोधन व विकास, स्वदेशी घटक निर्मिती, चाचणी, पेटंट तसेच अनुदानाबाबत असलेल्या तरतुदी एकत्रित करून ड्रोन उद्योगासाठी पॉलिसी ऑफ पॉलिसीजतयार करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राज्याचे ड्रोन धोरण इतर राज्यांच्या तुलनेत सक्षम असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग दरम्यान अखंड पूर्व-पश्चिम वाहतूक मार्ग प्रस्थापित

 थोडक्यात सांताक्रुज - चेंबूर जोड मार्ग टप्पा २

 पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग दरम्यान अखंड पूर्व-पश्चिम वाहतूक मार्ग प्रस्थापित करण्यासाठी सांताक्रूझ-चेम्बूर जोडरस्ता व त्याच्या विस्तार प्रकल्पांचा विकास करण्यात आला आहे. सांताक्रूझ-चेम्बूर लिंक रोड टप्पा २ अंतर्गत भारत नगर रोड (मुंबई विद्यापीठ परिसर) ते वाकोला जंक्शन दरम्यानचा १.४० किमी लांबीचा उन्नत मार्ग हा या जोड मार्गामधील शेवटचा व अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे.

 

या मार्गामुळे बीकेसी आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग यांच्यात थेट व अखंड संपर्क निर्माण होईल. यात १७.२ मीटर आणि ८.५ मीटर रुंदीच्या मार्गिका आहेत.

 

कलिना, वाकोला आणि कलानगर येथील वाहतूक कोंडी टळेल व प्रवासाचा वेळ सुमारे ३५ मिनिटांनी कमी होईल. सांताक्रूझ - चेंबूर जोडणी पूर्ण झाल्यामुळे या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर सिग्नलमुक्त पूर्व-पश्चिम जोडणी उपलब्ध होणार आहे.


मेट्रो मार्ग २ब (डीएननगर ते मंडाले) च्या टप्पा १अ मधील हे एक महत्वाचे स्थानक आहे. चेंबूर उपनगरीय

 थोडक्यात चेंबूर मेट्रो स्टेशन

मेट्रो मार्ग २ब (डीएननगर ते मंडाले) च्या टप्पा १अ मधील हे एक महत्वाचे स्थानक आहे. चेंबूर उपनगरीय रेल्वे स्थानक आणि मोनोरेल स्थानकाशी जोडणी उपलब्ध असल्याने भविष्यातील बहुविध वाहतूक केंद्र बनणार आहे. पूर्व द्रुतगती महामार्ग, सायन-पनवेल महामार्ग, ईस्टर्न फ्रीवे आणि सांताक्रूझ-चेम्बूर लिंक रोड यांच्या जवळ आहे. प्लॅटफॉर्मची लांबी १८५ मीटर (८ डब्यांच्या मेट्रो गाड्यांसाठी अनुकूल) असून लिफ्ट, सरकते जिने, सीसीटीव्ही, दिव्यांगांसाठी सुविधा आणि प्रथमोपचार कक्ष. स्थानकाची रचना 'ग्रीन बिल्डिंग' संकल्पनेनुसार करण्यात आली आहे. मेट्रो स्थानकाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांशी जोडणी असणार आहे. यामध्ये उपनगरीय रेल्वे स्थानक, मोनोरेल स्थानक व मोनोरेलद्वारे महालक्ष्मी स्टेशनशी जोडणीचा समावेश आहे.

 

वांद्रे- कुर्ला संकुलाच्या जी ब्लॉकला पूर्व द्रुतगती मार्गासोबत जोडणाऱ्या उड्डाणपुलाला ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी

 वांद्रे- कुर्ला संकुलाच्या जी ब्लॉकला पूर्व द्रुतगती मार्गासोबत जोडणाऱ्या उड्डाणपुलाला ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले नाव देणे ही बॅरिस्टर भोसले यांच्या कार्याची पावती आहे. त्यांच्या कार्य काळामध्ये स्वातंत्र्यसैनिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती, मुलींकरिता दहावीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याचा निर्णय, संभाजीनगर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे उद्घाटन त्यांच्या काळात झाले. प्रत्येक विषयाची उत्तम जाण असलेला नेता म्हणून बॅरिस्टर भोसले यांच्याकडे पाहिले जाते. मुंबई शहराच्या जडणघडणीमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अत्यंत मोलाची भूमिका बजावली असल्याचे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

 


देशातील सर्वात लांब दुहेरी भुयारी बोगदा

 देशातील सर्वात लांब दुहेरी भुयारी बोगदा

ठाणे ते बोरिवली या दुहेरी भुयारी मार्गाच्या रूपामध्ये पायाभूत सुविधांच्या बाबतीत देशात पुन्हा एक नवीन रेकॉर्ड महाराष्ट्र बनवित आहे. देशातील सर्वात लांब आणि जमिनीखाली असणारा बोगदा राहणार आहे.  ठाणे ते बोरिवली या २३ किलोमीटर लांब मार्गाची लांबी दुहेरी भुयारी मार्गामुळे ११ किलोमीटरवर येणार आहे. यामुळे प्रवासाच्या वेळेत बचत होणार असून अवघ्या १२ ते १५ मिनिटांमध्ये ठाणे ते बोरिवली गाठता येणार आहे. या भुयारी मार्गामध्ये पहिल्या बोगद्यासाठी नायक टीबीएम यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आला आहे, तर दुसऱ्या बोगद्यासाठी अर्जुना टीबीएम आज कार्यान्वित होत आहे. यामुळे दोन्ही दुहेरी भुयारी मार्गाचे काम समांतर पद्धतीने सुरू राहील. बोरिवली बाजूकडील दुहेरी बोगद्यामध्येदेखील लवकरच दोन टीबीएम कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

 


चेंबूर मेट्रो स्थानकामुळे मुंबईकरांना मोठी जोडणी

 चेंबूर मेट्रो स्थानकामुळे मुंबईकरांना  मोठी जोडणी

चेंबूर मेट्रो स्थानकामुळे मुंबईकरांना एक मोठी व चांगली दळणवळणाची जोडणी मिळणार आहे. मुंबई महानगरात मेट्रो मार्गिका विकसित करण्याचे काम वेगाने सुरू असून यावर्षी ६० ते ७० किलोमीटर मार्गे ह्या सेवेत येतील. मुंबई महानगरात ९० लाख प्रवासी उपनगरीय लोकलच्या माध्यमातून प्रवास करतात आणि जवळपास ७० लाख प्रवाशांची क्षमता आपण मेट्रोच्या माध्यमातून विकसित करीत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi