मुंबईच्या दळणवळणाला गतिमानतेचा 'बुस्टर' मिळणार
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· मुंबईकरांच्या सेवेत २०२७ मध्ये मेट्रो सारख्या उपनगरीय लोकल ट्रेन*
· भारत नगर रोड (विद्यापीठ परिसर) ते वाकोला जंक्शन या सांताक्रुज - चेंबूर जोडमार्ग टप्पा दोन उन्नत मार्गिकेचे लोकार्पण
· चेंबूर मेट्रो स्थानकाचे लोकार्पण
· ठाणे ते बोरिवली दुहेरी मार्गाच्या प्रकल्पातील 'टीबीएम अर्जुना'चा शुभारंभ
· माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले उड्डाणपूल नामकरण
मुंबई, दि. १३: केंद्र शासनाने उपनगरीय लोकलची मेट्रोच्या धर्तीवर निर्मिती करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे वंदे भारतसारखी आधुनिक रेल्वे बनवित असलेल्या कारखान्यात स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित, स्वच्छ अशा मेट्रो सारख्या लोकल ट्रेनची निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई महानगराच्या दळणवळणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असून लोकार्पण होणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे मुंबईतील दळणवळणाला 'गतिमानतेचा बूस्टर' मिळाला असल्याचा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सह्याद्री अतिथी गृह येथे दूरदृष्य प्रणाली द्वारे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दोन पायाभूत सुविधांचे ई-लोकार्पण, ठाणे ते बोरिवली दुहेरी भुयारी मार्गाच्या प्रकल्पातील ठाणे बाजूकडील टीबीएम अर्जुनाचा शुभारंभ आणि वांद्रे कुर्ला संकुलाच्या जी ब्लॉकला पूर्व द्रुतगती मार्गासोबत जोडणाऱ्या उड्डाणपूलाला माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले उड्डाणपूल नामकरण कार्यक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.