Tuesday, 11 August 2026

किल्लारीच्या श्री निळकंठेश्वर साखर कारखान्याला १८ कोटींचे कर्ज,

 किल्लारीच्या श्री निळकंठेश्वर साखर कारखान्याला १८ कोटींचे कर्ज,

एनसीडीसीकडे प्रस्ताव पाठवणार

लातूर जिल्ह्यातील किल्लारी (ता. औसा) येथील श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून कर्ज घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

लातूर जिल्ह्यातील किल्लारी (ता. औसा) येथील निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून भांडवली खर्च व खेळत्या भांडवलासाठी कर्ज मिळावे यासाठीचा प्रस्ताव साखर आयुक्त, पुणे यांना सादर केला होता.

त्यानुसार या कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली. कारखान्याचा १८ कोटी ९ हजार रुपयांच्या कर्ज मागणीचा प्रस्ताव राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. कारखान्याच्या प्रस्तावास विशेष बाब म्हणून व हे पूर्व उदाहरण म्हणून गृहीत धरले जाणार नाही आणि फक्त एकवेळचे उदाहरण म्हणून गृहीत धरण्यात येईल या अटीवर मान्यता देण्यात आली आहे.

नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांतील कंपन्यांदरम्यानच्या जमीन हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क माफ

 नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांतील कंपन्यांदरम्यानच्या

 जमीन हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क माफ

नवीकरणीय उर्जा प्रकल्पांसाठी मुख्य कंपनीद्वारे प्रथमतः जमीन खरेदी करताना देय मुद्रांक शुल्काचा भरणा करण्यात येतो मात्र त्यानंतर स्थापन करण्यात येणाऱ्या ग्रुप कंपनी किंवा स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीद्वारे या जमिनीच्या होणाऱ्या हस्तांतरणात द्यावे लागणारे मुद्रांक शुल्क पूर्ण माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती मिळावी आणि कंपन्यांवरील अतिरिक्त आर्थिक भार कमी करून प्रकल्प तातडीने सुरू करण्यास मदत मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय महाराष्ट्र नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा साठवणूक धोरण-२०२५ ते २०३५-३६ यामध्ये लागू करण्याचाही निर्णय घेतला आहे.

नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांकरिता जमीन खरेदीच्या हस्तांतरण शुल्कात सूट

 नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांकरिता जमीन खरेदीच्या हस्तांतरण शुल्कात सूट

राज्यात नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती मिळावी यासाठी नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांकरिता खरेदी करण्यात आलेल्या जमिनीच्या हस्तांतरण शुल्कात २५ टक्के सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

महाराष्ट्र नवीकरणीय उर्जा आणि ऊर्जा साठवणूक धोरण-२०२५ ते २०३५-३६ यामध्ये महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीनविषयक कायद्यांतील तरतुदीनुसार २५ टक्के हस्तांतरण शुल्क सूट समाविष्ट करण्यात येणार आहे. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांकरिता खरेदी करण्यात आलेल्या जमिनीचे ग्रुप कंपनीअंतर्गत अथवा उपकंपनीअंतर्गत हस्तांतरणासाठी चालू वार्षिक मूल्यदर तक्त्यानुसार जमिनीच्या बाजारमूल्याच्या २५ टक्के दराने हस्तांतरण शुल्क जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करावे लागत होते. यामुळे प्रकल्पांवर आर्थिक भार पडत असल्याने आणि ऊर्जा प्रकल्प लांबणीवर पडत असल्याने या शुल्कात सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

ही सूट देतानाच जमिनीचा अंतिम वापर नवीकरणीय ऊर्जा विकासासाठी करणे आवश्यक आहे. जर एखाद्या कंपनीने अंतर्गत हस्तांतरणाच्या नावाखाली शुल्क सूट मिळविली आणि नंतर ती जमीन इतर दुसऱ्या कारणासाठी वापरली किंवा विकली तर हस्तांतरण शुल्काची रक्कम व्याजासह वसूल करण्यात येणार आहे.

0000


विलंबाने मिळणाऱ्या भूसंपादन मोबदल्याच्या व्याज दरात सुधारणा pl share

 विलंबाने मिळणाऱ्या भूसंपादन मोबदल्याच्या व्याज दरात सुधारणा

भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यास विलंब झाल्यास त्यावर दिल्या जाणाऱ्या व्याजामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. आता हा व्याजदर रिझर्व्ह बँक व्यावसायिक बँकांना ज्या व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देते त्यापेक्षा एक टक्का अधिकचा असणार आहे.

शासनाच्या विविध विकास प्रकल्प, योजनांसाठी संपादित करण्यात येत असलेल्या जमिनीचा प्रकल्पाची निकड विचारात घेऊन आगाऊ ताबा घेणे आवश्यक ठरते. निवाड्यापूर्वी जमीन शासनास सुपूर्द करण्यात येत असल्याने भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम-२०१३ नुसार बाधित व्यक्तीला मोबदल्याच्या रकमेवर विलंबामुळे व्याज दिले जाते. हे व्याजदर व बँकेचे कर्जावरील प्रचलित व्याजदर यामध्ये तफावत असल्याने अधिनियमातील कलम ७२ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार  भारतीय रिझर्व्ह बँक व्यावसायिक बँकांना ज्या दराने कर्ज देते त्यामध्ये एक टक्का अधिक दराने व्याज देण्यास येणार आहे. त्यानुसार भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ७२ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.

0000

वंदे मातरम्'मधून स्वातंत्र्याचा गौरव आणि देशभक्तीचा जागर; सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 15 ऑगस्ट रोजी मुंबईत देशभक्तीपर गीत व नृत्यावर आधारित विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 वंदे मातरम्'मधून स्वातंत्र्याचा गौरव आणि देशभक्तीचा जागर;

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 15 ऑगस्ट रोजी मुंबईत देशभक्तीपर गीत व

नृत्यावर आधारित विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 

मुंबई, दि. 10 : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त 'वंदे मातरम्' या देशभक्तीपर गीत व नृत्यावर आधारित विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता श्रीमती भुरीबेन लक्ष्मीचंद गोलवाला सभागृह, कामा लेन, घाटकोपर (पश्चिम), मुंबई येथे करण्यात आले आहे. कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी विनामूल्य प्रवेश असून, देशभक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

            भारताचा स्वातंत्र्यदिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमान, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणारा दिवस आहे. स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, शौर्य आणि बलिदानाची कृतज्ञतेने आठवण करून देत राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि संविधानिक मूल्यांप्रती निष्ठा दृढ करण्याचा संदेश या कार्यक्रमातून दिला जाणार आहे.

            'वंदे मातरम्' या कार्यक्रमामध्ये देशभक्तीपर गीत, संगीत आणि नृत्याविष्कारांच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यवीरांचे योगदान, राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय संस्कृतीचे वैभव प्रभावीपणे सादर करण्यात येणार आहे. देशभक्ती, कला आणि संस्कृतीचा सुरेख संगम अनुभवण्याची संधी या कार्यक्रमातून रसिकांना लाभणार आहे.

            या कार्यक्रमात भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट्स आणि एस. पी. एन. दोशी महाविद्यालय यांच्या कलाकारांकडून देशभक्तीपर गीत व नृत्यावर आधारित विशेष सांस्कृतिक सादरीकरण करण्यात येणार आहे. विविध कलाविष्कारांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, शौर्य, त्याग आणि भारतीयत्वाचा प्रेरणादायी संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

फाळणी : एक शोकांतिका' मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त 14 ऑगस्ट रोजी दादर येथे विशेष दीर्घांक नाट्यप्रयोग

 फाळणी : एक शोकांतिका' मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त 14 ऑगस्ट रोजी

दादर येथे विशेष दीर्घांक नाट्यप्रयोग

 

            मुंबई, दि. 10 : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला 'फाळणी : एक शोकांतिका' या विशेष दीर्घांक नाट्यप्रयोगाचे आयोजन शुक्रवार, 14 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 8.00 वाजता छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर, दादर, मुंबई येथे करण्यात आले आहे. या नाट्यप्रयोगास विनामूल्य प्रवेश असून, प्रवेशिका नाट्यगृहावर उपलब्ध असतील.

            फाळणीच्या काळात अनेक नागरिकांना विस्थापन, सामाजिक अस्थिरता आणि विविध आव्हानांना सामोरे जावे लागले. या ऐतिहासिक कालखंडाचे स्मरण करताना त्यातून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि परस्पर ऐक्याची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश या नाट्यप्रयोगातून देण्यात येणार आहे.

            'फाळणी : एक शोकांतिका' या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून फाळणीच्या काळातील सामाजिक आणि मानवी परिस्थितीचा प्रभावी रंगमंचीय आविष्कार सादर करण्यात येणार आहे. इतिहासातील या महत्त्वपूर्ण कालखंडाचा मागोवा घेताना मानवी मूल्ये, सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रहिताचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे. भूतकाळातील अनुभवांतून प्रेरणा घेत अधिक एकसंध, समताधिष्ठित आणि सुसंवादी समाजनिर्मितीचा संदेश या कलाकृतीतून देण्यात येणार आहे.

            या नाट्यप्रयोगाचे लेखन डॉ. प्रकाश झा यांनी केले असून, दिग्दर्शन प्रमोद शेलार यांचे आहे. प्रभावी अभिनय, आशयपूर्ण मांडणी आणि रंगमंचीय सादरीकरणाच्या माध्यमातून फाळणीच्या इतिहासातील विविध पैलू प्रेक्षकांसमोर उलगडण्यात येणार आहेत.

            विभाजन विभीषिका स्मृतीदिनाच्या माध्यमातून इतिहासाचे स्मरण करून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाची भावना अधिक दृढ करणे हा या सांस्कृतिक उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. इतिहासातील घटनांमधून बोध घेत भविष्यात शांतता, ऐक्य आणि सौहार्दाची मूल्ये जपण्याचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे.

            मुंबई व परिसरातील नागरिक, नाट्यरसिक, विद्यार्थी, युवक आणि सांस्कृतिकप्रेमींनी या आशयपूर्ण नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

रायगडच्या विकासकामांना गती देत नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम करा

 रायगडच्या विकासकामांना गती देत नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम करा

रोहयो मंत्री भरत गोगावले

§  विभागनिहाय आढावा बैठकीत विविध विकासकामे

§  आरोग्य सुविधा व कामकाजाचा आढावा

मुंबई, दि. १०: रायगड जिल्ह्यातील सर्व विभागांनी सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून विकासकामे व शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. नागरिकांना शासकीय योजनांचा व सुविधांचा वेळेत लाभ मिळेल, यासाठी विभागांनी समन्वयाने व गतिमान पद्धतीने काम करावे, असे निर्देश रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिले.

 

रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्ह्यातील विभागनिहाय सद्य:स्थिती (२०२६-२७) बाबत आढावा बैठक मंत्रालयातील त्यांच्या दालनात झाली. यावेळी जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामांचा, प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला.

 

बैठकीत रायगड जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य रुग्णालयातील सोयी-सुविधा, आरोग्य सेवा तसेच आवश्यक पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या संदर्भातील प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याबाबत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी मंत्री गोगावले यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून प्रस्तावांवर तात्काळ कार्यवाही करण्याची विनंती केली.

 

रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ती मदत व कार्यवाही करावी, अशा सूचनाही मंत्री गोगावले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पात्र लाभार्थी शेतकरी योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत, यासाठी विभागांनी आवश्यक समन्वय साधावा, असे त्यांनी सांगितले.

 

जिल्ह्याच्या विकासकामांसाठी प्राप्त झालेल्या निधीचा वेळेत व प्रभावीपणे वापर करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. मंजूर निधीचा योग्य विनियोग करून विकासकामांना गती देण्याच्या सूचना मंत्री गोगावले यांनी दिल्या.

 

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi