Friday, 10 March 2023

स्थानिक औषध खरेदीच्या मर्यादेत वाढ

 स्थानिक औषध खरेदीच्या मर्यादेत वाढ

- वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन.

          मुंबई, दि. 09 : शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या स्थानिक औषध खरेदीची मर्यादा वाढविण्यात आली असून ती 10 टक्क्यांवरुन 30 टक्के करण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिली.


          याबाबत सदस्य किशोर जोरगेवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.


          मंत्री श्री. महाजन म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर या संस्थेच्या काही वॉर्डातील पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला होता आणि शस्त्रक्रिया बंद होत्या, अशी तक्रार आहे. मात्र, दि. 3 फेब्रुवारी 2023 रोजी नेत्र शस्त्रक्रियागृहाला पाणीपुरवठा करणारा पाईप फुटलेला आढळला. तरीही बाहेरुन पाणी पुरवठा करुन त्यादिवशी 17 रुग्णांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी आहेत. त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येतील. तसेच याबाबत औषध खरेदीला लागणारा वेळ लक्षात घेऊन तमिळनाडूच्या धर्तीवर स्वतंत्र औषध खरेदी प्राधिकरणाची निर्मिती करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.


          या चर्चेत सदस्य सर्वश्री विजय वडेट्टीवार, नाना पटोले, डॉ.देवराव होळी यांनी सहभाग घेतला.


000

शेत, पाणंद, शिवरस्ते खुले करण्यासाठी विशेष मोहीम राबविणार

 शेत, पाणंद, शिवरस्ते खुले करण्यासाठी विशेष मोहीम राबविणार

- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

       मुंबई, दि. 09 : शेतकऱ्यांच्या शेतीला दळणवळणासाठी रस्त्याच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडीवाट, रस्ते, पाणंद, पांधण, शेत रस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्या-येण्याचे रस्ते खुले करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.


          सदस्य अभिमन्यू पवार यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.


          मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, राज्यातील शेत जमिनीची मोजणी, जमीन महसुलाची आकारणी व प्रथम जमाबंदीची कार्यवाही सन 1892 ते 1930 दरम्यान पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामध्ये शेतजमिनीचे सर्व्हे निहाय गाव नकाशे तयार करण्यात आलेले आहेत. हे सर्व्हे नंबरचे गाव नकाशावर मुळ जमाबंदीवेळचे विविध प्रकारचे रस्ते, गाडीवाट, पायवाट दर्शविलेले आहेत. मूळ जमाबंदीचे वेळी तयार झालेले गाव नकाशे जीर्ण होत असल्याने 'डिजिटल इंडिया भूमी अभिलेख अद्ययावतीरण कार्यक्रम' अंतर्गत राज्यातील भूमापन नकाशांचे डिजीटालायजेशनचे काम सुरु करण्यात आले असून 6 जिल्ह्यांमध्ये डिजीटायजेशन काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरीत 28 जिल्ह्यातील भू-नकाशांचे डिजिटालायजेशन करण्याची कार्यवाही सुरु आहे.तसेच हे रस्ते खुले करुन देण्यासाठी अभ्यासगट नेमण्यात येईल, असेही महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.


          या चर्चेत विधानसभा सदस्य सर्वश्री दिलीप वळसे-पाटील, विजय वडेट्टीवार, आशिष जैस्वाल यांनी सहभाग घेतला होता.


००००

या चिमणयांनो


 

जीवन हे

  *खिशाचे वजन वाढवता वाढवता*

*जर नात्यांचे वजन कमी झाले* 

*तर समझून घ्या की* 

*व्यवहार तोट्याचा आहे.*

        *कुटुंबाचे प्रेम आणि मित्रांची सोबत*

*ही "संपत्ती" प्रतिष्ठेपेक्षा पण खुप मोठी असते.*

*✒....हसरा चेहरा आपला* 

*रूबाब वाढवतो,* 

*परंतु हसुन केलेले काम* 

*आपली ओळख वाढवते...*

*"मी" आहे म्हणुन "सगळे" आहेत या ऐवजी "सगळे" आहेत म्हणुन "मी" आहे हा विचार ठेवा आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही.*

      🙏🦋* 🌻🙏: *पाण्यातच वीज असते त्याला फक्त गतीची गरज असते , ताकातच लोणी असते त्याला फक्त घुसळण्याची गरज असते*,

 *सुख सुध्दा माणसाच्या स्वत: जवळच असते त्याला फक्त शोधण्याची गरज असते .*                                                                ............

 *समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळत पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला स्वतःच मन ही तितकंच मोठं आणि समजूतदार असावं लागतं.*

---------------------------------------------------------------

                    *🌹सुप्रभात 🌹*

राज्यातील मासळी उतरविण्याची 43 ठिकाणे गाळ उपसनी क्षेत्रासाठी निश्चित

 राज्यातील मासळी उतरविण्याची 43 ठिकाणे गाळ उपसनी क्षेत्रासाठी निश्चित

- मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

            मुंबई दि. 9 : राज्यात मासळी उतरविण्याची 173 बंदरे कार्यरत आहेत. या बंदरांमधील गाळ काढून 24 तास ही बंदरे सुरु ठेवण्याच्या कामांचे सर्वेक्षण करण्यात आले असून राज्यात 43 ठिकाणे गाळ उपासणी क्षेत्र निश्चित करण्यात आले असल्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत सांगितले.


            राज्यातील मत्स्य बंदरामधील गाळ काढून बंदरे सुस्थितीत करण्याबाबत सदस्य जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.


            मंत्री श्री मुनगंटीवार यांनी सांगितले की, मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकास निधी योजनेंतर्गत हर्णे, साखरी नाटे, जीवना, भरडखोल, सातपाटी ही पाच कामे करण्यात येत आहेत. त्यासाठी आवश्यक त्या सर्व पूरक परवानगी घेण्यात येत आहेत. तसेच ही कामे विहीत कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश मेरीटाईम बोर्डाला देण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


            मागील दोन वर्षात लेखाशीर्षअभावी ही कामे प्रलंबित राहिली होती. त्यामुळे प्राधान्याने लेखाशीर्ष उघडण्याची कार्यवाही केली जाईल. तसेच सन 2018 च्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत हे 12 वे काम घेण्यासाठी अनुमती देण्यात येईल, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच राज्यातील समुद्र किनारा असलेल्या सात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊन मत्स्यव्यवसायाशी संबंधित सर्व प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी चर्चा करण्यात येऊन धोरण निश्चित करण्यात येईल.


            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अनिकेत तटकरे, सचिन अहिर, रमेश पाटील यांनी सहभाग घेतला.


००००

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करणार

 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करणार

- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण.

            मुंबई, दि. 9 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शरणापूर, साजापूर, पंढरपूर, नक्षत्रवाडी असा राज्यमार्ग असून, तातडीने या रस्त्याचे काम सुरू करणार असल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांनी विधानपरिषदेत दिली.


            छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काम पूर्ण करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे विलंब होत असल्याप्रकरणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. यास उत्तर देताना मंत्री श्री. चव्हाण बोलत होते.


            मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रस्त्याचे रूंदीकरण तसेच चार पदरी सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यासंदर्भात निविदा प्राप्त असून, निविदा प्रक्रिया पूर्ण करून तातडीने काम सुरू करण्यात येणार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या इमारतीच्या कामाबाबत कार्यादेश दिला असून, फेब्रुवारी २०२५ ला हे काम पूर्ण होईल. तसेच विश्रामगृहाचे काम ही २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे.


            विविध विभागाची कामे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी ठेकेदार करत असतात. सर्व विभागांनी एकत्रित काम करणे गरजेचे असल्याने त्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसीत करण्यात येईल. यामुळे ठेकेदार काम अपूर्ण ठेवण्याच्या पद्धतीला आळा बसणार आहे. तसेच या सॉफ्टवेअरमुळे ठेकेदार निविदा भरतानाच ती माहिती सर्व विभागांना मिळेल.


            ठेकेदारामुळे काम अपूर्ण राहिले असेल किंवा क्षमता नसताना निविदा दिली असल्यास त्यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


०००

ठाणे शहरात समप्रमाणात पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे

 ठाणे शहरात समप्रमाणात पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे.

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

          मुंबई, दि. 9 : ठाणे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत विविध भागातून तक्रारी येत आहेत. त्यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याचे समप्रमाणात नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.


          याबाबत विधानसभा सदस्य संजय केळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.


          मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ठाणे शहराला मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी काळू धरण प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी या प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर करुन काळू धरणाचे काम गतीने करण्यात येईल. पाण्याची गळती थांबविण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील.


            ठाणे शहराची वाढती लोकसंख्या पाहता स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे नियोजनही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


          या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री प्रताप सरनाईक, डॉ. जितेंद्र आव्हाड, वर्षा गायकवाड, रईस शेख यांनी सहभाग घेतला होता.


००००

Featured post

Lakshvedhi