शेत, पाणंद, शिवरस्ते खुले करण्यासाठी विशेष मोहीम राबविणार
- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई, दि. 09 : शेतकऱ्यांच्या शेतीला दळणवळणासाठी रस्त्याच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडीवाट, रस्ते, पाणंद, पांधण, शेत रस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्या-येण्याचे रस्ते खुले करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य अभिमन्यू पवार यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, राज्यातील शेत जमिनीची मोजणी, जमीन महसुलाची आकारणी व प्रथम जमाबंदीची कार्यवाही सन 1892 ते 1930 दरम्यान पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामध्ये शेतजमिनीचे सर्व्हे निहाय गाव नकाशे तयार करण्यात आलेले आहेत. हे सर्व्हे नंबरचे गाव नकाशावर मुळ जमाबंदीवेळचे विविध प्रकारचे रस्ते, गाडीवाट, पायवाट दर्शविलेले आहेत. मूळ जमाबंदीचे वेळी तयार झालेले गाव नकाशे जीर्ण होत असल्याने 'डिजिटल इंडिया भूमी अभिलेख अद्ययावतीरण कार्यक्रम' अंतर्गत राज्यातील भूमापन नकाशांचे डिजीटालायजेशनचे काम सुरु करण्यात आले असून 6 जिल्ह्यांमध्ये डिजीटायजेशन काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरीत 28 जिल्ह्यातील भू-नकाशांचे डिजिटालायजेशन करण्याची कार्यवाही सुरु आहे.तसेच हे रस्ते खुले करुन देण्यासाठी अभ्यासगट नेमण्यात येईल, असेही महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.
या चर्चेत विधानसभा सदस्य सर्वश्री दिलीप वळसे-पाटील, विजय वडेट्टीवार, आशिष जैस्वाल यांनी सहभाग घेतला होता.
००००
No comments:
Post a Comment