स्थानिक औषध खरेदीच्या मर्यादेत वाढ
- वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन.
मुंबई, दि. 09 : शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या स्थानिक औषध खरेदीची मर्यादा वाढविण्यात आली असून ती 10 टक्क्यांवरुन 30 टक्के करण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिली.
याबाबत सदस्य किशोर जोरगेवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री. महाजन म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर या संस्थेच्या काही वॉर्डातील पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला होता आणि शस्त्रक्रिया बंद होत्या, अशी तक्रार आहे. मात्र, दि. 3 फेब्रुवारी 2023 रोजी नेत्र शस्त्रक्रियागृहाला पाणीपुरवठा करणारा पाईप फुटलेला आढळला. तरीही बाहेरुन पाणी पुरवठा करुन त्यादिवशी 17 रुग्णांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी आहेत. त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येतील. तसेच याबाबत औषध खरेदीला लागणारा वेळ लक्षात घेऊन तमिळनाडूच्या धर्तीवर स्वतंत्र औषध खरेदी प्राधिकरणाची निर्मिती करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.
या चर्चेत सदस्य सर्वश्री विजय वडेट्टीवार, नाना पटोले, डॉ.देवराव होळी यांनी सहभाग घेतला.
000
No comments:
Post a Comment