राज्यातील मासळी उतरविण्याची 43 ठिकाणे गाळ उपसनी क्षेत्रासाठी निश्चित
- मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई दि. 9 : राज्यात मासळी उतरविण्याची 173 बंदरे कार्यरत आहेत. या बंदरांमधील गाळ काढून 24 तास ही बंदरे सुरु ठेवण्याच्या कामांचे सर्वेक्षण करण्यात आले असून राज्यात 43 ठिकाणे गाळ उपासणी क्षेत्र निश्चित करण्यात आले असल्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत सांगितले.
राज्यातील मत्स्य बंदरामधील गाळ काढून बंदरे सुस्थितीत करण्याबाबत सदस्य जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
मंत्री श्री मुनगंटीवार यांनी सांगितले की, मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकास निधी योजनेंतर्गत हर्णे, साखरी नाटे, जीवना, भरडखोल, सातपाटी ही पाच कामे करण्यात येत आहेत. त्यासाठी आवश्यक त्या सर्व पूरक परवानगी घेण्यात येत आहेत. तसेच ही कामे विहीत कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश मेरीटाईम बोर्डाला देण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मागील दोन वर्षात लेखाशीर्षअभावी ही कामे प्रलंबित राहिली होती. त्यामुळे प्राधान्याने लेखाशीर्ष उघडण्याची कार्यवाही केली जाईल. तसेच सन 2018 च्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत हे 12 वे काम घेण्यासाठी अनुमती देण्यात येईल, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच राज्यातील समुद्र किनारा असलेल्या सात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊन मत्स्यव्यवसायाशी संबंधित सर्व प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी चर्चा करण्यात येऊन धोरण निश्चित करण्यात येईल.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अनिकेत तटकरे, सचिन अहिर, रमेश पाटील यांनी सहभाग घेतला.
००००
No comments:
Post a Comment