Wednesday, 11 January 2023

महागाई भत्ता जुलै २०२२

 


जिंदगी गुलजार हैं





 

दृष्टी बदलली की सृष्टी बदलते*

 शिक्षकाने वर्गात विचारले: 

*जगात कोणत्या ठिकाणाला प्रेमाचे प्रतीक मानलं जातं?*


संपूर्ण वर्ग एकाच आवाजात ओरडला: "ताजमहाल" फक्त एक विद्यार्थी म्हणाला: "रामसेतू"! शिक्षकाने त्याला उभे केले आणि विचारले, "तुला काय म्हणायचे आहे?"


तो विद्यार्थी उभा राहिला आणि म्हणाला, "रामसेतू भगवान श्रीरामांनी आपल्या पत्नीला परत आणण्यासाठी बांधला होता, तिला पुरण्यासाठी नाही, आणि दुसऱ्याची जमीन हडप करून तर नाहीच. आणि ज्यांनी पूल बांधला त्यांना भगवान श्रीरामांनी पूर्ण आदर दिला. त्यांचे हात तोडले नाही." शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांना ते ऐकून धक्का बसला. खरोखर आपण आपल्या इतिहास आणि पौराणिक कथांकडे नव्या दृष्टीकोनातून पाहण्याची अत्यंत गरज आहे.


*दृष्टी बदलली की सृष्टी बदलते*


🙏🙏 *जय श्री राम* 🙏🙏

शैक्षणिक दिशादर्शिका’ शिक्षण क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरेल

 शैक्षणिक दिशादर्शिका’ शिक्षण क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरेल

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर.

            मुंबई, दि. १० :- नियोजन हा यशस्वीतेचा मूलमंत्र आहे. शासकीय कामकाजाचेही संभाव्य नियोजन केले तर त्याचा लाभ प्रशासकीय कामकाज विहीत कालावधीत करण्यासाठी होऊन दर्जेदार शिक्षणाचे आणि आदर्श विद्यार्थी घडविण्याचे आपले उद्दिष्ट साध्य करणे सुलभ होईल. यादृष्टीने ‘शैक्षणिक दिशादर्शिका’ शिक्षण क्षेत्राला दिशा दाखविणारी ठरेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.


            शालेय शिक्षण मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते आज ‘शैक्षणिक दिशादर्शिका २०२३’ या शालेय शिक्षण विभागासाठीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राज्य शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक कैलास पगारे, शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांच्यासह विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


            मंत्री श्री.केसरकर म्हणाले, अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता असूनही शिक्षण विभाग चांगले काम करीत आहे. हे काम अधिक नियोजनबद्ध करण्यासाठी दिशादर्शिकेच्या माध्यमातून नियोजन करता येईल. त्याचप्रमाणे शिक्षणगाथा या त्रैमासिकाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील यशस्वी गाथा इतरांपर्यंत पोहोचून त्यांनाही प्रेरणा मिळेल. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या शैक्षणिक दिनदर्शिकेचे कौतुक करून याचा महाराष्ट्राच्या शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व यंत्रणांना नक्कीच फायदा होईल तसेच कामकाजात एकसूत्रता व गतिमानता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी दर्जेदार शिक्षण देण्याची आवश्यकता असते, त्यादृष्टीने शाळांची नियमित तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी बोलताना दिले.


            श्री.देओल यांनी ‘दिशादर्शिके’च्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेमध्ये येणाऱ्या नवीन पिढीला विभागाची कार्यपद्धती समजण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. बैठका, विविध उपक्रम, कार्यक्रम यांचे नियोजन करणे देखील यामुळे सोपे होणार असून ‘शिक्षणगाथा’ त्रैमासिकामुळे नवनवीन प्रयोग आणि चांगल्या कल्पना इतरांनाही समजतील, असे ते म्हणाले.


            आयुक्त श्री.मांढरे यांनी दिशादर्शिकेमुळे अनावश्यक कामांमधला वेळ वाचून कामांची पूर्वतयारी करण्यासाठी ती उपयुक्त ठरेल असे सांगितले. विद्यार्थी आणि गुणवत्ता हा केंद्रबिंदू मानून काम करण्याच्या सूचना मंत्री श्री.केसरकर यांनी दिल्या होत्या, याचा उल्लेख करून त्या अनुषंगाने चांगली कामे ‘शिक्षणगाथा’ च्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास व्यक्त केला.


            डॉ.पालकर यांनी प्रास्ताविकाद्वारे दिशादर्शिका आणि शिक्षणगाथा बाबत माहिती दिली. तर, विभागीय उपसंचालक संदीप संगवे यांनी आभार मानले.

: मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या शासकीय पत्रांवर बोधचिन्ह व ‘जनहिताय सर्वदा’ हे घोषवाक्य

 शासकीय पत्रांवर मुद्रित होणाऱ्या बोधचिन्ह, घोषवाक्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनावरण

            मुंबई, दि. १० : मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या शासकीय पत्रांवर बोधचिन्ह व ‘जनहिताय सर्वदा’ हे घोषवाक्य मुद्रित होणार असून त्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.


            मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सर्व मंत्री महोदयांच्या आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे अनावरण करण्यात आले.


            मंत्रालयीन प्रशासकीय सेवांचे बोधचिन्ह आणि ‘जनहिताय सर्वदा’ घोषवाक्य हे त्या सेवेतील सदस्यांना प्रेरणा देण्याचे आणि कार्याप्रती निष्ठा निर्माण करण्याचे कार्य करीत असते म्हणून आता मंत्रालयीन सर्व प्रशासकीय विभागाकडून निर्गमित होणाऱ्या पत्रांवर महाराष्ट्र प्रशासनाच्या परंपरेस साजेसे, असे बोधचिन्ह व ‘जनहिताय सर्वदा’ हे घोषवाक्य मुद्रीत होणार आहे.

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव’ यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य

 सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव’ यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

२० ते २६ फेब्रुवारी दरम्यान कोल्हापुरात लोकोत्सव, नियोजनाबाबत आढावा.

            मुंबई, दि. १० :- ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण रक्षणाच्या चळवळीचा प्रारंभ होईल. या लोकोत्सवाच्या नियोजनात कुठलीही कमतरता राहणार नाही. यात शासनाचे विविध विभाग सहभागी होतील. लोकोत्सव यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरीमठ येथे होणाऱ्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाच्या नियोजनाबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली.


            मंत्रालयात झालेल्या या बैठकीस कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, आमदार महेश शिंदे, विविध विभागांचे सचिव, या लोकोत्सवाचे संकल्पक कणेरी येथील सिद्धगिरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्यासह, संयोजन समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.


            कणेरीमठ (ता. करवीर) येथे २० ते २६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान लोकोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये विविध परिषदा, प्रदर्शने आणि चर्चासत्र-परिसंवाद यांचे आयोजन करण्यात येणार आहेत.


            पंचमहाभूत लोकोत्सवाच्या नियोजनासाठी पर्यावरण विभाग समन्वयक म्हणून काम करेल. पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे नोडल अधिकारी म्हणून काम करतील. त्यांना सर्व विभाग सहकार्य करतील, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, पर्यावरणीय समतोल विषयी जनजागृती ही काळाची गरज आहे. समाजाची गरज आहे. अतिवृष्टी, बर्फ वितळणे या गोष्टी आपण अनुभवतो आहोत. त्यामुळे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी ही गरज ओळखून या लोकोत्सवाचे नियोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पर्यावरण रक्षणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. भारतात जी-२० परिषद होत आहे. या परिषदेचे बोधवाक्यही ‘वसुधैव कुटुम्बकम्’ असे आहे. त्यामुळे पंचमहाभूत लोकोत्सव आणि जी-२०चे आयोजन हा योगही जुळून आला आहे. स्वामीजींच्या नियोजनाची, तयारीची चुणूक बोधचिन्हाच्या अनावरणप्रसंगी अनुभवली आहे.


            कणेरी मठाच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख कामे अविरतपणे होत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या लोकोत्सवात देशभरातून मान्यवर, स्वयंसेवक येणार आहेत. हा लोकोत्सव यशस्वी करण्याची आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. हे समाजासाठी अपेक्षित असलेले, भविष्यातील धोके ओळखून हाती घेतलेले काम आहे. त्यामुळे मनुष्यबळ, लोकोत्सवासाठी पायाभूत सुविधा यापासून ते सर्व बाबींमध्ये शासनाच्या विविध विभागांचा सहभाग राहील. शासन म्हणून सुरुवातीपासूनच लोकांसाठी आणि त्यांच्या मनातील आशा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न राहीले आहेत. या लोकोत्सवातून शासनाचे निर्णयही लोकांपर्यंत पोहचविता येणार आहे. या लोकोत्सवात सर्वांचा सहभाग राहील, असे प्रयत्न व्हावेत. आपल्या गतीमान प्रशासनाचाही यात महत्त्वाचा सहभाग राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.


            यावेळी मुख्यमंत्र्यांनी या पंचमहाभूत लोकोत्सवासाठी जिल्हा नियोजन निधीतून पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्धता, विविध विभागांनी आपली दालने उभी करून सहभाग नोंदवणे याबाबतही सूचना केल्या.


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, आज या विषयाचे गांभीर्य आपण पाहिले तर संपूर्ण जग ज्या विषयावर विचार करते अशा पर्यावरण संतुलनाच्या विषयावर हा लोकोत्सव होत आहे. हा विषय सर्वसामान्यांपर्यंत या उत्सवाच्या माध्यमातून पोहोचेल, महाराष्ट्र शासनाने या लोकोत्सवासाठी विविध विभागांच्या माध्यमातून तयारी केली आहे. कणेरी मठाच्यावतीने आयोजित ‘लोकोत्सव’ नक्कीच यशस्वी होईल, हा लोकोत्सव असल्यामुळे महाराष्ट्र शासनाचा या उत्सवात सहभाग आहेच, या लोकोत्सवासाठी आवश्यक ते सहाय्य करण्यात येईल, अशी ग्वाही देखील उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.


            यावेळी कृषी, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पशुसंवर्धन, आरोग्य, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, ऊर्जा विभाग यांच्या सहभागाबाबत बैठकीत माहिती देण्यात आली.


            सुरुवातीला अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांनी प्रास्ताविक केले. प्रधान सचिव श्री. दराडे यांनी पूर्वतयारीबाबत सादरीकरण केले.


पंचमहाभूत लोकोत्सवाची व्यापकता...


            सात दिवस चालणाऱ्या या लोकोत्सवात एकूण सात विषय, २५ पेक्षा जास्त राज्यातील लोकांचा सहभाग, ५० पेक्षा जास्त देशातील प्रमुख पाहुणे, विविध जिल्ह्यातील ३०० पेक्षा जास्त संस्थांचा सहभाग, ५०० हून अधिक कुलगुरुंची उपस्थिती, हजारहून अधिक साधू संतांचा सहवास, १५०० शेती अवजारे व इतर वस्तूंची दालने, दहा हजार व्यावसायिकांचा सहभाग, ६५० एकर विस्तीर्ण परिसरात लोकोत्सव होणार आहे. त्यामध्ये २ लाख चौरस फूट जागेत मनोरंजन जत्रा, ३ लाख चौरस फूट जागेवर थ्री डी मॉडेल्स ची मांडणी केली जाईल. सुमारे ४० लाख लोक या पंचमहाभूत लोकोत्सवात सहभागी होतील, असे नियोजन असल्याची माहितीही संयोजकांनी दिली.


०००००

नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था मंजूर; जूनपासून प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

 नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था मंजूर;

जूनपासून प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

पालकमंत्री दादाजी भुसे यांचा पाठपुरावा.

            मुंबई, दि. 10 : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत महाराष्ट्रातील मुलींचे प्रतिनिधीत्व मोठ्या प्रमाणात असावे, यासाठी नाशिक येथे जून, २०२३ पासून मुलींसाठी शासकीय सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था सुरु होणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय 10 जानेवारी रोजी प्रसिद्ध कऱण्यात आला असून सन 2023-24 साठीची प्रवेश प्रक्रियाही तत्काळ सुरु करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाबद्दल बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आभार मानले. या निर्णयासाठी मंत्री श्री. भुसे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.


            केंद्र सरकारच्या धोरणानुसार पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मुलींचा प्रवेश व्हावा या हेतूने, मंत्री श्री. भुसे यांच्याकडे माजी सैनिक कल्याण विभागाचा कार्यभार असताना नाशिकमध्ये मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था असावी यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.


            नागपूर येथील हिवाळी अधिवेशन - 2022 काळात या प्रस्तावास मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सन 2023-24 साठीची प्रवेश प्रक्रियाही तत्काळ सुरु करण्याच्या सूचनाही शासन स्तरावरुन देण्यात आल्या आहेत. या संस्थेसाठी आवश्यक असलेला एक कोटी 17 लाख 65 हजार रुपये निधीही मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मंत्री श्री. भुसे यांनी दिली.


            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सैन्यात भरती होण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारने सन 2021 मध्ये घेतला. या प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेण्यासाठी भारतातील पहिली मुलींसाठी शासकीय सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था, नाशिक येथे मंजूर करण्यात आली आहे. जून, 2023 पासून ही प्रशिक्षण संस्था सुरु होणार आहे. याचा जास्तीत जास्त लाभ राज्यातील मुलींनी घ्यावा. या संस्थेमध्ये प्रथम वर्षासाठी ३० व द्वितीय वर्षासाठी ३० विद्यार्थिनींना प्रवेश मिळेल. या विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था माजी सैनिकांच्या मुलींच्या वसतिगृहात करण्यात येणार असून पोलिस अकॅडमी केंद्र येथे मुलींना सैनिकी पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi