Wednesday, 28 July 2021

 मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत

पॅरामेडिकल व हेल्थकेअर विषयक प्रशिक्षणासाठी

इच्छुकांनी संपर्क साधावा

- मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर

 

            मुंबई, दि. 27 : कोविड १९ प्रादुर्भावामुळे आरोग्य व वैद्यकीय सेवा क्षेत्रात विशेषत: पॅरामेडिकल व हेल्थकेअर विषयक आवश्यक कुशल  मनुष्यबळ वाढवण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केली आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात काम करण्यात स्वारस्य असलेल्यांनी पुढील ठिकाणी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.

            या योजनेत १८ ते ४५ वर्षे वयोगटातील युवा युवतींना जिल्ह्यातील प्रसिद्ध शासकीय व नामांकित खासगी रुग्णालयामध्ये आरोग्य क्षेत्रातील निवडक अभ्यासक्रमामध्ये विना शुल्क प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. त्या अंतर्गत आरोग्य क्षेत्रातील रोजगार सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रवेश घेण्याकरिता इच्छुक असलेल्यांनी तातडीने पुढील लिंकवर https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdThDxq5zza8OfEP2uaKW-Q3RwpDz9l7zIVHAoORzBuhV8Biw/viewform?usp=sf_link  या ठिकाणी त्वरित आपली नोंदणी करावी. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहील. अधिक माहितीकरिता दुरध्वनी क्र. ०२२-२२६२६३०३ यावर किंवा ईमेल mumbaicity.employment@gmail.com  वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

००००


 चिपळूण शहराच्या स्वच्छतेसाठी 2 कोटी रुपयांच्या निधीची

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

·       चिपळूणला पुन्हा उभे करण्यासाठी 5 मुख्याधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची तातडीने होणार नियुक्ती

·       ठाणे, नवी मुंबईतील स्वच्छता कर्मचारीही मदतीसाठी देणार

·       पूरग्रस्त चिपळूण शहर आणि बाजारपेठेची नगरविकास मंत्र्यांकडून पाहणी

 

            मुंबई, दि. 27 : चिपळूण शहरात झालेल्या जलप्रलयानंतर शहर तातडीने स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून 2 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पुरातून सावरत असलेल्या चिपळूण शहराला आणि बाजारपेठेला श्री.शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

            गेल्या आठवड्यात कोकणात झालेल्या अतिवृष्टीचा सगळ्यात मोठा फटका हा चिपळूण शहराला बसला. शहरातील अनेक भागात 20 फुटापर्यंत पाणी वाढल्याने लोकांचे या पुरामुळे अतोनात नुकसान झाले. शहरात सगळीकडे खराब झालेल्या वस्तू आणि चिखलामुळे दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे रोगराई पसरू नये यासाठी शहर स्वच्छ करण्याला प्राधान्य असल्याने त्यासाठी हा 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याशिवाय शहरातील स्वच्छता कार्याला वेग आणण्यासाठी मुख्याधिकारी दर्जाचे 5 अधिकारी तातडीने नियुक्त करण्यात येणार असल्याचे देखील श्री. शिंदे यांनी जाहीर केले आहे.

            शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग हटवण्यासाठी साधने आणि मनुष्यबळ देखील गरजेचे आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्या स्वच्छता साधनसामग्रीसह पाठवू असेही त्यांनी जाहीर केले.

            चिपळूण शहराला वाशिष्ठी नदीच्या पाण्यापासून असलेला धोका लक्षात घेता कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून लागणारे बोटी, लाईफ जॅकेट्स यासारखे साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवण्याची सूचना त्यांनी महाड मुख्याधिकाऱ्यांकडे केली.

            यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, चिपळूणचे आमदार भास्कर जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण, स्थानिक अधिकारी उपस्थित होते.

 राज्यपालांनी केली महाड येथील दरडग्रस्त तळीये गावाची पाहणी

पुष्पचक्र अर्पण करून मृतांना वाहिली श्रध्दांजली

 

            अलिबाग, दि.27 : महाड तालुक्यातील तळीये गावातील झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यामुळे आम्ही सर्व दुःखी आहोत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे, अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज महाड मधील तळीये गावी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.

             राज्यपाल श्री.कोश्यारी आज महाड तालुक्यातील तळीये या दरडग्रस्त गावाची पाहणी करण्याकरिता आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

             राज्यपाल श्री. कोश्यारी पुढे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आहे. जे घडले आहे ते सर्व व्यवस्थित करणे कठीण असले तरी सुदैवाने या दुर्घटनेतून वाचलेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्याचे व त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा एकत्रित प्रयत्न केंद्र सरकार व राज्य शासन करील.

              या ठिकाणी मृत झालेल्या व्यक्तींना मी मनापासून श्रध्दांजली अर्पण करीत असून ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, तुम्ही सर्वांनी सकारात्मकरित्या एकत्र येत काम केल्यास लवकरात लवकर उपाय करण्यासाठी सहकार्य मिळेल, असेही ते यावेळी म्हणाले.

            यावेळी दरडग्रस्त तळीये गावाच्या स्थळी पुष्पचक्र अर्पण करुन मृतात्म्यांना श्री.कोश्यारी यांनी श्रद्धांजली वाहिली.

             यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार आशिष शेलार, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी महाड निलेश तांबे, महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, महाडचे तहसिलदार सुरेश काशीद, सुधागड तहसिलदार दिलीप रायण्णावर,तळा तहसिलदार अण्णाप्पा कनशेट्टी, तळीये गावाचे सरपंच, दुर्घटनेतील मृत पावलेल्या ग्रामस्थांचे नातेवाईक आदी उपस्थित होते.

 वीज नसलेली पूरग्रस्त गावं सौर दिव्यांनी उजळणार

ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांची घोषणा

·ऊर्जामंत्र्यांनी केली रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी

  

मुंबई, दि. 27 : पुरामुळे ज्या गावात सध्या वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य नाही, त्या गावातील घरांना मोफत सौर दिव्यांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली. यामुळे पूरग्रस्त भागातील नागरीकांना मोठा दिलासा दिला मिळणार आहे.

अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या रायगड जिल्ह्यासह कोकणातील वीज पुरवठा यंत्रणा तात्काळ पूर्ववत करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले आहेत. रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी पेण, महाड, नागोठणे येथील पूरग्रस्त भागांची आणि महावितरण व महापारेषण यंत्रणेच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, महावितरणचेसंचालक (संचलन) संजय ताकसांडे, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे उपस्थित होते.

महाड तालुक्यातील वीज यंत्रणेचे काम लवकरात लवकर पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. महाड येथे सावित्री नदीला आलेल्या महापुराच्या पाण्यामुळे पडलेल्या उच्चदाब वाहिनीच्या टॉवरच्या ठिकाणी ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तसेच वीज कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. महापारेषण व महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वीज यंत्रणा उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पूरपरिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सुरू असलेली कर्मचाऱ्यांची कामगिरी कौतुकास्पद असल्याची पावती त्यांनी दिली.

डॉ. नितीन राऊत यांनी महाड येथील दौऱ्यादरम्यान दिवंगत काँग्रेस नेते माणिकराव जगताप यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली. यानंतर ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी राजावाडी तसेच विरेशवर गावातील बाधित झालेल्या विद्युत यंत्रणेची पाहणी केली. तसेच महापारेषण अतिउच्चदाब केंद्राची पाहणी केली.

22 जुलै रोजी सावित्री नदीला आलेल्या महापुराच्या पाण्यामुळेउच्चदाब वाहिनीचे दोन टॉवर पडल्याने महाड तालुक्यातील गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. तथापि अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे २६ जुलै रोजी महावितरणच्या गोरेगाव स्विचिंग उपकेंद्रातून बॅक फिडर मार्फत २२ के.व्ही. लोणेरे फिडर द्वारे २२ के.व्ही वाहूर फिडर चालू करून ८० गावांचा वीजपुरवठा चक्राकार पद्धतीने सुरू करण्यात आला असल्याचे डॉ राऊत यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांचे कौतुक

महावितरण,महापारेषणच्या कर्तव्यदक्ष आणि धाडसी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जीवाची बाजी लावून अनेक ठिकाणी वीज पुरवठा सुरू केला. वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर विद्युत विभाग करत आहे. नदी पात्रात मगरींचे वास्तव्य असताना देखील आमचे कर्मचारी पाण्यात पोहत वीज खांबावर चढून वीज यंत्रणा पुन्हा उभारणीचे काम करत आहेत. त्यांना मी सलाम करतो, त्यांच्या या कामगिरीमुळे आमची छाती अभिमानाने फुलून आली असे गौरवोद्गार डॉ राऊत यांनी वीज कर्मचाऱ्यांप्रति काढले.

पूरग्रस्त भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करून महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अनेक भाग प्रकाशमान केले आहेत. बाधित झालेल्या १३०८ वितरण रोहित्रांपैकी २६१, ४७१ पाणीपुरवठा योजनांपैकी २९ तर ८ कोविड हॉस्पिटल/ व्हॅकसीनेशन सेंटरपैकी ३, ८३ मोबाईल टॉवरपैकी १९ असे एकूण ३५,५६० ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले.

गरजूंना वस्तूंचे वाटप

मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन,सबोर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशन आदींच्यावतीने महाड येथील बौद्ध वाडी व अदिवासी वाडी येथे पूरग्रस्त गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वितरण डॉ. राऊत यांच्या हस्तेकरण्यात आले.

000



साताऱ्यातील भूस्खलनग्रस्त मीरगाव, आंबेघर, हुम्बराळे गावाचे तात्पुरते पुनर्वसन

जलसंपदा विभागाच्या क्वार्टर्समध्ये करण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

·       भूस्खलनामुळे जीवितहानी झालेल्या मीरगाव, हुम्बराळे गावांना दिली भेट

·       भूस्खलनग्रस्त गावातील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूचे केले वाटप

 

            मुंबई, दि. 27 : कोयना धरणाच्या पट्ट्यातील भूस्खलनग्रस्त मीरगाव, आंबेघर, हुम्बराळे गावातील ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन सध्या जलसंपदा विभागाच्या क्वार्टर्समध्ये करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक प्रशासनाला दिले. आज त्यांनी स्वतः जाऊन या जलसंपदा विभागाच्या निवासी वसाहतींची पाहणी केली. त्यानंतर त्यानी या वसाहतींची डागडुजीचे काम वेगाने पूर्ण करून त्यात या 150 कुटुंबांचे स्थलांतर करण्याचे निर्देश दिले.

            गेल्या काही दिवसात राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील कोयनानगर परिसराला देखील बसलेला होता.  यात या परिसरातील मीरगाव, आंबेघर, हुम्बराळे गावात भूस्खलनात 30 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. नगरविकास मंत्र्यांनी तातडीने इथे येऊन मीरगाव आणि हुम्बराळे या गावांना भेटी देऊन येथील परिस्थितीची पाहणी केली. या गावकऱ्यांचे एमटीडीसीच्या पर्यटन रिसॉर्ट आणि कोयनानगर जिल्हापरिषद शाळेत तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. श्री. शिंदे यांनी या ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. या कठीण प्रसंगात शासन पूर्णपणे तुमच्यासोबत असून तुमच्या पुनर्वसनाबाबत लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढू अशी ग्वाही त्यानी यावेळी दिली. त्यासोबतच या ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तू, चादरी, कपडे, सतरंज्या, चटया, छत्र्या अशी मदत दिली. यासोबतच शासनाची मदत देखील तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवली जाईल असेही सांगितले. 

            यानंतर या ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन जलसंपदा विभागाच्या वसाहतीत करण्याचा पर्याय पुढे आला. कोयनानगर परिसरातील या वसाहती कोयना धरण बांधताना उभारण्यात आल्या होत्या. या वसाहतींची डागडुजी केल्यास तो पुनर्वसनासाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल यावर एकमत झाल्याने त्यांनी तातडीने हे डागडुजीचे काम हाती घेण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच या भूस्खलनग्रस्त गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी बृहद आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याने ते देखील लवकरच करू असे ग्रामस्थांशी बोलताना स्पष्ट केले.

            यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, ठाण्याहून पुरग्रस्तांसाठी मदत घेऊन आलेले नगरसेवक राम रेपाळे, नगरसेवक योगेश जानकर, शशिकांत जाधव आणि स्थानिक अधिकारी  उपस्थित होते.

००००


 

सध्याच्या नैसर्गिक आपत्तीतही केंद्राने तातडीने मदत करावी

- कृषिमंत्री दादाजी भुसे

·       गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीतील पिक नुकसानीसाठी 701 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल

कृषीमंत्र्यांनी मानले केंद्र शासनाचे आभार

 

            मुंबई, दि. 27 :   गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोकण तसेच इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात राज्य सरकारतर्फे केंद्राला आर्थ‍िक मदतीची विनंती करणार असून केंद्र सरकार याची योग्य ती दखल घेवून तातडीने मदत करेल अशी अपेक्षा कृषी मंत्री भुसे यांनी व्यक्त केली आहे.

            राज्यात गेल्या वर्षी म्हणजे जून ते ऑक्टोबर 2020 दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात एनडीआरएफमधून अर्थसहाय्य करण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राकडे एका निवेदनाद्वारे केली होती. लोकसभेमध्ये केंद्रीय कृषीमंत्र्यांनी या अनुषंगाने पिकांच्या नुकसानीसाठी 701 कोटी रुपयांची मदत जाहीर केली, त्याबद्दल राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी धन्यवाद दिले आहेत.

            गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीनंतर नुकसान भरपाईपोटी 3721 कोटींची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली होती. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने निर्णय घेवून 4375 कोटी शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी वाटप केले. राज्याने केलेल्या 3721 कोटी रुपयांच्या मागणीपैकी 701 कोटी रुपये मदत देण्याचे केंद्र शासनाने घोषित केले आहे,अशी माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

0000

 वन्यप्राण्यांना दत्तक घ्या;

वन्यजीव संवर्धनास मदत करा

_______

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची योजना

 

            मुंबई, दि. 27 : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथील वन्य प्राणी आता दत्तक घेता येतील. सिंह, वाघ, बिबट, वाघाटी अशा अनेक बंदिस्त वन्य प्राण्यांची देखभाल इथे केली जाते. उद्यानातील बंदिस्त वन्य प्राण्यांना दत्तक घेतल्यामुळे वने व वन्यजीव संवर्धनाच्या अनमोल कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. वन्यजीव प्रेमी, संस्था आणि कंपनी यांनी प्राण्यांना १ वर्षाकरीता दत्तक घेऊन वन्यजीव व्यवस्थापनात सहभागी व्हावे, असे आवाहन वनसंरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जी. मल्लिकार्जुन यांनी केले आहे. ही दत्तक रक्कम एका वर्षांसाठी आहे

 

वाघ रुपये ३,१०,०००,

सिंह रुपये ३,००,०००,

बिबट रुपये १,२०,०००,

वाघाटी रुपये ५०,०००

नीलगाय रुपये ३०,०००,

चितळ रुपये २०,०००,

भेकर रुपये १०,०००,

 

            अधिक माहिती आणि अर्ज करण्याकरिता इच्छुकांनी खालील कार्यालयाशी संपर्क साधावा.

वन संरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई २. अधीक्षक, सिंह विहार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई

 

ईमेल

lionsafaripark@gmail.com

भ्रमणध्वनी क्र. ७०२०२८२७१४

 होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत

राज्यशासन सकारात्मक

- आरोग्यमंत्री राजेश टोपे

 

            मुंबई, दि. 27 : राज्यातील होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्यशासन सकारात्मक आहे, अशी ग्वाही देताना राज्यात शासकीय होमिओपॅथी दवाखाने सुरु करण्यासंदर्भात  प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

            मंत्रालयात होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या  मागण्यांबाबत बैठक झाली. यावेळी आमदार विक्रम काळे, आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ.रामास्वामी, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ.उत्तुरे, आयुष संचालक डॉ.कोहली, केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ अरुण भस्मे, विद्यापीठाच्या विद्या परीक्षेचे सदास्य डॉ.  बाळासाहेब पवार,  आदी उपस्थित होते.

            शासकीय होमिओपॅथी दवाखाने सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करावा, असे आरोग्यमंत्र्यांनी सां‍गितले. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या (क्र.108) रुग्णवाहिकांमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांना नियुक्ती मिळावी यासाठी त्यासंदर्भात असलेले न्यायालयाचे निर्णय याबाबत विधी व न्याय विभागाचे मत नोंदण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट घेण्यात येणार असून त्यावेळी त्यांच्याशी होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

            सीसीएमपी कोर्स केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यक परिषदेमध्ये नोंदणी मिळण्यासंदर्भात विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले. यावेळी महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे प्रशासक डॉ. सोमनाथ गोसावी,राष्ट्रीय होमिओपॅथी कमिशनच्या सल्लागार परिषदेचे सदस्य डॉ. प्रमोदींनी पागे,डॉ. बाळकृष्ण गायकवाड, परिषदेचे रजिस्ट्रार वैद्य सोनमांकार आदी उपस्थित होते.

 शेतकर्‍यांच्या हक्कासाठी लढणारा कार्यकर्ता हरपला!

डॉ. शांतिलाल कोठारी यांच्या निधनावर देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना

 

मुंबई, 27 जुलै

डॉ. शांतिलाल कोठारी यांच्या निधनाने शेतकर्‍यांच्या हक्कासाठी लढणारा एक खंदा कार्यकर्ता हरपला असल्याची शोकसंवेदना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

 

लाखोळीची डाळ असो की सोयाबीनची उत्पादनं, त्यांचे संपूर्ण आयुष्यच संशोधन आणि संघर्षाचे राहिले. कोणत्याही विषयाचा गाढा अभ्यास करून त्यासाठी संपूर्ण समर्पण भावनेने ते लढा देत असत. संघर्ष करताना त्यांची जिद्द आणि चिकाटी वाखणण्यासारखी होती. एकदा एखादा विषय त्यांनी हाती घेतला की मग त्यातून ते माघार घेणार नाहीत, हे सर्वांना ठावूक असायचे. नागपूरकरांसाठी ते सोयामिल्कचे संशोधक म्हणून सुद्धा सुप्रसिद्ध होते. विविध फ्लेवरयुक्त सोयामिल्क पिण्याची सवय त्यांनी नागरिकांना लावली. हे दूध आरोग्यदायी आहे, असे ते तास न् तास समजावून सांगत असत. मोहफुलांच्या पावडरचा चहा त्यांनी शोधून काढला. शेतकर्‍यांच्या विविध उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळावी आणि त्यातून अधिकचा पैसा शेतकर्‍यांना मिळावा, हाच त्यांचा सदोदित प्रयत्न असायचा. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदनेत म्हटले आहे.

*********

 


Featured post

Lakshvedhi