भारताची प्रगती जगासाठी प्रेरणादायी
–कौन्सुलर कॉर्प्सचे डेप्युटी डीन थॉमस
भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा उत्सव हा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील दूरदृष्टी, धैर्य आणि त्यागाची आठवण करून देणारा असून एकता, विविधता, लोकशाही आणि प्रगती या मूल्यांचा गौरव करणारा असल्याचे मत कौन्सुलर कॉर्प्सचे डेप्युटी डीन तथा पोलंडचे महावाणिज्य दूत थॉमस यांनी व्यक्त केले. भारताने स्वातंत्र्यानंतर केलेली उल्लेखनीय प्रगती आणि जागतिक स्तरावरील वाढता सहभाग हा जगासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारत आणि विविध देशांमधील मैत्री व सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी कौन्सुलर कॉर्प्सला योगदान देण्याची संधी मिळत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
या विशेष प्रसंगी राजनैतिक समुदायाला एकत्र आणल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. भारतातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना भारताने जागतिक पटलावर अधिकाधिक प्रगती करावी आणि उज्ज्वल यश संपादन करावे, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकात राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. राज्याच्या आर्थिक सामर्थ्यामुळे महाराष्ट्र देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे सांगून त्यांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीचा आढावा घेतला.
यावेळी महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील प्रगतीची माहिती देणारी ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली.
No comments:
Post a Comment