गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’; रुग्णालयनिहाय सुविधा निश्चित
- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि
नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल
मुंबई, दि. २३ : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने रुग्णालयनिहाय आरोग्यसेवांची सर्वसमावेशक मानके निश्चित केली आहेत. ग्रामीण रुग्णालयापासून उपजिल्हा, सामान्य आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत कोणत्या स्तरावर कोणत्या आरोग्य सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर, तपासण्या, मनुष्यबळ, औषधे आणि पूरक सेवा उपलब्ध असाव्यात, याची स्पष्ट रूपरेषा निश्चित करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील आरोग्यसेवा अधिक सुसूत्र आणि परिणामकारक होण्यास मदत होणार आहे. नागरिकांना आपल्या गरजेनुसार योग्य आरोग्य संस्थेची निवड करणे सुलभ होणार असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील पारदर्शकता आणि नागरिकांचा विश्वास आणखी दृढ होणार आहे.
No comments:
Post a Comment