गरुडझेप संस्थेमार्फत गेल्या सात वर्षापासून शिवचातुर्य मोहिमेचे आयोजन
गरुडझेप संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मारुती गोळे यांच्या संकल्पनेतून गेल्या सात वर्षांपासून ‘आग्रा ते राजगड गडदुर्ग मोहीम’ आयोजित करण्यात येत आहे. ही मोहीम केवळ दुर्गभ्रमंतीपुरती मर्यादित नसून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, स्वराज्याची प्रेरणा, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संवर्धन आणि व्यसनमुक्त भारताचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत आहे. या मोहिमेत सुमारे २,२०० मावळे, तसेच ६० सायकलस्वार सहभागी आहेत., उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या चार राज्यांमधून तसेच सुमारे ७८ शहरांमधून ही मोहीम मार्गक्रमण करणार आहे. आग्रा येथून सुरू झालेला हा ऐतिहासिक प्रवास ग्वाल्हेर, शिवपुरी, गुना, पाचोर, देवास, तिखरी, सेंधवा, धुळे, चांदवड, संगमनेर, भोसरी मार्गे राजगड येथे पोहोचणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेच्या घटनेचे ऐतिहासिक महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. ‘गरुडझेप मोहीम’ ही केवळ प्रवासाची मोहीम नसून, इतिहास, शौर्य, स्वराज्याची प्रेरणा आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे, मोहिमेच्या समारोपावेळी राजगड येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा आणि स्वराज्याच्या इतिहासाचा जागर करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment