अशी असेल मेट्रो-१३
ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून जाणाऱ्या मेट्रो १३ -मिरा भाईंदर ते वसई-विरार मार्गाची अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च १७,७२४.९९ कोटी अपेक्षित आहे. या मार्गाची एकूण लांबी २५.०३ किलोमीटर असून, त्यापैकी २१.७८ किलोमीटर मार्ग उन्नत, तर ३.२५ किलोमीटर मार्ग भूमिगत असेल. या मार्गावर एकूण १६ स्थानके प्रस्तावित आहेत. त्यामध्ये १३ उन्नत आणि तीन भूमिगत स्थानकांचा समावेश आहे. या प्रकल्पात मेट्रो मार्गासह ४.९२ किलोमीटर लांबीच्या वसई खाडीवरील पांजू बेटाला जोडणारा सहा पदरी (३+३) रस्ता व मेट्रो असलेल्या एकत्रित पुलाचे नियोजन करण्यात आले आहे. चिखल डोंगरी येथे मेट्रो डेपो प्रस्तावित आहे. हा मार्ग मीरा रोड, वसई, नालासोपारा, नायगाव आणि विरार परिसरांना जोडणार आहे.
मिरा भाईंदर ते वसई विरार मेट्रो १३ मार्ग नायगाव, नालासोपारा आणि विरार उपनगरी रेल्वे स्थानकाशी जोडणार जाणार असून मेट्रो मार्ग क्रमांक ९ सोबत नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियम येथे जोडणी प्रस्तावित आहे. सर्व स्थानकांवर बस सेवा उपलब्ध करून देण्याचेही नियोजन आहे. प्रकल्पासाठी एकूण २४.८४ हेक्टर भूसंपादन अपेक्षित आहे. मान्यतेनंतर पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मिरा भाईंदर ते वसई विरार या मेट्रो मार्ग क्रमांक १३ या मार्गासाठी येत्या सहा महिन्यात भूसंपादन व पोहोच मार्ग तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. २०३१ मध्ये या मार्गावर दररोज सुमारे ४.४९ लाख प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे. या प्रकल्पामुळे रस्ते प्रवासाच्या तुलनेत प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांनी कमी होणे, खासगी वाहनांचा वापर व मुख्य राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची घनता कमी होणे आणि कार्बन उत्सर्जनात घट होणार आहेत. औद्योगिक आणि लॉजिस्टिक केंद्रांसह वसई-विरार, मिरा-भाईंदर आणि मुंबई उपनगरांची जोडणीही या मार्गामुळे अधिक सक्षम होणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment