मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या हरित अर्थव्यवस्थेला चालना
मुंबई, दि. १७ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याच्या दिशेने हरित आणि शाश्वत विकासाला मोठी गती मिळत आहे.या वर्षाच्या सुरुवातीला पार पडलेल्या इंडिया स्टेट क्लायमेट इन्व्हेस्टमेंट फोरम (आयएससीआयएफ) २०२६ मध्ये राज्यातील स्वच्छ ऊर्जा, हरित उद्योग, कार्बन रिमूव्हल, स्वच्छ इंधन आणि कृषी क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांसाठी अब्जावधी रुपयांच्या गुंतवणूक घोषणा करण्यात आल्या. या गुंतवणुकीमुळे राज्यातील हरित पायाभूत सुविधा, स्वच्छ ऊर्जा उत्पादन, शाश्वत शेती आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.
महाप्रीत आणि सुगम-सीएसएस यांच्या भागीदारीतून, महाराष्ट्रातील फळे आणि भाजीपाल्याच्या प्रमुख उत्पादन क्षेत्रांमध्ये (क्लस्टर्समध्ये) १०० सौरऊर्जेवर चालणारी सूक्ष्म शीतगृहे उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, 'आयकार्ट' आणि 'आयकार्ट राईज फाउंडेशन' यांच्या माध्यमातून, राज्यातील १० हून अधिक क्षेत्रांमध्ये शेतकरी उत्पादक संस्था आणि शेतकरी गटांसाठी आधीच उभारण्यात आलेल्या ५० सूक्ष्म शीतगृहांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी सहाय्य दिले जात आहे. यामुळे फळे आणि भाजीपाल्याचे काढणीनंतर होणारे नुकसान कमी होण्यास आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात, या शिखर परिषदेच्या माध्यमातून कृषी सौर ऊर्जा आणि वितरित सौर प्रकल्पांमध्ये सुमारे ५० दशलक्ष अमेरिकी डॉलरपर्यंतच्या गुंतवणुकीबाबत स्वारस्य निर्माण झाले आहे. महावितरणच्या फीडर सोलरायझेशन कार्यक्रमांतर्गत तसेच इतर तत्सम प्रकल्पांसाठी महाराष्ट्रातील विकासकांसोबत पुढील कार्यवाही आधीच सुरू करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment