Saturday, 8 August 2026

पदभरती, पदोन्नतीला गती देण्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

 पदभरती, पदोन्नतीला गती देण्याचे

सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

मुंबई, ता. ८ : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आरोग्य भवन येथे आयोजित बैठकीत आस्थापना विषयक विविध बाबींचा सविस्तर आढावा घेत त्यांनी विभागातील कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्यावर भर दिला.

आरोग्य विभागाच्या कामकाजाचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने कोणत्याही स्तरावर दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. प्रशासनातील निर्णय प्रक्रिया अधिक गतिमान करून नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 

विविध संवर्गांतील रिक्त पदांचा यावेळी आढावा

आरोग्य विभागातील गट-क व गट-ड संवर्गातील नवीन पदभरतीच्या सद्यस्थितीचा, तसेच विविध संवर्गांतील रिक्त पदांचा यावेळी आढावा घेण्यात आला. आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पदभरतीची प्रक्रिया अनावश्यक विलंबाविना पूर्ण करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

पदोन्नतीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करा

अधिपरिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी, परिविक्षाधीन कालावधीची पूर्तता, पदोन्नती आदी विषयांवरही बैठकीत चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे प्रस्ताव अनावश्यक प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घेऊन पदोन्नतीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकालात योग्य संधी आणि पदोन्नती मिळणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.  राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (NHM) कर्मचाऱ्यांच्या समावेशनासंदर्भातील बाबींचाही आढावा घेण्यात आला. आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा नियमांनुसार आणि सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi