वृत्त क्र. 3267
राज्यातील सर्व शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांच्या
अग्नी व विद्युत सुरक्षा मानकांची तपासणी करा
-आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
मुंबई, दि. २५ : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देताना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे. राज्यातील सर्व शासकीय, खासगी व धर्मादाय आरोग्य संस्थांमधील फायर ऑडिट, विद्युत सुरक्षा, इमारत बांधकाम तसेच रुग्णालयातील संबंधित यंत्राचे ऑडिट करून त्याचा अहवाल शासनास सादर करावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
शासकीय आणि खासगी रुग्णालयातील आगीच्या घटनांबाबत मंत्री आबिटकर यांनी या सूचना दिल्या.
राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना, आपत्कालीन परिस्थितीतील रुग्ण स्थलांतरणाची तयारी आणि विद्युत सुरक्षेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आरोग्य विभागाने यापूर्वी विविध स्तरांवर परिपत्रके आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सर्व आरोग्य संस्थांनी अग्निसुरक्षा उपाययोजनांचे नियमित मूल्यांकन करून त्रुटी दूर करणे आवश्यक आहे.
रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या जीविताची सुरक्षा ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी असून, अग्निसुरक्षेच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. या पार्श्वभूमीवर फायर ऑडिटसह इमारत, विद्युत व्यवस्था व रुग्णालयातील सर्व संबंधित यंत्रणांचे ऑडिट करून त्यातील त्रुटी तातडीने दूर करण्यावर भर देण्यात यावा. सर्व जिल्ह्यातील शासकीय, खाजगी, धर्मादाय संस्थांमधील ऑडिट करून घेण्याची जबाबदारी रुग्णालय प्रमुख, विभागीय उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महानगरपालिका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधीक्षक यांच्यावर सोपविल्याची माहिती मंत्री आबिटकर यांनी दिली.
No comments:
Post a Comment