Saturday, 15 August 2026

स्वातंत्र्यदिनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा गावागावातील आरोग्य समित्यांच्या सदस्यांशी थेट ऑनलाइन जनसंवाद

 स्वातंत्र्यदिनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा गावागावातील

आरोग्य समित्यांच्या सदस्यांशी थेट ऑनलाइन जनसंवाद

·         आरोग्य व्यवस्थेमध्ये लोकसहभाग वाढविण्यावर भर

·         राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे होणार ऑनलाईन उद्घाटन

 

मुंबई, दि. १४ :- गावपातळीवरील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि प्रभावी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यभरातील विविध आरोग्य समित्यांच्या अशासकीय सदस्यांशी थेट ऑनलाइन जनसंवाद साधणार आहेत. या माध्यमातून आरोग्य व्यवस्थेमध्ये लोकसहभाग वाढविण्यावर भर राहणार असून राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे ऑनलाईन उद्घाटनही आरोग्यमंत्री करणार आहेत.

 

१५ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता होणाऱ्या या जनसंवादातून गावागावातील आरोग्यविषयक प्रश्न, सूचना आणि अपेक्षा थेट आरोग्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचणार असून त्याचवेळी राज्यातील विविध नवीन आरोग्य संस्थांचे ऑनलाइन उद्घाटनही करण्यात येणार आहे. निरोगी महाराष्ट्रासाठी शासन, आरोग्य यंत्रणा आणि समाज यांची भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी होणारा जनसंवाद आरोग्य क्षेत्रातील लोकसहभागाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.

 

आरोग्य सेवांची गुणवत्ता, विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांचा आरोग्य व्यवस्थेतील सहभाग आणि स्थानिक पातळीवरील आरोग्यविषयक अडचणी याबाबत या जनसंवादातून थेट चर्चा होणार आहे. निवडक पाच समिती सदस्यांना आपले मनोगत मांडण्याची संधी मिळणार असून, त्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मार्गदर्शन करणार आहेत.

 

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या ग्राम आरोग्य, स्वच्छता व पोषण समिती, जन आरोग्य समिती, रुग्ण कल्याण समिती आणि एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती या समित्या शासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. या समित्यांमध्ये आरोग्य यंत्रणांसोबत ग्रामपंचायत प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी, युवक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध घटकांचा सहभाग असतो.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi