सीएम फेलोशिपमधून प्रशासनाला नवा दृष्टिकोन मिळेल; फेलोंनी परिवर्तनाचे दूत बनावे
–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026’ अंतर्गत
प्रमाणपत्र वितरण आणि आरंभ कार्यक्रम
मुंबई, दि. 15 : मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामुळे प्रशासनाला नव्या पिढीचा दृष्टिकोन, नावीन्यपूर्ण कल्पना आणि तंत्रज्ञानाची जोड मिळेल. फेलोंनी फेलोशिपच्या अनुभवातून आपल्या कार्यक्षेत्रात परिवर्तन घडविण्याचे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताच्या निर्मितीत युवा पिढीची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या ॲप्रिसिएशन आणि नवीन बॅचच्या कमेन्समेंट कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अर्थ व सांख्यिकी आयुक्त डॉ.ज्योत्स्ना पडियार, वरिष्ठ अधिकारी, आयआयटीचे प्राध्यापक, फेलोशिप कार्यक्रमाचे समन्वयक आणि सीएम फेलोज उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासनामध्ये अनुभवी आणि गुणवत्तापूर्ण अधिकारी असले तरी दीर्घकाळ एकाच पद्धतीने काम करताना कल्पकता आणि ग्राउंडशी असलेला संपर्क काही प्रमाणात कमी होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनात नवे विचार आणणे आणि त्याचवेळी तरुणांना शासनाची कार्यपद्धती समजून देणे, हा फेलोशिप कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
‘फेलोशिप’ हा एकतर्फी अनुभव नसून फेलोंकडून प्रशासनालाही नवे विचार आणि दृष्टिकोन मिळतात. नवीन पिढीच्या आकांक्षा आणि कार्यपद्धती समजून घेतल्याशिवाय सर्वसमावेशक प्रशासन शक्य नाही. त्यामुळे प्रशासनाने बदल स्वीकारत अधिक गतिमान होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
सीएम फेलोंनी स्टार्टअप धोरण, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, जिल्हास्तरीय वॉर रूम्स, विविध डॅशबोर्ड्स, जलयुक्त शिवाराचे जीआयएस मॅपिंग, ‘मागेल त्याला शेततळे’, ई-गव्हर्नन्स, तक्रार निवारण व्यवस्था, चॅटबॉट्स तसेच महाराष्ट्र युनिक इन्फ्रा आयडी यांसारख्या उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवर्जून नमूद केले.
प्रशासनामध्ये बदलासाठी केवळ शासन निर्णयाची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. लोकाभिमुख आणि सोपी कार्यपद्धती आधी स्वीकारून त्यानुसार शासन निर्णय करण्याची नवी कार्यसंस्कृती विकसित झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
शासनाच्या 100 दिवसांच्या आणि 150 दिवसांच्या कार्यक्रमांतही फेलोंनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आवास योजना, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, लखपती दीदी, शेतकरी व महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच आदिवासी भागातील शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील कामातही फेलोंनी प्रभावी भूमिका बजावल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
‘मी एकटा किती परिवर्तन करू शकणार?’ असा विचार न करता परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करावी. फेलोशिपमधून मिळालेल्या अनुभवाचा उपयोग समाजाच्या आकांक्षा आणि गरजा समजून घेण्यासाठी करावा आणि आपल्या कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल घडवावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
नवीन बॅचने मागील बॅचपेक्षा अधिक चांगले आणि नावीन्यपूर्ण काम करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवीन फेलोंना शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment