चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी 16 ऑगस्टला प्रत्यक्ष बैठक
- उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत
मुंबई, दि. 13 : चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेसह उद्योजकांच्या विविध अडचणी जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता चाकण येथे उद्योजक व औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमांमधून वृत्त प्रसिद्ध होत आहे. रस्त्यांच्या समस्येमुळे काही कंपन्या महाराष्ट्राबाहेर अथवा राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, त्याचा रोजगारावर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी आज चाकणमधील औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
उद्योजकांच्या समस्या केवळ चर्चेपुरत्या मर्यादित न ठेवता त्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर ठोस मार्ग काढण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत रस्ते, वाहतूक तसेच अन्य पायाभूत सुविधांबाबतच्या अडचणींची प्रत्यक्ष माहिती घेण्यात येणार असून, संबंधित विभागांच्या समन्वयातून आवश्यक उपाययोजना करण्याबाबत कार्यवाही केली जाईल.
No comments:
Post a Comment