Wednesday, 15 July 2026

दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईपर्यंत आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत

 कांदिवली (पूर्व) येथील हनुमान नगर परिसरात अल्पवयीन मुलीवरील अत्याचार करून करण्यात आलेल्या निर्घृण हत्येच्या संतापजनक घटनेच्या पार्श्वभूमीवर कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. अतुल भातखळकर यांनी आज समता नगर पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१२) श्री. गजानन राजमाने यांची भेट घेऊन या प्रकरणातील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली.


यावेळी पोलीस प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात मुख्य आरोपीसह या गुन्ह्यात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या प्रत्येक दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तपास कोणत्याही प्रकारच्या दबावाशिवाय निष्पक्ष व जलदगतीने पूर्ण करण्यात यावा तसेच ३० ते ४० दिवसांच्या आत या प्रकरणाचे दोषारोपपत्र (चार्जशीट) न्यायालयात दाखल करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

तसेच, अल्पवयीन पीडितेवरील या अमानुष गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर आरोपीवर पॉक्सो (POCSO) कायद्यान्वये कठोर कलमे लागू करण्यात यावीत आणि न्यायालयात दोष सिद्ध झाल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा व्हावी, अशीही ठाम मागणी करण्यात आली. या सर्व मागण्यांची पोलीस उपायुक्तांनी गांभीर्याने दखल घेत आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

याशिवाय, या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी तसेच हा खटला जलदगती विशेष न्यायालयात चालवून पीडितेला व तिच्या कुटुंबीयांना शक्य तितक्या लवकर न्याय मिळावा, अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करूनही केली. या प्रकरणाच्या तपासाला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक त्या सर्व कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी शासनाने विशेष लक्ष द्यावे, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईपर्यंत आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचा ठाम निर्धार भातखळकर यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi