प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा
· महाराष्ट्राच्या वतीने प्रधानमंत्र्यांचे दीर्घ सेवेबद्दल अभिनंदन
नवी दिल्ली, दि. 10 : नव्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्थान अढळ असून त्यांच्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राच्याही विकासाला नवी क्रांतिकारी दिशा मिळाली, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले. देशाचे निर्वाचित प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ सलग सेवा देण्याचा 4 हजार 399 दिवसांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केल्याबद्दल प्रधानमंत्री मोदी यांचे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन केले.
मुख्यमंत्री यांनी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीचे 4 हजार 399 दिवस हे केवळ कालगणनेतील आकडे नसून हा कालावधी भारताच्या सर्वांगीण विकासाचे एक महत्त्वपूर्ण पर्व असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या कालावधीत देशातील कोट्यवधी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्याचे महत्त्वाचे कार्य झाले. देशात रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ, द्रुतगती महामार्ग आणि आधुनिक पायाभूत सुविधांचे अभूतपूर्व जाळे उभारण्यात आले. भारताने आर्थिक क्षेत्रात मोठी झेप घेत जगातील अग्रगण्य अर्थव्यवस्थांमध्ये स्थान निर्माण केले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सिंचन प्रकल्पांना चालना देण्यात आली, जलसंधारण आणि कृषी विकासासाठी विक्रमी गुंतवणूक करण्यात आली. ‘आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असल्याचे चित्र आज देशभर दिसून येते. संरक्षण क्षेत्रात भारताने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत जगासमोर आपली क्षमता सिद्ध केली आहे. एकेकाळी शस्त्रास्त्रांची मोठ्याप्रमाणात आयात करणारा भारत आज हजारो कोटी रुपयांची संरक्षण सामग्री निर्यात करणारा देश ठरला आहे. यूपीआय आणि डिजिटल पेमेंट प्रणालीच्या माध्यमातून भारताने जगासमोर डिजिटल क्रांतीचा आदर्श निर्माण केला आहे. ‘विकास भी और विरासत भी’ या ध्येयवाक्याला केंद्रस्थानी ठेवून प्रधानमंत्री मोदी यांनी विकास आणि सांस्कृतिक वारसा यांचा समतोल साधण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारताच्या प्रगतीला नवी दिशा मिळाली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
No comments:
Post a Comment