Monday, 11 May 2026

शेत/ पाणंद रस्त्यांना प्राधान्य देऊन ग्रामीण रोजगाराला गती द्यावी

 शेत/ पाणंद रस्त्यांना प्राधान्य देऊन ग्रामीण रोजगाराला गती द्यावी

-मंत्री भरत गोगावले

 

मुंबई, दि. 7 - रोजगार हमी योजना विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या मातोश्री ग्राम समृद्धी शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देऊन तसेच या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन ग्रामीण रोजगाराला गती देण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा आणि ग्रामविकासाला गती देण्याच्या दृष्टीने मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विभागीय आढावा बैठक घेण्यात आली.

मंत्री भरत गोगावले यांनी विविध जिल्ह्यांतील रोजगार हमी योजनेच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत सध्या सुरू असलेल्या मनरेगा व मातोश्री ग्राम समृद्धी योजनेंतर्गत कामांचा जिल्हानिहाय आढावा घेतला. यामध्ये रोजगार हमी योजनेतील नोंदणीकृत मजुरांची संख्या, प्रत्यक्ष सुरू असलेली कामे, प्रलंबित मंजुरी, निधी वापर, तसेच शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामांबाबतची सद्यस्थिती यावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना मंत्री भरत गोगावले म्हणाले, केंद्र शासनाने व्ही.बी.जी राम जी अधिनियम 2025 पारित केला असला तरी सदर अधिनियम अद्याप अंमलात आलेला नसून मनरेगा योजना पूर्ववत सुरू आहे. त्यामुळे विद्यमान कार्यपद्धतीनुसार सर्व कामे वेळेत आणि नियमबद्ध पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच केंद्र शासनाकडून मनरेगा कामांसाठी कोणतीही अंतिम कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi