Wednesday, 13 May 2026

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा

 मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार

 आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा

-         परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

दीर्घकालीन उपाययोजनांसाठी समितीची स्थापना

 

मुंबई, दि. 13 : राज्यातील खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक याबाबत शासन गंभीर असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. या संदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तसेच दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी सह परिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील तीन प्रतिनिधींचा समावेश असलेली विशेष समिती गठित करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश त्यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

या बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर तसेच सुराज्य अभियान संघटनेचे अभिषेक मुरुकटे, अरविंद पानसरे, सुनील हनवट आदी उपस्थित होते.

परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, गठित समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण मिळवणे, अवैध बुकिंग ॲप्सना आळा घालणे आणि प्रवाशांच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना सुचविणे याबाबत सविस्तर अहवाल सादर करेल. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील बैठकीचे आयोजन करण्यात येईल. समितीने सुचविलेल्या उपाययोजनांची राज्य सरकारकडून प्रभावी आणि तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासनही परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी दिला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi