ओबीसी समाजाच्या विकासासाठी केंद्र-राज्य समन्वयातून योजनांची
अंमलबजावणी करण्यात यावी
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• ओबीसी समाजाचा विकास राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया
• ओबीसी सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध
मुंबई, दि. १९ : ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयातून विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. ओबीसींसाठी विविध योजनांची अंमलबजावणी गुणवत्तापूर्ण आणि परिणामकारक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.ओबीसी समाजाचा विकास हा राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
इतर मागासवर्ग कल्याण संसदीय समितीने हॉटेल ट्रायडेंट येथे भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, इतर मागासवर्ग कल्याण संसदीय समितीचे अध्यक्ष गणेश सिंह यांच्यासह समितीतील अन्य सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी शैक्षणिक सक्षमीकरण आणि आर्थिक उन्नतीच्या विविध योजना राज्य शासन प्रभावीपणे राबवत आहे. राज्य शासनाने स्वतंत्र इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्थापना करून ओबीसी, विजाभज, एसबीसी आणि इतर मागास घटकांसाठी विविध कल्याणकारी योजनांना गती दिली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना १०० टक्के फी सवलत देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment