मुलांच्या निरोगी भविष्यासाठी मोठी मोहीम
तंबाखूमुक्त शाळांना राष्ट्रीय पाठबळ
मुंबई, दि. १२ : देशभरात तंबाखूमुक्त समाज निर्माण करणे आणि मुलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाच्या सहकार्याने ‘तंबाखूमुक्त आणि निरोगी बालक – इंडिया व्हिजन’ या अभियान राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत नरोटम सेखसरिया फाउंडेशन आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ‘नरोटम सेखसरिया फाउंडेशन ग्रँट्स अँड अवॉर्ड्स २०२६’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी महाराष्ट्र, राजस्थान आणि इतर राज्यांतील सहा सामाजिक परिवर्तनकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये अमोल रामभाऊ काले, डॉ. जगदीशचंद्र बी. वाठार, कमलेश कुमार टेटरवाल, नरेंद्र बालू पाटील, रवि बालाजीराव धागे आणि डॉ. श्वेता सौरभ खांडरे यांचा समावेश होता.
आरोग्य विभागाच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय मोहिमेची सुरुवात २००८ मध्ये झाली. आतापर्यंत या अभियानांतर्गत ३९ स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) सहाय्य देण्यात आले असून सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक जनजागृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ६० व्यक्तींना गौरविण्यात आले आहे. संस्थेच्या माहितीनुसार, या मोहिमेच्या माध्यमातून देशातील १३ राज्यांमधील सुमारे १५ लाख नागरिकांपर्यंत पोहोचण्यात यश आले असून ५,५०० हून अधिक शाळांना तंबाखूमुक्त घोषित करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment