‘पल्स 2027’ साठी स्वतंत्र कंपनी व दुहेरी समित्यांची स्थापना
शासन निर्णय लवकरच
मुंबई, दि. 13 : वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात राज्याला जागतिक स्तरावर सक्षम करण्याच्या उद्देशाने आगामी ‘पल्स 2027’ परिषदेसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याबरोबरच दोन स्वतंत्र समित्या गठीत करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यासंदर्भातील शासन निर्णय पुढील चार ते पाच दिवसांत जारी करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ‘पल्स 2027’च्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, ‘पल्स 2027’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांची एक समिती आणि शासन स्तरावरील दुसरी समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच पुढील पाच वर्षांसाठी कृती आराखडा तयार करून ‘पल्स’ उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
ही कंपनी स्थापन झाल्यानंतर सीएसआर निधी, आर्थिक व्यवहार, विविध गुंतवणूक प्रस्ताव तसेच सामंजस्य करारांच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा अधिक सुलभ होईल, असेही मंत्री मुश्रीफ यांनी नमूद केले.
No comments:
Post a Comment