राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचे उदघाटन
मुंबईतील 12 अग्निशमन अधिकारी,जवानांना राष्ट्रपती पदके प्रदान
मुंबई, दि. 14:- राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकभवन मुंबई येथे अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुंबई अग्निशमन दल, एमआयडीसी व महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील 12 अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवेकरिता जाहीर झालेले राष्ट्रपती पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.
गेल्या काही दशकांत अग्निशमन दलासमोरील आव्हाने अनेक पटींनी वाढली आहेत. नागरीकरण, उंच इमारती, भूमिगत व भुयारी मेट्रो, तसेच वाढते औद्योगिक क्षेत्र यामुळे आपत्कालीन परिस्थितीचे स्वरूप गुंतागुंतीचे झाले आहे. मोठाली गोदामे आणि डेटा सेंटर्स ही काळाची गरज झाली आहेत. त्यामुळे औद्योगिक आगींपासून ते अत्याधुनिक डेटा सेंटर्स संबंधित आगीपर्यंत विविध प्रकारच्या आव्हानांना अग्निशमन दलांना सामोरे जावे लागत आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
अग्निशमन सेवा केवळ आग विझविण्यापुरती मर्यादित राहिलेली नसून महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा, औद्योगिक संपत्ती आणि सार्वजनिक ठिकाणांचे संरक्षण करणे ही देखील तिची जबाबदारी झाली आहे, असे ते म्हणाले.
अलीकडच्या काळात गॅस व रासायनिक आगी, तसेच ई-कार्स आणि इतर विद्युत उपकरणांमधील लिथियम-आयन बॅटरीमुळे आगींच्या घटना घडल्या आहेत. आग प्रतिबंध, शोध आणि कारणांचे विश्लेषण आदी क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करणे अत्यावश्यक आहे, असे राज्यपालांनी सांगितले. बदलत्या परिस्थितीत अग्निशमन सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौशल्य वर्धन, प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा सातत्याने अद्ययावत करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment