वर्धा जिल्ह्यातील मजूर संस्थांना ११ कोटी ८७ लाखाची १७६ कामे
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
मुंबई, दि. १८ : वर्धा जिल्ह्यातील मजूर संस्थांना नियमानुसार काम वाटप केले जात असून जिल्ह्यातील २० संस्थांना ११ कोटी ८७ लाखाची १७६ कामे वाटप करण्यात आली आहेत. मजूर संस्थांना काम वाटपामध्ये कोणतीही अनियमित्ता, गैरप्रकार झाला नसल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत दिली.
सदस्य दादाराव केचे यांनी यासंदर्भात विधानपरिषदेत लक्षवेधी सूचना मांडली.यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अभिजीत वंजारी यांनीही सहभाग घेतला.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, वर्धा जिल्ह्यात ३६ मजूर संस्था आहेत. त्यापैकी दोन संस्थांनी नूतनीकरण न केल्याने त्यांना काम देण्यात आलेले नाही. उर्वरित ३४ संस्थांपैकी २० संस्थांना मार्केटिंग फेडरेशनच्या नियमानुसार कामांचे वाटप करण्यात आले आहे.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, ज्या संस्थानी फेडरेशनकडे मागणी केलेली नाही त्यांना काम वाटप करण्यात आलेले नाही. मजूर सहकारी संस्थांना काम वाटप करताना पूर्वीचा अनुभव आणि संस्थेचे आर्थिक व्यवहार पाहूनच काम वाटप केले जाते. ज्या १० संस्थांना काम मिळाले नाही, या बाबतची माहिती सदस्यांनी दिल्यास त्यांनाही काम दिले जाईल, असेही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment