मुंबई क्लायमेट वीकमध्ये अंतराळवीर राकेश शर्मा व शुभांशू शुक्ला यांचा विद्यार्थ्यांना शाश्वत जीवनशैलीचा संदेश
मुंबई, दि. १८: अंतराळातून पाहिल्यावर देश, शहर किंवा सीमा यांची ओळख मागे पडते आणि पृथ्वी हीच आपली ओळख वाटते, अशी भावना अंतराळातून पृथ्वीकडे पाहताना निर्माण झाल्याचा अनुभव भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा व नुकतेच अंतराळस्थानकावर जाऊन आलेले अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी सांगितला.
भारताच्या पहिल्या मुंबई क्लायमेट वीकमध्ये अवकाश, पर्यावरण आणि मानवी जबाबदारी यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. देशाचे दोन अवकाशवीर राकेश शर्मा आणि शुभांशू शुक्ला “सारे जहाँ से अच्छा” या विशेष सत्रात प्रथमच एका मंचावर एकत्र आले. क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते दोघांचा सत्कार करण्यात आला. विविध शाळांतील १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेत अवकाशवीरांशी थेट संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार गौरव सावंत यांनी केले.
अंतराळवीर राकेश शर्मा यांनी अंतराळातून पृथ्वी पाहताना झालेल्या अनुभूती सांगताना प्रदूषणाचे गंभीर परिणाम अधोरेखित केले. पृथ्वीचा निळसर रंग कमी होत करडेपणा वाढल्याचे निरीक्षण त्यांनी मांडले. “हे केवळ दृश्य बदल नाही, तर आपल्या पर्यावरणीय स्थितीचे स्पष्ट संकेत आहेत,” असे ते म्हणाले. अंतराळातून पाहिलेल्या जंगलाच्या आगी, धुराचे प्रचंड ढग आणि पसरलेले प्रदूषण यामुळे पृथ्वीवरील प्रत्येक कृती जागतिक परिणाम घडवते, हे स्पष्ट होते, असे त्यांनी नमूद केले.
No comments:
Post a Comment