Thursday, 20 November 2025

मुंबईतील उड्डाणपुलांच्या रस्त्यांचे तातडीने ‘रिसरफेसिंग’ करा

 मुंबईतील उड्डाणपुलांच्या रस्त्यांचे तातडीने ‘रिसरफेसिंग’ करा


मुंबई महापालिका, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, एमईपी, महारेल यांना


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


· दुरुस्ती कामाच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी स्वतंत्र कक्ष उभारणार


 


मुंबई, दि. १८ : मुंबईतील सर्व उड्डाणपुलांची दुरुस्ती तातडीने हाती घेऊन रस्त्यांच्या पृष्ठभागावर नवीन थर (रिसरफेसिंग) टाकण्यात यावा. ही कामे फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या दुरुस्तीच्या कामाचे संनियंत्रण नगरविकास विभागाकडून करण्यात यावे यासाठी तज्ञांचा समावेश असलेला गुणवत्ता नियंत्रण कक्ष सुरू करण्यात यावा, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.


 


मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात मुंबईतील सर्व उड्डाणपुलांची सद्यस्थिती व दुरुस्तीच्या कामांचा आढावा घेणारी बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, एमएसआरडीएचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ.संजय मुखर्जी हे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.


 


मुंबईत एमएसआरडीएकडे पाच आणि एमईपी कडे १९ असे एकूण २४ उड्डाणपुल असून ते मुंबई महापालिकेकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र आता पावसाळा संपल्यानंतर या उड्डाणपुलांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. या सर्व रस्त्यांचे रिसरफेसिंग करावे. ज्याठिकाणी रस्ता खडबडीत झाला आहे अशा ठिकाणी युद्धपातळीवर रस्त्यावरील ठिगळ काढून रस्ता गुळगुळीत करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.


 


मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या ४२ उड्डाणपुलांची देखील तातडीने दुरूस्ती हाती घ्यावी, असे सांगतानाच अटलसेतूचे देखील रिसरफेसिंग करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi