जलसमृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया
- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
· नदीजोड प्रकल्प संदर्भात सह्याद्री अतिथी गृह येथे गुंतवणूकदार व बँकर्स समवेत चर्चासत्र
मुंबई, दि. १८ :- सिंचन क्षेत्राचा विस्तार, शेती, उद्योग व घरगुती वापरासाठी दीर्घकालीन जल नियोजन, आणि पाण्याचा प्रत्येक थेंब सिंचनासाठी हेच नदीजोड प्रकल्पांचे मुख्य उद्दिष्ट आहे. मोठ्या जलप्रकल्पांमुळे शाश्वत विकास, दुष्काळ नियंत्रण आणि संतुलित प्रगती साध्य होईल असे सांगत, भविष्यात जलसमृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करुया, असे आवाहन जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.
राज्यात हाती घेण्यात येत असलेल्या नदीजोड प्रकल्पासंदर्भात गुंतवणूकदारांशी चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात मार्गदर्शन करताना जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रविण परदेशी, जलसंपदा विषयक सल्लागार श्रीराम वेदिरे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि इन्फास्ट्रक्चर कंपनी, बँकर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment