Friday, 30 May 2025

विकसित कृषि संकल्प अभियाना,परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातून अभियानाचा शुभारंभ

 विकसित कृषि संकल्प अभियाना’चे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातून अभियानाचा शुभारंभ

परभणी, दि. 29 (जिमाका) : राष्ट्रव्यापी ‘विकसित कृषि संकल्प अभियाना’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन झाले.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथे या अभियानाच्या चित्ररथाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून या अभियानाचा शुभारंभ केला.

यावेळी कृषि मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता,उर्जा, महिला व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्हयाच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, कृषि, वित्त, नियोजन, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री  अॅड. आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या संकल्पनेला गती देण्यासाठी आधुनिक कृषि पद्धती, समृद्ध शेतकरी आणि विज्ञानाधिष्ठित शेती आवश्यक आहे. कृषि क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून अन्नसुरक्षेसोबतच देशाच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला रोजगार पुरवते. याकरिता केंद्र सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वात दि. 29 मे ते 12 जून 2025 या कालावधीत देशभरात “विकसित कृषि संकल्प अभियान” राबविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अभियान यशस्वी होवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या माध्यमातून खरीप पिकाच्या नियोजनासाठी अचूक मार्गदर्शन मिळेल, शेतकऱ्यांना आधुनिक कृषि तंत्रज्ञान आत्मसात करण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने लाभणार असून त्यांना शाश्वत उत्पादन घेता येईल, असे नमूद करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार संजय जाधव, आमदार, कार्यकारी परिषद सदस्य सतीश चव्हाण, आमदार व कार्यकारी परिषद सदस्य आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, प्रधान सचिव (कृषि) विकासचंद्र रस्तोगी, पुणे येथील कृषि परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषि आयुक्त सूरज मांढरे (भाप्रसे), ‘पोकरा’चे प्रकल्प संचालक परिमल सिंह, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू  प्रा. डॉ. इन्द्र मणि, ‘पिडीकेव्ही’ अकोला आणि ‘एमपीकेव्ही’ राहुरीचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, ‘बीएसकेकेव्ही’ दापोलीचे  कुलगुरू डॉ. संजय भावे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  नतिशा माथुर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

विकसित कृषि संकल्प अभियानाच्या माध्यमातून  शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी कृषि क्षेत्रात कार्य करणारी देशाची सर्वोच्च संस्था भारतीय कृषि अनुसंधान परिषद परिश्रम घेत आहे. या अभियानामध्ये देशातील 723 जिल्ह्यांमधील 65 हजारपेक्षा जास्त गावांना भेट देणारी दोन हजार 170 तज्ज्ञ पथके सहभागी होणार आहेत. प्रत्येक पथकात किमान चार वैज्ञानिक असतील. या पथकांमध्ये कृषि विद्यापीठांचे वैज्ञानिक, संशोधन संस्थांचे तज्ज्ञ, शासकीय विभागांचे अधिकारी, नाविन्यपूर्ण कार्य करणारे शेतकरी आणि एफपीओचे कर्मचारी यांचा समावेश असेल. या अभियानाद्वारे देशातील 1.3 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi