एकात्मिक बाल विकास सेवा योजनाअंतर्गत
१८ हजार ८८२ पदे भरणार
- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई दि. १२ : महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका 5639 व मदतनीस 13243 अशी एकूण १८ हजार ८८२ पदे भरण्यात येणार आहेत. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. राज्य शासन 75 हजार पदभरती करणार आहे यापैकी 18 हजार पेक्षा जास्त पदभरती महिला व बाल विकास विभाग करीत असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.
१४ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत मुख्यसेविका या पदाची सरळसेवा व निवडीद्वारे ३७४ पदभरतीची परिक्षा होणार आहे.
मंत्रालयात महिला सहकारी संस्था, महिला बचत गट, महिला मंडळ व अंगणवाडीबाबतच्या विविध प्रश्नांबाबत तसेच, भिवंडी शहरातील अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढविण्याबाबत, कर्मचारी व अधिकारी यांच्या पदभरती संदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व कामांचा आणि पदभरतीसंदर्भात आढावा घेतला.
महिला व बाल विकास मंत्री तटकरे म्हणाल्या की, मुख्यसेविका यांची सरळसेवेने १०२ म्हणजे ८० टक्के पदे, तर निवडीद्वारे २७२ म्हणजेच १०० टक्के पदे भरावयाची आहेत. १४ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत होणाऱ्या या परिक्षा पारदर्शक वातावरणात होण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील एकूण ५५३ बाल विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत एक लाख १० हजार ५९१ अंगणवाडी केंद्रे कार्यरत असून, ५६३९ अंगणवाडी सेविका व १३२४३ अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे भरण्याबाबतही कार्यवाही करण्याचे निर्देश तटकरे यांनी दिले.
याचबरोबर राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती करण्याचे निर्देश तटकरे यांनी दिले.
No comments:
Post a Comment