*श्री. कमलेश्वर महादेव मंदिर*
श्रीनगर, जिल्हा पौडी गढवाल, उत्तराखंड
संकलन - सुधीर लिमये पेण
देवप्रयाग पासुन ४८ किमी अंतरावर किर्तिमुख त्यानंतर पांच किमी अंतरावर श्रीनगर हे गांव आहे. या गांवाचे धार्मिक महत्व आहे ते म्हणजे तेथील कमलेश्वर महादेव मंदिर.
रावण वधानंतर श्रीराम या परिसरात आले, तेव्हा येथील प्रसन्न वातावरण व वनश्री पाहुन काही दिवस येथे रहावे असा मोह झाला. येथील शंकराचे मंदिर पाहुन 'सहस्त्राक्ष' स्वरूपातील प्रदोष काळी शंकराची पुजा करावी व सहस्त्रकमले वहावी अशी इच्छा झाली. त्यासाठी सहस्त्रकमले गोळा केली व पुजेस सुरूवात केली.
शिवपुजनात मग्न असलेल्या श्रीरामांची परिक्षा घेण्याचे भगवान शंकरांनी ठरविले. पुजेसाठी आणलेल्या सहस्त्रकमलापैकी एक कमळ भगवान शंकरांनी लपवुन ठेवले. श्रीरामांनी ९९९ कमळे वाहिली व हजारावे फुल पाहतात तर तेथे एक ही फुल शिल्लक नव्हते. प्रदोष काल संपायला थोडाच अवधी शिल्लक असल्याने श्रीरामांनी आपला उजवा डोळा लगेच काढुन वाहण्याचे ठरविले, हे भगवान शंकरांच्या लक्षात येताच त्यांनी तेथे हजारावे फुल ठेवले व आपण त्यांच्या शिवभक्तीवर प्रसन्न आहोत असे सांगितले. तेव्हापासुन या मंदिराला कमलेश्वर महादेव मंदिर म्हणतात.
त्या दिवशी वैकुंठ चतुर्दशी होती. तेव्हापासुन वैकुंठ चतुर्दशीला मोठी यात्रा भरते. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेला संतानहीन मातापिता रात्री तुपाचा पेटता दिवा हातात धरून संपुर्ण रात्रभर, या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर उभ्या असतात. ज्यांच्या हातातील दिवा रात्रभर तेवत राहतो, त्यांची प्रार्थना परमेश्वरांनी ऐकली असे समजतात. त्यांना संतती होते अशी श्रध्दा आहे. त्याला 'खडा दिपक पुजन' असे म्हणतात. त्याची वेळ मंदिर व्यवस्थापनातर्फे अगोदर काही दिवस जाहीर केली जाते.
माहिती:
१) 'मथुरा ते केदार' रा.का.बर्वे,पुणे
२) गुगलच्या सहकार्याने
श्री. पुरुषोत्तम लेले, पुणे
No comments:
Post a Comment